10मुलांच्या व्यक्तिमत्त्व घडण्या-घडवण्याबद्दल आजची आईबाबांची पिढी खूप जागरूक आहे. विविध स्पर्धापरीक्षा, वेगवेगळी कलाकौशल्यं, खेळ, सुट्टय़ांमधली शिबिरं अशा अनेक बाबींचं एक्स्पोजर मुलांना मिळावं, म्हणून प्रत्येकजण यथाशक्ती प्रयत्न करताना दिसतो. मुलांच्या भावी यशस्वी आयुष्यासाठी ही गुंतवणूक आवश्यकच आहे असं अनेकांना वाटतं. 

मुलं सातवी-आठवीत जाईपर्यंत त्यांचं वेळापत्रक अशा नानाविध अ‍ॅक्टिव्हिटीजनी गच्च भरलेलं असतं. आणि बहुतेक वेळा नववीपासून या सगळ्यांची जागा फक्त अभ्यास आणि स्पर्धापरीक्षांच्या क्लासेसनी घेतलेली असते. नववीपासून सुरू झालेला हा सिलसिला बारावी आणि जोडीनं येणाऱ्या प्रवेश परीक्षा आटपेपर्यंत चालू राहतो. बऱ्याचदा नववी ते बारावी या काळात खेळाचा वेळ मुलांच्या आयुष्यातून जवळजवळ हद्दपार झालेला असतो. कारण पुन्हा तेच- पुढच्या यशस्वी आयुष्यासाठी सगळा वेळ अभ्यासाला देणं अनेकांना अपरिहार्य वाटतं
त्यातही आणखी एक गंमत असते. बऱ्यााचदा दहावीपर्यंत मुलं कितीही क्लासेसना गेली, तरी अभ्यासात आईबाबांचा काही ना काही सहभाग असतोच- उजळणी करून घेणं, प्रोजेक्टसाठी मदत करणं- अशा अनेक स्वरूपात. पण एकदा मुलं अकरावी-बारावी आणि प्रवेश परीक्षांच्या क्लासेसना जाऊ लागली, की ती दिवसभर फारच व्यग्र राहतात. त्यामुळे मुलांबरोबर फारसा कॉमन वेळ हातीच लागत नाही. आणि मग त्यांच्या अभ्यासाशी आईबाबांचा संबंध अगदीच तुरळक होत जातो. पदवी अभ्यासक्रम सुरू झाल्यावर तर मुलं आणि पालकांची विश्वंच निराळी होऊन जातात. त्यांच्या अभ्यासाबाबत पालकांना फारसा वावच उरत नाही, आणि एकंदर संवाद विरळ होतो. अनेक टीनएजपल्याडच्या मुलांच्या आईबाबांनी हे बोलून दाखवलं आहे, ‘मुलं लहान असताना अभ्यास, अ‍ॅक्टिव्हिटीज – सगळ्यातून मुलांशी खूप बोलणं व्हायचं. एकदा हे सगळं थांबलं की मुलांशी बोलायला फारसे विषय उरतातच कुठे ? आता त्यांना त्यांचं जग असतं ना! आणि काही बोलायला-सांगायला गेलं की त्यांना आवडतही नाही.’
मुलांना त्यांचं जग असतं, स्वत्त्वाची जाणीव ठळकपणे होऊ लागलेली असते, बंडखोरीचे वारे वाहू लागलेले असतात, हे अगदी खरं आहे. पण म्हणून मुलांच्या अठराव्या-विसाव्या वर्षी त्यांच्याशी शेअर करण्यासारखं काहीच नसतं आपल्याकडे? मुलं आपापल्या आयुष्यात समृद्ध, यशस्वी, आनंदी असावीत असं सगळ्याच आईबाबांना वाटत असतं. केवळ अभ्यास, परीक्षांमधले मार्क्‍स आणि लहान असताना केलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या अ‍ॅक्टिव्हिटीज, एवढय़ातून त्यांच्या यशाची, आनंदाची पुरेशी बेगमी होते का?
समृद्ध आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी केवळ बुद्धय़ांक (इंटेलिजन्स कोशण्ट – कद) हेच सर्वस्व नाही, हे गेल्या तीन दशकातल्या संशोधनाने खणखणीतपणे सामोरं आलं आहे. सर्वसाधारणपणे यशस्वी होण्यात बुद्धय़ांकाचा वाटा असतो २० टक्के आणि भावनिक बुद्धय़ांकाचा (इमोशनल कोशण्ट- एद) ८०टक्के. म्हणजे काय ते नेमकं पाहूया. बुद्धय़ांक (कद) आपली बुद्धीच्या पलूंसंबंधातली क्षमता मोजतो तर भावनिक बुद्धय़ांक आपली भावना हाताळण्याची क्षमता. भावनांच्या हाताळणीत स्वत:च्या आणि इतरांच्या भावना समजणं, त्या व्यक्त करता येणं आणि त्यांचं व्यवस्थापन करता येणं, हे सगळं मोडतं. स्वाभाविकच गटात / समूहात काम करता येणं, परिस्थतीशी जुळवून घेणं, ताणतणावांना सामोरं जाता येणं, यश आणि अपयश दोन्हीही हाताळता येणं हे भावनिक बुद्धय़ांकाचे पलू आहेत. आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहिलं तर याची खचितच प्रचीती येईल. शाळकरी आयुष्यात भरपूर मार्क्‍स मिळवणारी, वर्गात पहिल्या पाचात येणारी मुलं पुढच्या आयुष्यात यशस्वी होतातच असं नाही. आणि बऱ्याचदा अभ्यासात यथातथा असणारी मुलं, पुढे जाऊन खूप काहीतरी भरीव करतात. बहुतेक वेळा यामागचं गमक त्यांची भावना हाताळण्याची क्षमता हे असतं. शाळा कॉलेजमधलं शिक्षण अर्थातच महत्त्वाचं आहे. पण नोकरी, व्यवसायात, रोजच्या जगण्यात, शिक्षणाच्या पल्याडचंही खूप काही लागत असतं. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठीची ही पुंजी ज्याची त्यालाच कणाकणाने जोडत जावी लागते. हे भान आईवडील म्हणून आपण मुलांना देणं फारच आवश्यक असतं. आपापल्या व्यवसायात, नातेसंबंधात अनेक वेळा कसोटीचे क्षण येत असतात. त्यांना आपण आपल्यापरीने सामोरं जात असतो. त्यात काही वेळा यश मिळतं, काही वेळा नाही. त्यामागचे आपले विचार, परिस्थितीच्या मर्यादा, सगळ्याचा केलेला साधकबाधक विचार – हे सगळंच मुलांबरोबर शेअर करणं, त्यांच्याशी गरजेनुसार चर्चा करणं, त्यांना काही निर्णयांमध्ये सामील करून घेणं हा मुलांसाठी आणि आपल्यासाठीही खूप समाधानकारक असा अनुभव असू शकतो. मात्र, त्यात आमच्या अनुभवावरून तुम्ही तरुण पिढीने काहीतरी शिकावं, आमचा सल्ला घ्यावा, असा सूर असेल तर सगळंच बिनसू शकतं. खरं तर कुठलाही आव आणला की संवादाला खीळ बसते. मुलांबरोबर संवाद सुरू राहण्यासाठी हवा असतो तो आपल्या बाजूचा मोकळेपणा (ओपननेस) आणि सच्चेपणा. त्यातून मुलांना प्रश्न विचारायला, चच्रेला आपसूकच वाव मिळत जातो. आपली यशाची कहाणी आपल्या मुलांसाठी किती प्रेरणादायक ठरेल सांगता येत नाही. पण आपले दु:खाचे, हताश वाटण्याचे, अपयशाचे क्षण प्रामाणिकपणे मुलांशी शेअर करण्यातून मुलांच्या पुंजीत नक्कीच खूप भर पडू शकेल. आता मागे वळून पाहताना त्याबद्दल काय वाटतं आहे, काय वेगळं करता आलं असतं, हेही कदाचित त्यांना सांगता येईल. अपयशाबद्दलची सार्वत्रिक दहशत कमी व्हायला त्याचा नक्कीच हातभार लागेल. अपयशाची भीती न बाळगणं, हीच तर यशाची बेगमी आहे ना!
mitihla.dalvi@gmail.com