महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांतील संत आणि धर्मसंस्थापकांनी त्या- त्या ठिकाणी मोलाचे कार्य केले आहे. मात्र, महाराष्ट्रातील लोकांना त्यांची, त्यांच्या कर्तृत्वाची तितकीशी माहिती नसते. बऱ्याचदा इतर राज्यांतील संतांची, धर्माची केवळ नावे माहीत असतात; त्यांचे विहित कार्य माहीत नसते. त्याविषयीचा अभ्यास, लेखन मातृभाषेत उपलब्ध नसल्यानेही कदाचित त्याबाबत उदासीनता दिसत असावी. राज्यांच्या सीमेवर वसलेल्या शहर व जिल्ह्य़ांत त्या- त्या राज्यातील संत-महात्म्यांची माहिती असते. सुभाष देशपांडे यांनाही अशीच सीमावर्ती शहरात राहताना बसवेश्वरांची माहिती समजली आणि त्यांच्याविषयीचे आपले कुतूहल शमविण्याचा प्रयत्न करताना त्यांनी ‘महात्मा बसवेश्वर- कार्य आणि कर्तृत्व’ हे पुस्तक लिहिले.
कर्नाटकात बाराव्या शतकात बसवेश्वर होऊन गेले. ते जनमानसात ‘बसवण्णा’ नावाने ओळखले जातात. अनेकजण त्यांना वीरशैव तथा लिंगायत धर्माचे संस्थापक मानतात. लेखकाने बसवेश्वरांचे कार्य आणि कर्तृत्व सांगताना त्यांच्या जन्मापूर्वीच्या कर्नाटकातील स्थितीचे वर्णन केले आहे. त्यावेळचा समाज जातीव्यवस्था, कर्मकांडाने ग्रासला होता. जैन, बौद्ध, शैव, वैष्णव आदी धर्माचे व त्यांच्या अनुयायांचे प्राबल्य होते. समाजात संन्यासाश्रमाला महत्त्व प्राप्त झाले होते. महात्मा बसवेश्वरांचा कर्मकांडांवर, जातिव्यवस्थेवर विश्वास नव्हता. बसवण्णांनी गृहस्थाचे जीवन आवश्यक मानले आहे. जग म्हणजे माया नव्हे, प्रपंच हा त्याज्य नाही, हे त्यांनी आवर्जून सांगितले. बसवण्णा हे कृतिशील विचारवंत, समाज व धर्मसुधारक होते. तसेच ते एक संवेदनशील गृहस्थ होते. आज आधुनिक काळातही स्त्रियांना त्यांच्या अधिकारांसाठी, समान वागणुकीसाठी संघर्ष करावा लागत आहे. बाराव्या शतकात तर स्त्रियांची स्थिती फारच बिकट होती. शुद्र आणि स्त्री हे दुर्लक्षित घटक होते. बसवण्णांनी स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्यासाठी तिला केवळ साक्षर करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी सुरू केलेल्या अनुभवमंटपाच्या चर्चेत समानतेचे आणि मानाचे स्थान दिले. त्यामुळेच वीरशैवांची ‘गीता’ असलेल्या वचन-साहित्याच्या निर्मितीत स्त्रियांचेही योगदान आहे.
बसवण्णांच्या विचारांमध्ये आधुनिकता आणि नावीन्याचा संगम होता. लेखक म्हणतो, समकालीन वास्तवाला सामोरे जाण्याची शक्ती आणि सामथ्र्य त्यांच्या विचारांत होते. समग्र मानवतेला कवेत घेण्याची ताकद त्यात आहे. आजही भारतीय समाजाला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरतील असे त्यांचे विचार आहेत. बसवण्णांच्या जन्मापासून ते त्यांच्या आधुनिक व अभिनव संकल्पना, वाचनसाहित्य, शिवशरणींची वचने इत्यादी लेख देशपांडे यांच्या सखोल अभ्यासाचे द्योतक आहेत. पुस्तकात केवळ इतिहास वा केवळ तत्त्वज्ञान नाही. त्यामुळे ते कुठेही बोजड होत नाही.
‘महात्मा बसवेश्वर- कार्य आणि कर्तृत्व’- सुभाष देशपांडे, जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे- ३८३, किंमत- ४०० रुपये.
रेश्मा भुजबळ