28 February 2021

News Flash

‘सेक्शुअल’ कथांचा काव्यात्मक आविष्कार

कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या किरण येले यांच्या सात कथांचा संग्रह ‘मोराची बायको’ हा नुकताच प्रकाशित झाला आहे.

कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या किरण येले यांच्या सात कथांचा संग्रह ‘मोराची बायको’ हा नुकताच प्रकाशित झाला आहे. या संग्रहातली ‘मोराची बायको’ ही कथा सर्वात अधिक वैशिष्टय़पूर्ण आहे. या कथेत मोराचे रूपक वापरून लेखक प्रेमाविषयी काही ठाम विधानं करतो. मोराचा केकारव म्हणजे उत्स्फूर्त उद्गार असतो. भाषा आली की नियम आले. भाषा आली की प्राणिसुलभ अबोधपणा गेला. मग एकमेकांच्या मनातल्या भावना ओळखण्याची शक्ती उणावली. मला तुझ्या केकारवाचा अर्थ कळत नाही असं मोराची बायको म्हणते, तेव्हा मोरपुरुष इथं सहज म्हणून जातो, ‘कोणतंही नातं टिकवायचं असेल तर त्यात काहीतरी अबोध राहू द्यावं. तरच नात्यातील उत्सुकता आणि रंगीतपण कायम राहील.’ मोराला वाटतं की, बायकोने पिसाऱ्याचा मोह आवरता घ्यावा, कारण तो काही माझ्या शरीराचा भाग नाही आणि तिला तर मोराचा पिसाराच मोहात पाडतोय. अनेकदा आतल्या निखळ गोष्टींपलीकडे व्यक्तिमत्त्वातील देखावा म्हणून असलेल्या बा गोष्टीच दुसऱ्याला महत्त्वाच्या वाटतात. ही संपूर्ण कथा वाचकाला एक विलक्षण अनुभव देते.

मोरपुरुष आणि मोराची बायको या रूपकातून युगुलाच्या एकरूपतेच्या चरम उंचीपर्यंत ती कथा पोहोचते. लेखक लिहिणं थांबवतो तरी नंतरही कथा घडत राहणारच आहे. कदाचित ती पुढची कथा लिहिली जाणार नाही, पण ही कथा पुढे जाण्याच्या शक्यता इथं किरण येले नोंदवून ठेवतात.

‘साईन आऊट’ ही कथा आभासी (व्हच्र्युअल) प्रेमाची कथा आहे. सध्या ‘चॅटिंग’ या नवीन माध्यमातून लोक प्रेमात पडतात. जगाच्या दोन टोकांवर राहणारी माणसं ‘व्हच्र्युअल सेक्स’देखील करतात. तरीही शेवटी याही नात्यात पारंपरिक अपेक्षाच डोकावतात. कारण माध्यम कुठलंही असलं तरी माणूस तोच आहे. माणसाच्या गरजा आणि इच्छाही त्याच आहेत. या कथेतला भारतीय पुरुष अमेरिकी चॅट पार्टनरकडून एकनिष्ठतेची अपेक्षा ठेवू लागतो. प्रेमात मालकी हक्काची भावना आली, की तिथेच अपेक्षाभंगाची सुरुवात होते. कधीकधी माणसाची प्रेमाची तहानच अफाट असते. त्याला कितीही पाट काढले तरी ती वाहत राहते.

‘कोपऱ्यातलं टेबल’ ही कथा एका दबलेल्या पुरुषत्वाची कथा आहे. सरोळकर हा लहानपणापासून स्वत:च्या आईची आई होऊन जगलेला आहे. सरोळकरच्या आईचं लैंगिक, मानसिक शोषण झाल्यामुळे ती मनोरुग्ण झाली आहे. सरोळकर आईला आणि स्वत:ला सांभाळत मोठा होतो. नोकरी करून आयुष्य सावरतो. हळव्या स्वभावाच्या सरोळकरला ऑफिसातले सहकारीही समजून घेतात. सरोळकर गावाकडची गरीब मुलगी बायको म्हणून आणतो. पण ही मुलगी मात्र बदफैली निघते. या आघाताने सरोळकर मानसिक संतुलन गमावतो. सरोळकरच्या आईला मारणारा बाप आणि आता बायकोला मारणारा सरोळकर एकच वाटू शकतात, पण ते एक नाहीत.

स्त्री-पुरुष नात्यांमध्ये ‘सेक्स’ सतत वावरत असतो. या सगळ्याच कथा कुठेतरी ‘सेक्स’ या आदिम भावनेभोवती घुटमळत आहेत. काहीतरी शोधू पाहत आहेत. या कथांमध्ये विवाहसंस्थेची अनसर्गिकता आणि त्यातली बळजबरी अनेकदा अधोरेखित केली आहे. विवाहसंस्था नाकारणारे लोक  या कथांमध्ये बंड करतात, परंतु अनेकदा या बंडामुळे त्यांच्या घरच्या लोकांची घुसमट आणि फरफट होते. ‘अवशेष’, ‘ती आणि ती’, ‘मांदळकरबाई’ या कथांमध्ये हाच समान धागा आहे.

कथा आणि कविता हे आविष्करणाचे वेगवेगळे प्रकार आहेत; तरीही कवीत ताकद असते तेव्हा तो कथेला काव्यात्मक रीतीने वळवू शकतो आणि हे कथेचं वैशिष्टय़पूर्ण बलस्थान होऊ शकतं. ‘मोराची बायको’ हा त्यामुळेच आवर्जून वाचावा असा कथासंग्रह ठरतो.

  • ‘मोराची बायको’ – किरण येले,
  • ग्रंथाली प्रकाशन,
  • पृष्ठे- १६२, मूल्य- १८० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 12:35 am

Web Title: morachi bayko book by kiran yele
Next Stories
1 चिरंतन पुराणकथा
2 रहस्यमय शोधकथा
3 ऐन वसंतात अर्ध्या रात्री..
Just Now!
X