उद्या, १९ सप्टेंबर रोजी पं. विष्णु नारायण भातखंडे यांची ८० वी पुण्यतिथी! त्यानिमित्ताने ‘चतुर’, ‘विष्णू शर्मा’ अशा विविध उपनामांनी लेखन करून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया निर्माण करणाऱ्या या आद्यगुरूच्या ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती’ या २१०० पानांच्या ग्रंथाची पाच खंडांत नवीन आवृत्ती पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्ताने पं. भातखंडे यांच्या एका आगळ्या पलूवर टाकलेला प्रकाशझोत..

 

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

गुरूमहिमा अगाध आहे. खरे तर सर्वच क्षेत्रांत गुरू-शिष्यांचे नाते विशेष पवित्र असू शकते. दत्तात्रेय या देवाला चोवीस गुरू होते असे आपण मानतो. महात्मा गांधींनी तिघांचा आपले गुरू म्हणून उल्लेख केला आहे. तरी त्यांच्याशी काही ना काही मतभेद असल्याने पूर्णत: गुरूपण नाकारले आहे.

इतर क्षेत्रांपेक्षा संगीत आणि अध्यात्म या क्षेत्रांत गुरू या नात्याला विशेष महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात संगीतात घराण्यातील नात्यांचं प्राबल्य होते. कलेची देवाणघेवाण व्हायची ती प्रामुख्याने कुटुंबसापेक्ष- क्वचित कुटुंबाबाहेर; तर मग  स्थलसापेक्ष. तेव्हा शिष्य हा गुरूचा मुलगा, पुतण्या, भाचा, नातू असा कोणी असायचा. सरंजामी पद्धतीनुसार अशा शिष्याकडून सर्व प्रकारची सेवा करून घ्यायची, हे साहजिकच मानले जाई.

कुटुंबाबाहेरील शिष्यांना तालीम दिली तरी त्यामागील भावना तीच असायची. आणि त्यामुळे गुरू-शिष्य नात्यात फारसा फरक पडला नाही. गुरूची विद्वत्ता, प्रतिमा आणि अनुभव यांचे मोल केवळ पशांत करणे अशक्य असल्याने शिष्याने गुरूचे पाय चुरण्यापासून ते पिकदाणी साफ करण्यापर्यंत सर्व प्रकारची कामे करावीत, हे गृहीत धरण्यात येत असे. या प्रकारच्या अनेक सत्यकथा आणि दंतकथा प्रसृत झाल्या आहेत.

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अव्वल इंग्रजी काळात या परिस्थितीत फरक पडू लागला. गुरुकुल पद्धतीऐवजी इंग्रजांनी शाळा-कॉलेजांतून शिक्षणप्रसार सरू केला. त्याची पडछाया संगीताच्या क्षेत्रातही उतरली. या काळात कौटुंबिक संबंध नसतानाही केवळ कलेसंबंधीच्या आसक्तीने संगीत-शिक्षणाकडे पाहिले जाऊ लागले. या काळातील नवीन गुरू-शिष्य संबंधांचे मनोहर रूप पं. विष्णु नारायण भातखंडे आणि श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्या नात्यात दिसून येते.

भातखंडे हे मुंबईत वाळकेश्वरचे  रहिवासी. शाळा- कॉलेजच्या शिक्षणासाठी त्यांना मलबार हिल टेकडीच्या एका टोकापासून पाच-सात मलावरील एलफिन्स्टन हायस्कूल आणि कॉलेज इथे जाण्यासाठी पायपीट करावी लागली. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जरी मलबार हिल परिसरातील वल्लभदास दामुलजी यांच्याकडे झाले तरी नंतर ते भुलेश्वरला जीवनजी महाराजांकडे तालीम घेऊ लागले. प्रत्यक्ष तालमीबरोबरच श्रवण आणि वाचनामुळे भातखंडे यांचा संगीताचा अभ्यास वाढत गेला.

१८८४ साली गायनोत्तेजक मंडळींशी त्यांचा संबंध आला. तेव्हापासून संगीताविषयीची त्यांची संग्राहक वृत्ती बळावत गेली. धृपदे, चिजा, संगीतविषयक चर्चा या सगळ्या साठवण्याकडे त्यांचा कल होता. संसार आणि वकिली करत असले तरी त्यांचा मुख्य उद्योग संगीताभोवतीच राहिला. त्यांची पत्नी आणि एकुलती मुलगी यांच्या निधनामुळे दु:खात सुख मानून त्यांना संगीतासाठी मोकळीक मिळाली. त्यांना मिळालेल्या सुखठणकर कुटुंबाच्या आधारामुळे त्यांनी स्वत:ला संपूर्णपणे संगीताला वाहून घेतले.

पारंपरिक शाळा-कॉलेजातले शिक्षण असो किंवा संगीताचा व्यासंग असो; सगळे कष्टपूर्वक मिळवायचे ही सवय असल्यामुळे भातखंडे यांना पुढे देशभर संचार करून निरनिराळ्या उस्तादांकडून बंदिशी आणि ग्रंथालयांतून ग्रंथ पदा करणे हे सहजसाध्य वाटले असणार. विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत दळणवळणाच्या फारशा सुविधा नसतानाही त्यांनी तीर्थयात्रेचे निमित्त काढून देशाच्या कानाकोपऱ्यांतून ज्ञान संपादन केले. त्यांच्या गुरूंची एक मोठीच यादी सांगता येईल. पुण्यातले रावजीबुवा बेलबागकर, सेनिया परंपरेचे अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ, महमद अली खाँ कोठीवाल, गणतीबुवा भिलवडीकर, एकनाथ पंडित, नवाब हमीद अली खाँ बहादूर- रामपूरवाले, वझीर खाँ, महमद अली खाँ गिद्धोरवाले, पंडित सुब्राम दीक्षितार, चित्रास्वामी मुदलियार, काशिनाथ शास्त्री, अपा तुलसी, सर सौरीन्द्र मोहन टागोर इत्यादिकांचा मागोवा भातखंडे यांचे अभ्यासक प्रभाकर चिंचोरे यांनी घेतला आहे. भातखंडे यांची श्रीमंती फक्त त्यांच्या गुरूपरिवारात नव्हती, तर त्यांना सर्वार्थाने साथ देणाऱ्या शंकरराव कार्नाड, वाडीलाल शिवराम, राजाभय्या पूछवाले यांच्यातही होती.

भातखंडे पन्नाशीचे झाल्यावर त्यांच्याकडे श्रीकृष्ण नारायण रातंजनकर हा अकरा वर्षांचा मुलगा शिकायला आला. आपल्याला विद्या प्राप्त करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागले, ते पुढील पिढीला घ्यावे लागू नयेत म्हणून त्यांनी आपण मिळवलेले सर्व ज्ञान सर्वासाठी  मोकळे केले. स्वत: उतरवून काढलेले संस्कृत ग्रंथ छापून प्रसिद्ध केले. बंदिशी निरनिराळ्या मार्गानी प्रसिद्ध केल्या. त्यासाठी एक नोटेशन पद्धती तयार केली.

हे झाले सर्वासाठी! परंतु श्रीकृष्णाला त्यांनी आपल्या पंखाखाली घेतले. आधी बराच काळ त्यांनी श्रीकृष्णाला स्वत: तालीम दिली. तोपर्यंत त्यांनी स्वत: बरीच जमवाजमव केली होती. १९१० साली एकूण हिंदुस्थानी संगीतपद्धतीविषयी त्यांचा विचार झाल्यामुळे त्यांनी ‘श्रीमल्लक्ष्यसंगीतम्’हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. त्यावरील मराठी भाष्य लिहायलाही त्यांनी सुरुवात केली होती. या सर्वाच्या आधारे त्यांनी श्रीकृष्णाला त्याच्या वाढत्या वयानुसार तालीम द्यायला सुरुवात केली.

बडोद्याचे सयाजीराव महाराज यांचे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात फार मोठे योगदान आहे. भातखंडे यांचा त्यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांना फक्त बडोद्याचीच नव्हे, तर इतर अनेक संस्थानांची ग्रंथालये मोकळी झाली होती. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला.

श्रीकृष्णाचे वडील नारायणराव यांच्या लक्षात आले होते की आपल्या मुलाला गाण्यात गोडी आहे. त्यामुळे मुलाच्या बालपणापासून त्यांनी त्याची गाणे शिकण्याची व्यवस्था केली होती. सहा वर्षांचा श्रीकृष्ण खेळाऐवजी शाळेतून आल्यावर कृष्णभट होन्नावर यांच्यासमोर बसून पलटे घोकायचा. पुढे अंतूबुवा जोशी यांच्याकडून श्रीकृष्णाला ग्वाल्हेर गायकीची तालीम मिळाली. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचेही गाणे भरपूर ऐकायला मिळाले. हे सारे हा मुलगा जेमतेम ११ वर्षांचा होईपर्यंत.

नारायणराव रातंजनकर पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा वकिलांशी संबंध यायचा.भातखंडे हे वकीलच. त्यांचे स्नेही शंकरराव कार्नाड हेही वकील. नारायणराव यांचा या दोघांशीही परिचय होता. हा छोटा मुलगा चांगला गातो असे शंकररावांनी सांगितल्यावरून भातखंडे यांनी एकदा या मुलाचे गाणे ऐकून त्याला आशीर्वादही दिला होता. स्थलांतरामुळे ही आस्था तेव्हढय़ावरच राहिली. अहमदनगरलादेखील श्रीकृष्णाला कोणाची ना कोणाची तालीम मिळत राहिली. मुंबईला परतल्यावर एकदा योगायोगाने भातखंडे आणि नारायणराव यांची ट्रॅममध्ये भेट झाली आणि त्यातून श्रीकृष्णाच्या संगीतसाधनेला गती प्राप्त  झाली.

नव्याने स्थापन केलेल्या शारदा संगीत मंडळीमध्ये भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद शिकवत होते. आता या तरुण विद्यार्थाला नवीन खाद्य मिळू लागले. यापूर्वी कृष्णभट होन्नावर यांच्याकडून पलटे बसवून घेताना पटियाला घराण्याशी, अंतुबुवा जोशी यांच्याकडून ग्वाल्हेर आणि आता भेंडीबाझार घराण्याशी श्रीकृष्णाचा परिचय झाला होता. भातखंडे यांचा स्वत:चा उद्योग चालू होताच. संगीताविषयी चर्चा होत राहावी म्हणून त्यांनी संगीतविषयक परिषदा आयोजित करायचे ठरवले. हा मुलगा छोटा आहे, त्याला या परिषदांना का न्या, असा विचार न करता ते श्रीकृष्णाला सोबत नेऊ लागले.

बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या सांगण्यावरून १९१६ साली भातखंडे यांनी बडोद्याला अखिल भारतीय संगीत परिषद भरवली. बडोद्यात संगीतशिक्षणाची व्यवस्था नीट व्हावी म्हणून तिथे एका संस्थेची स्थापना व्हावी अशी  महाराजांची इच्छा होती. त्यानुसार उस्ताद फैयाझ खाँ यांच्या नेतृत्वाखाली भातखंडे यांच्या सल्ल्याने संगीत विद्यालय सुरू झाले. हे सारे करत असताना आपल्या शिष्याला ते विसरले नाहीत. त्यांनी महाराजांच्या साहाय्याने श्रीकृष्णासाठी शिष्यवृत्ती मिळवली. महिना चाळीस रुपये शिष्यवृत्ती ही तेव्हा रातंजनकर कुटुंबासाठी संजीवनी ठरली. महाराजांनी घातलेल्या अटींनुसार फैयाझ खाँ यांच्याकडे संगीताची तालीम आणि शाळा-कॉलेजचे पारंपरिक शिक्षण हेही चालू राहिले.

खॉंसाहेबांनी गंडा बांधताना श्रीकृष्णाला मांडीवर बसवताना सांगितले की, ‘तू आता माझा पुत्र झालास. आमच्या घराण्यातील कोणाकडेही तू आता मोकळेपणाने जाऊ शकतोस.’ खाँसाहेब असे म्हणाले खरे; पण भातखंडे यांनी त्याआधीच श्रीकृष्णाला आपला पुत्र मानले होते. त्यांनी विधीपूर्वक गंडाबंधन केले नसेलही, तरी त्यांनी जन्मभर श्रीकृष्णाला आत्मीयतेने वागवले.

बडोद्यात घेतलेल्या या निर्णयांत भातखंडे यांचा स्वार्थ एकच होता. त्यापूर्वी त्यांच्या परिवारातले शंकरराव कार्नाड आणि वाडीलाल शिवराम हे उत्तम संगीतज्ञ झाले तरी गायक म्हणून त्यांना मान्यता नव्हती. श्रीकृष्ण अभ्यासू संगीतज्ञ, गायक आणि एक परिपूर्ण कलाकार होईल अशी शक्यता निर्माण झाली होती.

रातंजनकरांनी बडोद्यात इंटपर्यंत परीक्षा दिल्या. खांॅसाहेबांकडून दुर्लभ अशी तालीम घेतली. बडोद्यात इतर अनेक गवयांशी त्यांचा संपर्क झाला. भातखंडे यांनी तयार केलेल्या स्वरलिपीचेही ज्ञान त्यांनी मिळवले. आणि विशीत असतानाच ते या क्षेत्रातले अधिकारी पुरुष मानले जाऊ लागले.

वयाच्या बाविसाव्या वर्षी रातंजनकर मुंबईला आले. विल्सन कॉलेजातून त्यांनी कॉलेजशिक्षण पूर्ण केले. त्याच सुमारास त्यांना अहमदाबाद येथील महिला कॉलेजात संगीत शिक्षकाची नोकरी  मिळाली. आपला शिष्य आता मार्गाला लागला अशी संकुचित भूमिका न घेता भातखंडे यांच्या मनात अधिक महत्त्वाचे काम शिष्यासाठी शिजत होते.

संगीत परिषदांचे काम चालू होतेच. १९२४ आणि १९२५ सालच्या संगीत परिषदा लखनौला झाल्या.तिथे अनेक ज्येष्ठ गायक हजर असत. १९२४ मध्ये रातंजनकरांचे दोन्ही गुरू समोर होते. ती मफल विलक्षण गाजली. हेच लखनौ पुढे रातंजनकरांची कर्मभूमी होणार होते. तिथे संगीत विद्यालय सुरू करताना भातखंडे यांनी दूरदíशत्व दाखवले. संस्था मार्गी लागेपर्यंत त्यांनी दत्तात्रेय केशव जोशी या प्रशासकाची प्राचार्य म्हणून नेमणूक केली आणि त्यानंतर १९२८ साली रातंजनकर या २८ वर्षांच्या संगीतज्ञाची. भातखंडे आपल्या पायांवर उभे होते तोवर ते कुठेही असले तरी त्यांचे मार्गदर्शन रातंजनकरांना मिळत होते. भातखंडे यांच्या क्रमिक पुस्तकांच्या संपादनात रातंजनकर यांचाही सहभाग असायचा. शेवटच्या भागात तर रातंजनकरांनी निर्मिलेल्या पूर्वकल्याण रागाचे विवेचन आणि त्यांच्या बंदिशीही इतर पारंपरिक बंदिशींबरोबर देण्यात आल्या आहेत. १९३६ साली भातखंडे निधन पावले.

रातंजनकरांच्या पुढील सांगीतिक प्रवासात त्यांच्यावर गुरूंची छाप दिसून येते. मॅरिस कॉलेज नावारूपाला आले. पुढे त्याचे रूपांतर एका विद्यापीठात झाले. खैरागढ येथील इंदिरा विश्वविद्यालयाचे ते उपकुलगुरू झाले. गुरूप्रमाणे त्यांनीही अनेक बंदिशी रचल्या आणि विवेचनात्मक लेखनही केले. आजच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनीही आपले पट्टशिष्य कृष्णराव तथा छोटू गिंडे यांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवले. गुरू-शिष्य यांचे नाते पिता-पुत्रासारखे असू शकते हे पुन्हा एकदा दाखवून दिले.

रामदास भटकळ – ramdasbhatkal@gmail.com