News Flash

अवघड सोपे करु या..

अवघड भासणारा विषय सोपा कसा करता येईल ते जाणून घेऊयात..

| January 28, 2015 06:53 am

अवघड सोपे करु या..

studyअवघड भासणारा विषय सोपा कसा करता येईल ते जाणून घेऊयात..

संत तुकाराम म्हणतात, ‘अशक्य ते शक्य करता सायास..’ कारण जगात अशक्य असं खरंच काही नसतं. अनेकांच्या यशोगाथा आपल्याला हेच सांगत असतात. असं असलं तरी आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात एखाद्या विषयाबद्दल अढी किंवा अनामिक भीती असते.. एकदा का ‘हा विषय मला जमणार नाही. ही गोष्ट अवघड आहे,’ असा विचार मनात शिरला की मग आपण प्रयत्न करण्यासही कचरतो आणि परीक्षेत तो भाग ‘ऑप्शन’ला टाकायचं ठरवतो. मुळात आपल्याला तो भाग, विषय अवघड वाटतो, कारण तो आपल्याला समजलेला नसतो. कदाचित शिकवणारे त्याला जबाबदार असू शकतात अथ वा आपण त्यावर आवश्यक तितका सराव आपण केलेला नसतो.. याचाच परिणाम, मग परीक्षेतल्या गुणांवर होतो आणि कमी गुण मिळाले की त्या विषयाबाबतचा तुमचा नकारार्थी विचार अधिकच पक्का होतो.

– पण प्रयत्नांनी अवघड वाटणारा हा विषय तुम्हाला केवळ ९० दिवसांत सोपा वाटू शकेल. वैज्ञानिकांच्या मते, आपण आपल्या मनाला दिलेली सूचना आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी पाळते. आपल्या सर्व पेशी ९० दिवसांत बदलतात. रोज नव्यानं जन्माला येणाऱ्या पेशीला- ‘हा विषय सोपा आहे, मला जमणार आहे, येणार आहे,’ अशी सूचना देत राहिल्यास खरोखरच तसं होतं. यासाठी खालील गोष्टी करा-
– ’अभ्यासाची सुरुवात कठीण वाटणाऱ्या विषयापासून करा. अभ्यासाला प्रारंभ करताना मेंदू ताजातवाना असतो. त्यामुळे एकाग्रता पटकन होऊ शकते.
– ’रोज रात्री झोपण्यापूर्वी तोच विषय अभ्यासाला घ्या. झोपताना तोच विचार मनात ठेवून झोपा. मग तो एखादा मोठा प्रश्न असू शकतो अथवा अडलेलं गणित असू शकतं, किचकट आकृत्या, नकाशे, निबंध लेखन असं काहीही असू शकतं. रात्री सगळीकडे शांतता असते. आपलं शरीर विश्रांती घेत असतं. मात्र, अशा वेळी आपला मेंदू व्यवस्थित काम करीत असतो. आलेली माहिती प्रोसेस करत असतो. योग्य ठिकाणी ठेवत असतो. एखाद्या हार्डडिस्कवर असावी तशी प्रत्येक विषयाला तुमच्या मेंदूत जागा असते. अनेक प्रतिभावंत आपला अनुभव सांगताना ‘सरस्वती स्वप्नात आली आणि..’ असं सांगतात, त्याचा या सगळ्याशी संबंध असतो. तुम्हाला हाच अनुभव येईल. सकाळी उठताना रात्री वाचलेलं, पाठ केलेलं सारं आठवू लागेल. मात्र जाग येण्यासाठी गजर लावा अथवा मेंदूला स्वयंसूचना द्या. जाग येताच सगळं आठवण्याचा प्रयत्न करा. कोणाशी न बोलता दैनिक कार्यक्रम उरकून तोच विषय अभ्यासाला घ्या. जे जे आठवत आहे, ते ते थोडक्यात उतरवून काढा.
– ’त्या मोठय़ा विषयाचे लहान लहान भाग पाडून त्यांना कॅप्शन द्या. त्यातले महत्त्वाचे शब्द, संज्ञा, व्याख्या लहान लहान कागदांवर उतरवा. ते तुकडे दिवसभर तुमच्याजवळ ठेवा. मधून मधून त्यावर नजर टाका.
– ’ती एखादी कविता असेल, उत्तराचे मुद्दे असतील वा अन्य काही.. सीडीवर वा मोबाईलवर तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करा. प्रवासात तसेच इतर दिनक्रम करतानाही हवे तितके वेळा तुम्हाला ते ऐकता येईल.
– ’शिक्षक अथवा वर्गातील हुशार विद्यार्थ्यांला तुम्हाला कठीण वाटणारा तो भाग पुन्हा एकवार समजावून द्यायला सांगा. जमल्यास रेकॉर्ड करा. त्याची आकृती बनवा. कोडवर्ड बनवा. त्याचे सतत मनन करा.
– ’तुम्ही हा विषय इतरांना समजून सांगत आहात अशी कल्पना करा. मोठय़ाने वा मनातल्या मनात ते समजावून सांगा. समोरच्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
– ’तुमच्याचसारखा हा भाग ज्यांना अवघड वाटतो, अशा मित्र-मैत्रिणींसोबत एकत्रितपणे त्या भागाची उजळणी करा.
– ’या विषयावर विचारले जाणारे सर्व लहान-मोठे प्रश्न तुम्हीच तयार करा. त्यांची उत्तरेही तयार करा.’न बघता ती उत्तरे वेळेत लिहिता येतात का, ते बघा. जिथे अडाल, चुकाल तिथे खूण करून ठेवा.
– ’दुसऱ्या दिवशी त्याच भागावर आधी लक्ष केंद्रित करा.
– ’हा सर्व भाग मुद्यांच्या स्वरूपात, थोडक्यात सतत आठवायचा प्रयत्न करा.
– अभ्यास म्हणजे केवळ वाचन वा लेखन नाही. त्याला श्रवण, मनन, चिंतनाची जोड द्या. म्हणजे तुमचे तुम्हालाच कळेल, अवघड भासणारा विषय अथवा घटक हा अवघड राहिलेला नाही.. आकलन आणि सरावाने तो सोपा बनला आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2015 6:53 am

Web Title: how to make study more easy
टॅग : Learn It,Study
Next Stories
1 मदतीचा हात..
2 प्रेझेन्टेशन उत्तम व्हावे म्हणून..
3 ओळख करून घेताना..
Just Now!
X