रमेश पानसे

मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे बरेच फायदे शिक्षणतज्ज्ञ, बालतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ सांगतात. त्याच संदर्भातील ‘पालकांचा वाढता कल मराठी माध्यमांकडे?’ या २ जून रोजी ‘चतुरंग’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर आलेला हा खास प्रतिक्रियात्मक लेख.

What Ajit Pawar Said?
“द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?”, मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार काय बोलून गेले?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

मराठी कुटुंबातील मुलांनी आपले पूर्ण शालेय शिक्षण मराठीतूनच घ्यावे, असे माझे स्पष्ट मत आहे. याला सबळ अशी पुढील कारणे आहेत.

आपली भाषा हे आपल्या संस्कृतीतून जन्माला आलेले बाळ असते. मराठी संस्कृती ही मराठी भाषेची आई आहे. जी मुले, पालकांच्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्रजीतून शिकू लागतात, त्यांची लगेचच या आईशी ताटातूट होते. मग मुलांना हा भावनिक ताण सोसतच जगावे लागते.

आपल्या कुटुंबाशी, आपल्या परिसराशी आपले भावनिक धागे जुळलेले असतात. भावना जोडणारा हा धागा म्हणजे आपली पहिली भाषा असते. ही आपली भाषा, तिने बांधून घेतलेले भावविश्व, यातूनच आपली भावस्थिती घडत असते. पुढील काळातील ज्ञानाची मुळे या भावस्थितीशी निगडित असतात. इंग्रजी शाळेत प्रवेश करणाऱ्या मुलांच्या, मूळ भावस्थितीवरच पहिला आघात होऊन, मुलांचे शिकणे तुटक तुटक होत जाते.

माणसाचे सारे शिकणे हे संदर्भाधीन असते. म्हणजे, नेहमीच आजूबाजूच्या वातावरणाच्या छत्रीखाली ते घडत असते. काहीही नवे शिकताना, या वातावरणातील विविध घटकांचा संदर्भ घेऊनच शिकणे होत असते. स्थानिक वातावरणाचा संदर्भ एकदम तुटला तर मुलांना शिकताना, या संदर्भाचा उपयोग करता येत नाही. मुलांचे सारे शिकणे सैरभैर होत जाते. त्यांचा स्वत:च्या जीवनाचा मूळ स्थानिक संदर्भच हरवल्यामुळे, इंग्रजी शाळेत शिकू पाहणारी मुले, संदर्भहीन शिकू लागतात; फक्त संदर्भहीन असलेल्या परभाषिक क्रमिक पुस्तकांतील प्रश्नोत्तरांशी अडकून पडतात.

आपली पहिली भाषा हेच आपले व्यक्तीसंपर्काचे प्रभावी साधन असते. हे साधन जेवढे पक्के, जेवढे समृद्ध होत जाईल, तितके आपले इतरांशी होणारे संवाद अधिक अर्थपूर्ण होत जातात; आपले संवाद विस्तारित होत जातात. आपली स्वत:ची नैसर्गिकरीत्या आत्मसात झालेली पहिली भाषा हे, माणसांशी, निसर्गाशी जवळीक साधणारे साधन असते. इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मराठी मुलांचे हे साधनच दिवसेंदिवस अधिक दुबळे होत जाते. त्यांचे संवादक्षेत्र संकुचित होत जाते.

आपली पहिली, नैसर्गिकरीत्या आपोआप आत्मसात झालेली मराठी हीच आपली आयुष्यभरची विचारांची भाषा असते. विचार करण्याची क्षमता वापरणे ही अखंड चालणारी प्रक्रिया असते. जवळच्या वातावरणातील जे अनुभव मुले घेतात, त्यांच्याशी होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया, दिलेला, मिळालेला प्रतिसाद यांमधून मुलांची विचारप्रक्रिया फुलत असते. त्यासाठी वातावरणातील अनुभव मिळत राहावे लागतात. मराठी वातावरण असेल तर मुले आपली विचारप्रक्रिया सहजतेने फुलवत जातात. इंग्रजी शाळांच्या बंदिस्त वातावरणात स्वतंत्र विचारप्रक्रियाही कोमेजतात.

माणसाचा मेंदू हा असा आहे की त्याला नवनव्या कल्पना करण्याची विलक्षण क्षमता असते. त्याला असलेल्या गोष्टींविषयी तर कल्पना करता येतातच, पण अगदी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींच्या कल्पनाही करता येतात. देवांची कल्पना, भुतांच्या कल्पना, मृत्यूनंतरच्या जीवनाची कल्पना, मंगळावरच्या वस्तीची कल्पना किंवा अगदी स्वत:च्या भविष्याची-सुखाची कल्पना इत्यादी. मानवी जीवनात या कल्पनाशक्तीचे खूपच महत्त्व असते. कल्पना हीच विविध शोधांची जननी आहे. कल्पनांमुळेच मानवी जीवन, साहित्य, संगीत, चित्रकला, अशा अनेक कलांनी समृद्ध होत गेले आहे; आनंदी होत गेले आहे. कल्पना करण्याचे हे काम आपल्या पहिल्या भाषेकरवीच प्रामुख्याने होत असते. जेवढी आपली मराठी भाषा समृद्ध असेल तेवढी आपली कल्पनाशक्ती तीव्र होऊ शकेल. असा भाषा विकास शाळेवर अवलंबून नसतो. तर दैनंदिन जीवनातल्या व्यवहारांतील भाषेच्या वापरावर अवलंबून असतो. म्हणून, आपण सर्वानीच, आपल्या व्यवहारात केवळ आणि निखळ मराठी भाषेचा वापर करीत राहिले पाहिजे.

मराठी मुलांनी मराठीतून शिक्षण घेणे आणि इंग्रजीतून शिक्षण घेणे, या दोन घटनांमधील फरक खूप महत्त्वाचा आहे. मराठी शाळेत प्रवेश करताना, मूल आपल्याला येणाऱ्या भाषेत शिकायला सुरुवात करते, तर इंग्रजी शाळेत ते मूल आपल्याला न येणाऱ्या भाषेत शिकायला सुरुवात करते. साहजिकच इंग्रजी शाळेत, न येणाऱ्या भाषेत विषय शिकण्याचा आणि त्याच वेळेस, विषय शिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकत जाण्याचा, असा दुहेरी ताण मुलांच्या मेंदूवर पडतो. मेंदू थकतो आणि त्याला पूर्ण क्षमतेने विषय शिकण्याचे काम करता येत नाही.

इंग्रजी शाळेत, अपुऱ्या इंग्रजीच्या साहाय्याने विविध विषय शिकताना मुलांची तारांबळ उडते. भाषा चांगली येत असेल तरच विषय चांगले समजतात, वेगवेगळ्या संकल्पनांचे नीट आकलन होते. मराठी शाळेत, मराठी मुलांना हे सारे नीट जमते, आकलन चांगले होते. विषय न समजल्यामुळे सारखी, घोकमपट्टी करावी लागत नाही, जी इंग्रजी शाळेतील मराठी मुलांना करावी लागते. ही मुले घोकमपट्टी करून परीक्षेत गुण मिळवतात; पण प्रश्नोत्तरांच्या पलीकडे ती जाऊ शकत नाहीत. विषय ज्ञानालाच ती तोकडी पडतात.

माणसाची म्हणजेच मुलांचीही, शिकण्याची मेंदूत होणारी एक विशिष्ट प्रक्रिया असते; आणि ही प्रक्रिया घडण्यात भाषेचे मुख्य स्थान असते. वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांकरवी नवी माहिती बाहेरच्या जगातून आत मेंदूत येणे, त्यावर काही प्रकिया घडून त्या माहितीचा अर्थ लावणे, अर्थ समजलेली माहिती लक्षात ठेवणे, आणि ही स्मरणात असलेली माहिती हवी तेव्हा बाहेर काढून व्यवहारात तिचा वापर करणे, या सर्व पायऱ्या मेंदूतील शिक्षणाच्या असतात. ज्यांची पहिली आत्मसात केलेली भाषा, म्हणजे आपल्या मुलांची मराठी भाषा चांगली प्रगत असेल तर या सर्व पायऱ्यांना दर्जेदार काम होते; व मुलांचे शिकणे कायमस्वरूपी होते. इंग्रजी शाळांत मुलांची पहिली मराठी भाषा ही खुरटते किंवा चक्क मारली जाते; याने मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतच अडथळा निर्माण होतो.

मुलांचे ‘शिकणे’ कशासाठी असते? ते त्यांच्या भावीकाळातील जीवनासाठी असते. त्यांच्या नोकरी-व्यवसायांसाठी असते. त्यांच्या घरगुती व परिसरांतील, माणसामाणसांमधील स्नेहपूर्ण संबंधांसाठी असते, लोकशाहीतील नैतिक वागणुकीसाठी असते. निसर्गसंवर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी असते. थोडक्यात असे की आजचे शिक्षण हे उद्याच्या सुसंस्कृत जीवनासाठी असते. अशा जीवनासाठी लागणारी समज ज्ञानातून येत असते. उद्याचे जग हे ज्ञानयुग असेल तर, ज्ञानप्राप्ती, ज्ञानयुक्ती आणि ज्ञानवृत्ती निर्माण व्हावी लागते. हे सगळे घडण्यासाठी प्रत्येकाला एक तरी भाषा सहजतेने व समृद्धतेने यावी लागते. अशी भाषा कोणती? नव्याने शिकलेली नव्हे तर जन्मल्यापासून सहजतेने आत्मसात झालेली भाषा होय. मराठी कुटुंबातील मुलांची मराठी भाषा हीच त्यांची भावीकाळ सुखावह करणारी भाषा आहे!

chaturang@expressindia.com