आजच्या काळातला एक विलक्षण प्रतिभावान कलाकार आणि समाजभान असलेला बुद्धिमंत म्हणून नसिरुद्दीन शाह यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या स्पष्टवक्त्या व रोखठोक स्वभावामुळे तसंच विचारांच्या सखोल मांडणीमुळे त्यांनी समाजमानसात आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. लोकसत्ता गप्पाच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेलं रसाळ मुक्त चिंतन..

अभिनेत्यासाठी एक्सरसाइझ महत्त्वाचा असला तरी मी काही दररोज एक्सरसाइझ करीत नाही. मात्र अभिनयाशी संबंधित गोष्टींवर माझं सतत चिंतन, मनन सुरूच असतं. अनेक तरुण कलाकार माझ्याकडे येतात आणि मला विचारतात, ‘उत्तम अभिनयासाठी काय केलं पाहिजे?’ हे एक प्रकारे दुर्दैव आहे.. की ज्याला लेखक बनायचं आहे, अभिनेता बनायचं आहे, त्यांना सल्ला देणारं कुणीही नाही. इतर क्षेत्रांत- जसं की नृत्य, चित्रकारिता वा संगीतात- त्या त्या क्षेत्राची म्हणून काही कौशल्ये असतात; जी तुम्हाला रियाजाने आत्मसात करावीच लागतात. पण अभिनयाच्या बाबतीत तरुण कलाकारांनी काय करायला हवं याबद्दल सल्ला देणारं मात्र कुणीही नाही. मलाही असा सल्ला देणारं कोणी नव्हतं. अशा वेळी मी त्यांना एकच सांगतो की, एक कलाकार म्हणून तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते ओळखायचा प्रयत्न करा. हे ओळखणं अगदी सोपं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे- तुमचं शरीर आणि दुसरी गोष्ट- तुमचा आवाज. इतरही अनेक गोष्टी आहेत, पण या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण त्या तुम्हाला जगासमोर पेश करतात. त्यामुळे त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे हे तुमचं तुम्हाला माहीत असायला हवं. मला फार पूर्वीच- माझ्या तरुणपणात ही गोष्ट कळून चुकली होती. मी तेव्हा १७-१८ वर्षांचा असेन. मी अचानक आजारी पडलो आणि माझा नाटकाचा प्रयोग रद्द झाला. त्यावेळी माझे दिग्दर्शक मला म्हणाले होते, ‘काहीही झालं तरी हे तुला करायलाच हवं.’ तरुण वयात त्यांचं बोलणं मला तेवढंसं समजलं नव्हतं. पण वो बात दिल में अटक के रह गयी.. तुम्ही आजारी आहात किंवा काय याच्याशी लोकांना देणंघेणं नसतं. तुम्ही त्यांना तुमच्या आजाराचं कारण पुढे करणार का? तसं नाही चालत. तुम्ही तुमची तब्येत सांभाळलीच पाहिजे. कारण हा तुमचा व्यवसाय आहे. आणि आवाजाच्या बाबतीत म्हणाल तर एक मोठी अडचण अशी आहे, की खर्जातील आवाज म्हणजेच चांगला आवाज असा एक समज आपल्याकडे प्रचलित आहे. अनेक जण म्हणतात की.. ‘मेरी आवाज बडी खराब है.’ पण खरं तर खराब आवाज वगैरे अशी काही गोष्ट नसतेच. निसर्ग कधी दुजाभाव करत नाही. कुणाला चांगला आवाज दिला आहे आणि कुणाला वाईट- असं नसतं. तसंच उपजत कलागुण वगैरे प्रकारही नसतो. हं.. क्षमता असू शकतात. वृत्ती असू शकते. ज्यावर काम करून तुम्ही त्या विकसित करू शकता. आवाज ही अशी गोष्ट आहे, की त्याची क्षमता काय आहे, आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे तुमचं तुम्हालाच शिकलं पाहिजे. माझा आवाज पातळ आहे वगैरे तक्रार करून उपयोग नसतो. एखाद्याचा आवाज पातळ आहे, तर आहे बुवा. आता बासरीचा आवाज आणि नगाऱ्याचा आवाज एकसारखा असूच शकत नाही ना! आणि तसा तो नसणारच.

आम्ही.. भारवाही!

अभिनय ही कला नाहीए. ते एक शास्त्र आहे. आपण किती चांगले अभिनेते आहोत हे दाखवण्यासाठी अभिनय करायचा नसतो. तर त्या पात्राचं कलाकृतीतलं स्थान, त्याचं प्रयोजन, त्याची पाश्र्वभूमी आदी गोष्टी लक्षात घेऊन ते पात्र प्रेक्षकांना अत्यंत विश्वासार्ह वाटेल अशा रीतीनं सादर करणं हे कलाकाराचं काम असतं. दाखवेगिरी म्हणजे अभिनय नव्हे, हे कधी ना कधी तरी कलाकाराला कळून चुकतंच. अभिनेत्याचं काम हे भारवाहकाचं असतं. डॉ. श्रीराम लागूंनी आपल्या आत्मचरित्राला दिलेलं ‘लमाण’ हे शीर्षक यादृष्टीनं मला खूपच अन्वर्थक वाटतं. हे शीर्षक वाचून माझ्या मनाची कवाडं उघडली. त्यांच्यासारखा महान अभिनेता स्वत:ला ‘सामान वाहून नेणारा’ म्हणून संबोधतो. तो माल सुरक्षित आणि व्यवस्थितपणे योग्य जागी पोहोचवणे ही अभिनेत्याची जबाबदारी असते. कलाकार बऱ्याचदा हे वास्तव समजून घेत नाहीत. ते म्हणतात, ‘छे, हे आमचं काम नाही.’ पण तेच खरं वास्तव आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व हे तुम्ही साकारत असलेलं पात्र लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वापरलं जायला हवं. तुमचं व्यक्तिमत्त्व दाखवण्यासाठी ती कलाकृती बनवलेली नसते, हे कलाकारांनी ध्यानी घ्यायला हवं.

शाळेत मी काहीसा वांड मुलगा होतो. साहित्य आणि कविता वगळता मला अन्य कुठल्या विषयांत रस नव्हता. बीजगणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय तर माझ्यासाठी एखाद्या दु:स्वप्नासारखेच होते. मला माझ्यातल्या सुप्त क्षमतांचा शोध पहिल्यांदा नाटकातून लागला. माझं नाटकावर जे चिरंतन प्रेम आहे ते त्यामुळेच. नाटक करून मी रंगभूमीची सेवा वगैरे करतोय असं मला अजिबात वाटत नाही. ती माझी पॅशन आहे. मला नाटकात काम करून आनंद मिळतो. मला नाटकामुळे असंख्य लोकांना भेटण्याची संधी मिळते. त्यांच्याशी कलाकृतीतून संवाद साधण्याची संधी मिळते. परंतु  प्रत्यक्ष आयुष्यात मात्र मला लोकांशी सहज संवाद साधणे अजिबातच जमत नाही. अनोळखी व्यक्तींशी मला सहजतेनं बोलता येत नाही. अर्थात् त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं, गळाभेट घेतली आणि ते निघून गेले तर माझी त्याला काही हरकत नसते. पण त्यांनी मला गप्पांमध्ये ओढलं तर मात्र मला खूपच अवघडल्यासारखं होतं.

शालेय जीवनात मी अभ्यासात फारच वाईट विद्यार्थी होतो. हुशार मुलांनाच तेव्हा शाळेच्या नाटकांतून काम करण्याची संधी दिली जाई. त्यामुळे तेव्हा मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु नववीत असताना मी पहिल्यांदा ‘र्मचट ऑफ व्हेनिस’ हे नाटक केलं; ज्यात मी शायलॉकची भूमिका साकारली होती.

प्रेरणास्थान..

ज्यांनी मला आयुष्यात सर्वाधिक प्रेरित केलं, ते होते शेक्सपीअरन नाटकं सादर करणारे जेफ्री केंडलसाहेब. शाळेत असल्यापासूनच मी त्यांची नाटकं बघत आलो होतो. त्यांच्याइतका थोर कलाकार मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही. हे मी लहानपणी त्यांच्या कामाचा माझ्या मनावर घट्ट ठसा उमटला होता म्हणून म्हणत नाहीए. मी नंतर जाणत्या वयातही त्यांचं काम पाहिलेलं आहे. ते ७५ वर्षांचे होते तेव्हाही मी त्यांना नाटक करताना पाहिलं आहे. त्याही वयात त्यांच्या अभिनयात तेच पावित्र्य होतं- जे मी पाचव्या वर्षी पाहिलेल्या त्यांच्या कामात होतं. त्यांनी मला आमूलाग्र बदलवलं. मी त्यांची नक्कल करायचो. त्यांचा शायलॉक मी कित्येकदा पाहिला होता. त्यामुळेच मी पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा शायलॉकचीच भूमिका केली. त्यावेळी मला पहिल्यांदा एक विलक्षण असा अनुभव मिळाला. इतके लोक माझ्यासाठी आले आहेत, माझे संवाद ऐकण्यासाठी थांबले आहेत, ही भावनाच माझं आयुष्य बदलून गेली. तो क्षण माझ्यासाठी निर्णायक क्षण ठरला. आणि त्या क्षणापासून.. नवव्या इयत्तेत- चौदाव्या वर्षांपासून मी रंगभूमीवर विहरायला सुरुवात केली.

नैनितालच्या बोर्डिग स्कूलमध्ये असल्यापासून- म्हणजे पाचएक वर्षांचा असेन तेव्हा मी- जेफ्री केंडेल यांना नाटक करताना मी पाहिलेलं आहे. कारण त्यांची नाटक कंपनी नेहमी तिथे खेळ करत असे. हाच काळ होता- जेव्हा मी खूप चांगले वेस्टर्न चित्रपटही पाहिले. त्यावेळी मार्लन ब्रँडो, स्पेन्सर ट्रेसी असे एकाहून एक सरस कलाकार मी अनुभवले. मला ते खूप भावत. परंतु जेव्हा मी केंडेल यांना रंगमंचावर प्रत्यक्ष पाहायचो तेव्हा अक्षरश: थरारून जायचो. एक जिवंत व्यक्तित्व भासायचं ते. याउलट पडद्यावरचे हे कलाकार खरे नाहीएत, तांत्रिक युक्तीने ही कमाल साधली गेली आहे.. नाहीतर कुणी इतकं अस्सल आणि दरवेळी इतकं परफेक्ट कसं काय असू शकेल, हा विचार मनात यायचा. ब्रँडो किंवा स्पेन्सर ट्रेसीसारखे कलाकार प्रभावी वाटायचे, पण तरी ते जादूगारच भासायचे. केंडेल मात्र समोर भूमिका साकारताना दिसायचे. आणि मनात यायचं, हा माणूस खरा आहे! ही भूमिका कोणत्याही रोबोने केलेली नाहीए. केंडेल हे या सर्व नटांपलीकडचे होते. याचं कारण- त्यांचं एकच ध्येय होतं. ते म्हणजे त्यांना समजलेला शेक्सपिअर नाटकांतून लोकांपर्यंत पोचवणं. त्यांच्याबरोबर काम करायची मला खूप तीव्र इच्छा होती. बऱ्याच वर्षांनी त्यांच्यासोबत एक छोटी भूमिका करायची संधी मला मिळाली.. ज्यात मी त्यांना मारून टाकलं होतं. मी तेव्हा त्यांची माफी मागितली होती, की मला तुम्हाला मारावं लागतंय. त्यावेळी मला जेव्हा केव्हा संधी मिळे तेव्हा एखाद्या कोपऱ्यात मी त्यांना गाठायचो आणि नाटकाविषयी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा मी प्रयत्न करायचो. मला सर्वात थक्क करून टाकलं ते त्यांच्या उत्तरानं. ते म्हणायचे, मी अभिनेता नाही. मी एक मिशनरी आहे. शेक्सपिअर सर्वत्र पोहोचवणं हे माझं मिशन आहे. अशा श्रद्धाभावाने ते काम करीत असत. त्यावेळी शशी कपूर हे त्यांचे जावई आहेत याची मला काहीच कल्पना नव्हती. माझ्यासाठी शशी कपूर हे फक्त शम्मी कपूर यांचे भाऊ होते. शम्मी कपूर हे माझे सर्वात आवडते हीरो. आणि दुसरा आवडता अभिनेता म्हणजे दारासिंह. मी हे चेष्टेने सांगत नाहीए.

मी पहिल्या प्रथम नाटक केलं त्यावेळी मला स्टेजबद्दल फारशी माहिती नव्हती. मला फक्त संवादफेक कशी करायची, हेच थोडंसं माहीत होतं. आणि मला आज आठवलं की आश्चर्य वाटतं- त्यावेळी मी अँटोनियो, बसानियो, पोर्शियाची भूमिका करणाऱ्यांना नेमकं काय करायचंय, हे सांगू शकत होतो. मला वाटतं, स्टेजवर आल्यावर माझ्यात एक ऊर्जा संचारत असे. आणि माझं मन मोकळं होऊन विचार करू लागे.

आध्यात्मिकतेचा संबंध मी अभिनयाशी जोडू इच्छित नाही. परंतु मला कित्येकदा सहकलाकार विचारतात, की अभिनयात अमुक एक गोष्ट तुम्ही कशी केलीत? मी त्यांना एवढंच सांगतो, की मला त्या वेळी जे योग्य वाटलं ते मी केलं.. पण तेच मी उद्या करेन असं नाही. तेव्हा कदाचित मी दुसरंच काहीतरी करेन. मला लेखकाचे संवाद बाजूला ठेवून स्वत:ची अ‍ॅडिशन्स करायला बिलकूल आवडत नाही. ते योग्यही नाही. मला स्मार्टपणा करत भलत्याच गोष्टी करणारे, लेखकाच्या संवादांत उगीचच स्वत:ची काही भर घालून आगाऊपणा करणारे कलाकार अजिबात आवडत नाहीत. आपल्या वाटय़ाला आलेले संवाद आपलेसे करणं हे सगळ्यात कठीण काम आहे. ते करायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. गायक, नर्तक किंवा वादक दररोज किती प्रचंड मेहनत करतात. रियाज करतात. रोज आपलं वाद्य घासूनपुसून नीट ठेवणं, ते टय़ून करणं- हे केल्याशिवाय कोणता वादक वाद्य वाजवतो? गायकालाही रियाज केल्याविना गाता येत नाही. फक्त कलाकारच असे असतात; ज्यांना वाटतं- अभिनय करणं हा त्यांना देवाने दिलेला हक्क आहे. असं नसतं. तुम्हाला तो हक्क मिळवावा लागतो.

..मी थोडासा भरकटत गेलोय बोलता बोलता. तर माझ्या दिग्दर्शनाविषयी मी सांगत होतो. एनएसडीत (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) असताना मला खरं तर अभिनयातच अधिक रस होता. पण त्यावेळी अल्काझींनी सांगितलं, ‘नाही, तू ‘दिग्दर्शन’ कर.’ आणि अल्काझी असं जेव्हा अधिकारवाणीने सांगतात तेव्हा तुम्ही त्यांना आव्हान नाही देऊ शकत. म्हणून मग दुसऱ्या वर्षी मी ‘दिग्दर्शन’ हा विषय घेतला. अल्काझीच दिग्दर्शन शिकवीत होते. माझ्या आयुष्यात आलेला हा एक महान शिक्षक. मी माझी एनएसडीतली मैत्रीण ज्योती.. तेव्हाची ‘देशपांडे’ आणि आत्ताची ‘ज्योती सुभाष’- हिच्याबरोबर एक नाटक केलं. ज्याचं नाव होतं-‘शायद हाँ’! आज मात्र मला अभिनयात जितका रस वाटतो, तितकाच दिग्दर्शनातही वाटतो असं मी म्हणेन.

माझी स्वत:चीच नाटय़संस्था असल्याने मी इतरांच्या दिग्दर्शनाखाली फार कमी काम केलंय. तुमची स्वत:ची संस्था असते तेव्हा काही कम्पल्शन्सही येतात. त्यामुळे माझ्यावर काही बंधनं आपसूकच आली. तरीही मी काही नव्या दिग्दर्शकांबरोबर रंगभूमीवर काम केलेलं आहे. ही मंडळी आजच्या वास्तवाला थेटपणे भिडताना मला दिसतात. पण मला कित्येकदा असं वाटतं, की थिएटरमध्ये येणारे तरुण काहीएक ठरावीक समजुती घेऊन येतात.

नाटक-सिनेमातला फरक

मला हा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला आहे, की आपल्याकडे ब्रॉडवेसारखं नाटक का होत नाही? त्याचं खरं उत्तर आहे- परदेशात जसे रोज ब्रॉडवेवर नाटकाचे शो केले जातात तसं आपल्याकडे करायचं ठरवलं तर आपण काय विषय घेणार? त्या प्रकारे ‘मुगल-ए-आझम’सारख्या नाटकाचे प्रयोग इथे केले जातात. ज्यात ‘चित्रपटा’चा अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे अत्यंत चुकीचं आहे. मुळात ब्रॉडवे साकारण्यासाठी ज्या पद्धतीचं स्टेज लागतं, सोयीसुविधा लागतात, त्या आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे सेट असतात. जिथे एक सोफा असतो, चार खुच्र्या, एक टेबल असतं. पुस्तकांनी भरलेला एक खण असतो. एका दिवाणखान्यात जितके तपशील दाखवता येतील तितके त्यात असतात. पण ब्रॉडवेवरच्या नाटकांत एका क्षणी हा सगळा दिवाणखान्याचा सेट नाहीसा होतो आणि तिथे जंगल अवतरतं. आणखीही बरंच काही होतं. मला वाटतं, नाटकाला असा सिनेमासारखा लुक देण्याचा प्रयत्न करणं हेच मुळी चुकीचं आहे. आपल्याकडेही हेच केलं जातं. नाटकाला असा सिनेमाचा ‘फील’ देणं माझ्या मते योग्य नाही.

आजची रंगभूमीवरील पिढी मला खूप आशादायी वाटते. कारण ते त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतात.. व्यक्त होतात. त्यांच्यापैकी सगळेच काही चांगलं काम करतात असं माझं म्हणणं नाही, पण निदान ते वास्तवातील घटनांवर व्यक्त होऊ पाहताहेत. जर तुम्ही ब्रॉडवेसारख्याच सिनेमॅटिक गोष्टी इथे करू पाहाल तर नाटय़कला निश्चितच मरणपंथाला लागेल असं मला वाटतं. तुम्हाला आपलं थिएटर काय, हे ओळखता आलं पाहिजे. तुम्ही कोणत्या पातळीपर्यंत प्रेक्षकांची कल्पनाशक्ती ताणत नेऊ शकता, ते म्हणजे ‘थिएटर’ आहे. उत्तम आशय असलेली आणि चांगल्या पद्धतीने सांगितलेली गोष्ट कोणाला आवडत नाही? लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच ते आवडतं. आणि हाच ‘थिएटर’चा खरा अर्थ आहे.

नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी नाटकाचे जिथे दौरे करणं शक्य आहे तिथे आम्ही ते करत असतोच. परंतु अलिगढ, बरेली किंवा मथुरेसारख्या ठिकाणी नाटक करायला गेलो की लोक माझ्याकडे चित्रपट कलाकार म्हणून पाहतात आणि विचित्रपणे वागायला लागतात. मी स्वत: माझ्या तरुणपणी हेच केलेलं असल्याने ही मानसिकता मला माहिती आहे. एकदा मी मुरादाबादमध्ये मित्रांबरोबर असाच भटकत होतो. आणि एकच गलका झाला.. ‘शशी कपूर आले’ म्हणून. आम्हीही गर्दीच्या दिशेने निघालो. एका ढाब्यापाशी जवळपास ५०० लोकांची झुंड जमली होती. बहुधा नैनितालहून परतताना जेवण्यासाठी म्हणून शशी कपूर त्या ढाब्यावर थांबले होते. ते बटर चिकन खाण्यात मग्न होते आणि समोर पाचएकशे लोक त्यांना खाताना बघत होते. मोठीच विचित्र गोष्ट होती ती.

नाटक एन्जॉय करणं म्हणजे..

गेली काही वर्षे आम्ही नेमाने कोकणातील कणकवलीत नाटक सादर करतो आहोत. तिथे आवर्जून नाटक करण्याचं कारण म्हणजे तिथल्या लोकांची नाटकाची समज. मी कणकवलीत जितका नाटक समजणारा प्रेक्षक पाहिला तसा इतरत्र कुठे पाहिलेला नाही. एका वर्षी आयोजकांचा फोन आला की, या वर्षी पैशाअभावी आम्ही नाटय़महोत्सव करू  शकत नाही. परंतु पुन्हा थोडय़ा दिवसांनी त्यांचा फोन आला, की आम्ही नाटय़महोत्सव करतोय. तुम्ही या. मी विचारलं, काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं की, नाटय़महोत्सव होणार नाही म्हटल्यावर लोक कमालीचे नाराज झाले. लोकांनी सांगितलं की आम्ही सीझन तिकिटं खरेदी करतो; पण आम्हाला नाटकं पाहायची आहेत. आजही तिथून निमंत्रण येतं तेव्हा आम्ही आवर्जून जातो. तिथे एक वेगळंच वातावरण आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा नाटय़गृहाला पत्र्याचं छप्पर होतं. मातीचं स्टेज शेणानं सारवलेलं होतं. समोर प्लॅस्टिकच्या खुच्र्या लावलेल्या. मला त्या खुच्र्या आवडतात. तिथे नाटक करायला नेहमीच मजा येते. ज्या पद्धतीने तिथे सूर्यप्रकाश स्टेजवर येतो ते सगळंच विलक्षण आहे. आपण जणू स्वर्गात आहोत असा अनुभव तिथं नाटक करताना येतो.

अनेक प्रेक्षक वेळ चांगला घालवणारं नाटक म्हणजे चांगलं नाटक असं मानतात. मला वाटतं, लोकांची केवळ करमणूक करणारी नाटकं देणं हे कलावंताचं काम नव्हे. तर त्यांना जी नाटकं मनापासून करावीशी वाटतात, जी प्रेक्षकांच्या जाणिवा समृद्ध करतात, अशी नाटकं त्यांनी केली पाहिजेत. आमच्या ‘मोटले’ प्रॉडक्शनमध्ये मी अशा नाटकांना प्राधान्य देतो. मग त्यात मीच भूमिको केली पाहिजे असा माझा हट्ट नसतो. ‘‘मोटले’ म्हणजे नासिर’ हे समीकरण रूढ व्हायला मला नको आहे. जेव्हा संस्था एखाद्या व्यक्तीभोवती केंद्रित झालेली असते आणि अशा व्यक्तीचं निधन झालं, किंवा ती अपयशी ठरली तर ती संस्था कोसळते. अशी कितीतरी उदाहरणं माझ्या पाहण्यात आहेत. हे मला माझ्या संस्थेच्या बाबतीत होऊ द्यायचं नाहीए.

पालकांना समजून घेताना..

माझ्या आई-वडिलांना मी अभिनेता बनणार म्हणून कधी काळजी वाटली नाही. कारण माझं नाटक-चित्रपटाचं वेड मी त्यांच्यापासून लपवून ठेवलं होतं. त्यांना जास्त काळजी वाटायची ती मी क्रिकेटर होईन म्हणून. मी तेव्हा भावांबरोबर खूप क्रिकेट खेळायचो. माझ्याकडे क्रिकेटपटूंच्या छायाचित्रांचा विलक्षण संग्रह होता. माझ्या भौतिकशास्त्राच्या वहीत हे सारं क्रिकेटपटूंचं कलेक्शन होतं. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की, तू खूप हुशार आहेस. मला ते कधीच पटलं नाही. कारण माझ्या शिक्षकांनी मी निरुपयोगी असल्याची भावना माझ्यात रुजवली होती. नववीत मी नापास झालो आणि मग वडिलांनी बोर्डिग स्कूलचा खर्च खूप आहे, तो परवडणारा नाही, या सबबीखाली मला तिथून काढलं. खरं तर घरी ते माझ्यावर बारकाईनं लक्ष ठेवू शकणार होते, हा त्यामागचा हेतू होता. पण मी त्यांच्या पश्चात काय करतो हे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हा मी आईच्या पर्समधून पैसे काढून घेऊन दर रविवारी सकाळी चित्रपट बघायला जायचो.

माझ्या स्वत:बद्दलच्या समजात बदल कधी झाला असेल, तर तो नववीत मी जेव्हा नाटक बसवलं तेव्हा! इथूनच माझ्या शालेय गुणांमध्येही आश्चर्यकारकरीत्या फरक पडला. कारण मला जे आवडत होतं ते मला करायला मिळालं होतं. वडलांना वाटलं, की मी खूप मेहनतीने अभ्यास करू लागलो आहे. प्रत्यक्षात माझे गुण वाढले होते त्याचं कारण मी तेव्हा खूप आनंदी होतो.

माझ्या वडलांना मी डॉक्टर व्हावंसं वाटत होतं. परंतु मी डॉक्टर होणं शक्य नव्हतं. मला माहिती होतं, की मी मेडिकलची जाडजूड पुस्तकं वाचूच शकत नव्हतो. नंतर पुढे मी जाडजूड पुस्तकं वाचली खरी; पण ती शेक्सपिअरची होती. मी चांगला अभिनेता बनेन की नाही, याचं त्यांना सोयरसुतक नव्हतं. त्यांना काळजी होती ती मी अभिनेता बनून स्वत:चं पोट भरू शकेन की नाही, याची. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी डॉक्टर झालो असतो तरी मी त्यातून किती कमावतोय, हेच त्यांच्या लेखी महत्त्वाचं ठरलं असतं. माझ्या वडिलांचं आणि माझं कधीच पटलं नाही. आमच्या दोघांचं नातं अखेपर्यंत ताणलेलंच राहिलं. ते नीट व्हावं म्हणून मी कधीच प्रयत्न केले नाहीत. आणि याचा मला आता खूप पश्चात्ताप होतोय. त्यांनी कधीच मला अभिनय करताना पाहिलं नाही. त्यांनी माझा फक्त ‘निशांत’ हा चित्रपट बघितला. आणि त्यांना एकाच गोष्टीचा आनंद झाला होता, की मी माझं नाव बदललं नव्हतं.

आज मागे वळून पाहताना मला वाटतं, आपले पालक नेहमी आपल्या भल्याचाच विचार करत असतात. आपल्याला चांगले पैसे मिळवून देणारा कामधंदा मिळावा आणि सुंदर आयुष्य जगता यावं, एवढीच त्यांची इच्छा असते. मला वाटतं, आपण त्यांचे विचार समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधायला हवा. मी माझ्या वडिलांशी असा संवाद कधीही साधला नाही. माझ्या दोन भावांना ते जमलं. कारण त्यांनी तसा प्रयत्न केला असणार. मी मात्र प्रयत्न करणंच सोडून दिलं होतं. मला याचा आज खूप पश्चात्ताप होतो आहे. ते गेल्यानंतर मात्र त्यांचा आणि माझा अनेकदा संवाद झाला आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की किती सोपं होतं त्यांच्याशी बोलणं! मला वाटतं, आजच्या पिढीने आपल्या पालकांशी असा संवाद साधायचा प्रयत्न करायला हवा.

माझ्या पालकांबरोबरच्या अनुभवांतून धडे घेऊन मी आज माझ्या मुलांना त्यांना जे काही करायचं आहे त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतो. कारण मला माहिती आहे, की मुलांना जे वाटतं तेच शेवटी ते करणार. मीही तेच तर केलं होतं! अर्थात मला त्यांची काळजीही वाटते. मला बॉलीवूडचं विश्व किती संकुचित आहे याची जाणीव आहे. माझ्या मुलांना फिल्मस्टार बनायचं असेल तर ती बनतीलही. पण त्यांनी या बबलगम बॉलीवूडी सिनेमाला चिकटून बसण्यापेक्षा दुसरं काहीतरी अर्थपूर्ण आयुष्यात करावं अशी माझी  इच्छा आहे.

मी जरी गेली कित्येक वर्षे चित्रपटांतून काम करीत आलो असलो तरी चित्रपट दिग्दर्शनाबाबत मात्र मी सपशेल हार मानली आहे. तसा एक अपयशी अनुभव गाठीशी घेऊनच मी हे विधान करतो आहे. चित्रपट बनवण्यासाठी तुम्हाला दृश्यमाध्यमाची उत्तम जाण असावी लागते. तुमचं असं एक दृश्यात्मक विधान असतं; जे तुम्ही चित्रपटातून मांडत असता. त्यात मी कमी पडलो होतो. पण असं असलं तरीही माझ्या मनासारखा एखादा चित्रपट बनवायचा प्रयत्न मी कधीतरी भविष्यात नक्कीच करणार आहे.

आज मुख्य प्रवाहातील चित्रपटांचा विचार करता त्यात पूर्वीपेक्षा काहीच वेगळा बदल झालेला दिसत नाही. पैसे कमावण्यासाठीच तेव्हा चित्रपट बनवले जात. आजही तीच परिस्थिती आहे. आता शंभर- दीडशे- दोनशे कोटींचा जादुई आकडा गाठण्यासाठी चित्रपट केले जातात. या पाश्र्वभूमीवर छोटय़ा बजेटच्या चित्रपटांचे प्रमाण किती, याचा विचार केला तर त्याकाळी जसे समांतर चित्रपटांत एक मृणाल सेन किंवा एक श्याम बेनेगल असतील, तर पलीकडच्या बाजूला ३०० गल्लाभरू चित्रपटकर्ते होते. तसंच आताही कलात्मक चित्रपटकर्ते ३० जण असतील, तर गल्लाभरू चित्रपटकर्ते संख्येनं ३००० झाले आहेत, एवढाच काय तो फरक. आज अडीच कोटींत सिनेमा करू इच्छिणाऱ्या दिग्दर्शकाचं बजेट  हलाखीचंच आहे. त्याला आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करायची असेल तर निर्मितीएवढंच वेगळं बजेट बाजूला काढून ठेवावं लागतं. याचाच अर्थ छोटे चित्रपट करणारे अजूनही त्याच चक्रात अडकले आहेत. मग बदललंय काय? तर नवे चित्रपटकर्मी तांत्रिकदृष्टय़ा सहज जुळवून घेणारे आहेत. ते जे विषय मांडताहेत ते त्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहेत. ‘दम लगा के हैशा’सारखा चित्रपट घ्या, किंवा मराठी चित्रपटांचं उदाहरण घ्या.. ‘कोर्ट’ हा आजचा सर्वोत्तम चित्रपट आहे. मराठी चित्रपटांमध्ये आता जी क्रांती घडून आली आहे ती खरोखरीच आनंद साजरा करण्याजोगी गोष्ट आहे. परंतु ही क्रांती घडवून आणणारे चित्रपटकर्ते बॉलीवूडने त्यांच्यापुढे पसरलेल्या आमिषाच्या जाळ्यात अडकणारच नाहीत याची मात्र शाश्वती देता येत नाही.

आयुष्याच्या ज्या टप्प्यावर मी आज आलो आहे, तिथे कलाकार म्हणून मला आता ‘किंग लिअर’ची भव्यदिव्य भूमिका साकारण्यात रस उरलेला नाही, हे मला कळून चुकलंय. त्याऐवजी मी जे नाटक वा सिनेमा करतोय त्यातून नेमकं काय सांगायचं आहे, हे माझ्या वाटय़ाला किती मोठी भूमिका आली आहे यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं वाटतं. झोया अख्तरच्या ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ची पटकथा मी वाचली नव्हती. तिने त्यातला एक प्रसंग फक्त मला ऐकवला होता. मी स्वत: माझ्या मुलीपासून १८ र्वष दूर होतो. त्यामुळे तिची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली तो क्षण भावनांनी अक्षरश: ओथंबलेला होता. या चित्रपटातील प्रसंग माझ्या आयुष्यातील या प्रसंगाशी साधम्र्य सांगणारा होता. त्यामुळे तो चित्रपट मी स्वीकारला होता.

अनुकरणाविषयी..

अनुकरणाचं म्हणाल तर एखाद्या मुलाला क्रिकेटर व्हायची इच्छा असेल आणि सचिन तेंडुलकर हा जर त्याचा हीरो असेल तर तो पहिल्यांदा सचिन कशी बॅट धरतो हेच पाहणार, किंवा क्रिकेटपटू दडपणाखाली ज्या गोष्टी करतात त्यांचीच नक्कल तो करणार. तेच कलाकाराच्या बाबतीतही आहे. तो पहिल्यांदा त्याचा जो आवडता हीरो आहे त्याचीच नक्कल करणार. आणि ते स्वाभाविक आहे. पण आयुष्यभर तो त्याचीच नक्कल करत राहिला तर मात्र तो अडचणीत येईल. मी फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये जेव्हा अभिनयाचं प्रशिक्षण घेत होतो तेव्हा मला या गोष्टी लक्षात आल्या. आपण एफटीआयआयच्या अभ्यासक्रमाला नावं ठेवतो. दुर्दैवाने उपलब्ध पुरावेही तेच सांगतात. माझ्या वर्गात तीनजण होते- जे टिकून राहिले. एक मुकेश खन्ना, शक्ती कपूर आणि मी. आम्हा तिघांना जे शिकायचं होतं ते आम्ही तिथे शिकलो. इन्स्टिटय़ूटमध्ये मी पहिल्यांदा हिंदी आणि इंग्रजीबरोबरच अन्यदेशीय चित्रपटही पाहिले. इटालियन, पोलिश, फ्रेंच, जर्मन चित्रपट पाहताना त्यातल्या कलाकारांचा अभिनय पाहून मी अक्षरश: थक्कच झालो. इतके खरे कलाकार कसे काय असू शकतात? तिथून खरी सुरुवात झाली. मी शम्मी कपूर होऊ शकत नव्हतो. मग मी काय करू शकत होतो? मी कोण आहे, याचा मी शोध घेतला. माझ्या ज्या कमकुवत गोष्टी होत्या त्यांना मी माझी बलस्थानं बनवली पाहिजेत. एक तर मला माझं काम नीट समजलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट : माझं स्वत:चं काय आहे हे लक्षात घेऊन काम केलं तरच मला माझी वाट सापडेल, हे माझ्या लक्षात आलं. मी कुणाची नक्कल करत राहिलो असतो तर माझी कारकीर्द कधीच संपली असती.

कालातीत जाने भी दो यारो

एफटीआयआयची आठवण निघाली की कुंदन शहाची आठवण ओघानेच येते. कुंदन हा शेवटचा माणूस होता- ज्याच्याकडून मला अपेक्षा होती, की तो यशस्वी चित्रपट बनवेल. पण कुंदन हा कधी दिग्दर्शक वाटलाच नाही. तो अकाऊंटंट वाटायचा. कारण तो नेहमी पांढरा बुशशर्ट घालायचा आणि त्याच्या हातात नेहमी ब्रीफकेस असायची. त्याची डिप्लोमा फिल्म बघून मी हैराण झालो होतो. फिल्म इन्स्टिटय़ूटचा तो पहिलाच विद्यार्थी होता- ज्याची डिप्लोमा फिल्म ही एक कॉमिक फिल्म होती. अन्यथा इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांची डिप्लोमा फिल्म म्हणजे काहीसं जडजंबाळ प्रकरणच असे. जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला जाई, की ती फिल्म कुणालाच समजू नये. कारण ती समजली तर  त्यातल्या चुका काढल्या जाणार. या फिल्ममधल्या व्यक्तीचं तोंड आधी हलत असे आणि संवाद दोन मिनिटांनंतर. आणि त्याला हे लोक ‘एलियनेशन’ म्हणणार! आणि या डिप्लोमा फिल्म्सची नावं तरी काय असायची? तुमचा विश्वास बसणार नाही.. ‘बिभीषण की मृगतृष्णा’, ‘मध्यसूर्य’ अशी काहीशी नावं असायची. डोकेदुखीशिवाय या फिल्म्स पाहून काहीच मिळायचं नाही. पण कुंदनची फिल्म अशी होती- जी मजेशीर होती. त्यात गोष्ट होती. आणि स्वत: कुंदन एक प्रामाणिक माणूस होता- जो प्रत्येकाला मदत करायचा. त्याने सईद मिर्झा, केतन मेहता सगळ्यांना सहाय्य केलं. स्वत:साठी काही न  मागता तो दुसऱ्यांसाठी काम करत राहायचा. त्याने ‘अरविंद देसाई की खोज’, ‘मोहन जोशी हाजिर हो’, ‘चक्र’ वगैरे चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तो एकदा माझ्याकडे पटकथा घेऊन आला. मी ती वाचल्यावर म्हटलं, ‘हे काय वायफळ लिहिलं आहेस?’ तेव्हा तो म्हणाला, ‘मी तुला एकदा वाचून दाखवेन.’ त्याने ते स्क्रिप्ट वाचून दाखवलं तेव्हा लक्षात आलं की, ती गोष्ट केवळ गमतीशीर नाहीए, तर त्यात त्याच्या मनातलं सारं कागदावर अचूक उतरलं होतं. एवढा सच्चा, वास्तवदर्शी चित्रपट त्या काळात तरी दुसरा कोणता झालेला नव्हता. म्हणूनच ‘जाने भी दो यारो’ हा कुंदनचा चित्रपट आजही टिकून आहे. कुठे ना कुठे प्रत्येकालाच हा चित्रपट एक आरसा दाखवतो. ‘त्याचा सीक्वल का काढला नाही?’ असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. पण वास्तव हे आहे, की त्यावेळी एखाद्या पोलिसाने तुमच्याकडून आठ आणे लाच म्हणून घेतले तर तेव्हा ती खूप मोठी गोष्ट वाटे. आता भ्रष्टाचाराची पातळी दाखवायची असेल तर पोलिसाला पन्नास पैसे नाही, तर पन्नास हजार रुपये घेताना दाखवावं लागेल. तसं पहायला गेलं तर ‘जाने भी दो यारो’चा सीक्वल करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण भ्रष्टाचार आकाशाएवढा मोठा झाला आहे. कुणीतरी या भ्रष्टाचारावर नेमकं बोट ठेवणारा ‘जाने भी दो यारो’सारखा चित्रपट काढणं आज गरजेचं आहे. ‘जाने भी दो यारो’ आजच्या काळात करायचा झाला तर त्यातला महाभारताचा प्रसंग आता दाखवता येणार नाही. कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. अगदी जावेद अख्तरही मध्यंतरी म्हणाले होते की, ‘शोले’ त्यांना आता करता येणार नाही. त्यातला जो मंदिरातला प्रसंग आहे.. धर्मेद्र देवाच्या आवाजात बोलला आहे, ते आता दाखवलं तर कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशी परिस्थिती आहे आजची! पण मी आशावादी आहे. आत्ताचे जे चित्रपटकर्मी आहेत त्यांना यातून मार्ग कसा काढायचा, ते माहिती आहे. आणि त्यामुळेच मला थोडीशी आशा वाटते आहे.

या चित्रपटाचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. कुंदनला या चित्रपटासाठी प्रमुख स्त्री-कलाकार निवडणं फारच कठीण गेलं होतं. रेणू सलुजाच्या भूमिकेसाठी कुंदनला झीनत अमानसारखं कुणीतरी हवं होतं. पण झीनत अमान त्यावेळी खूप मोठी स्टार होती. त्यामुळे रेणूच्या भूमिकेत तो तोल साधला गेला नसता असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्हीच त्याला त्या निर्णयापासून परावृत्त केलं. मग या भूमिकेसाठी शोभा डेचा विचार झाला. पण तिला अभिनय जमणार नाही म्हणून तोही विचार सोडून देण्यात आला. पुढे या भूमिकेसाठी अपर्णा सेनची आठवण झाली; जी या भूमिकेसाठी अचूक ठरली असती. पण कुंदनने तिच्यासमोर स्क्रिप्टचं नरेशन करताना अपर्णाला डुलकी लागली. कुंदन अतिशय वाईट पद्धतीने कथाकथन करत असे. अपर्णा सेन ही स्वत: हुशार दिग्दर्शिका होती. दिसायला सुंदर होती. साहजिकच त्याला तिच्यासमोर स्क्रिप्ट वाचताना दडपण आलं होतं. ‘मी यात काय काम करणार? ऐकतानाच मला झोप आली..’ असं तिने सांगितलं.

त्यावेळी मी पुण्यात एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. कुंदन माझ्याकडे आला. तेव्हा मी त्याला सांगितलं की, भक्ती बर्वे नावाची एक मराठी अभिनेत्री आहे. तिच्या नाटकाचा आज प्रयोग आहे. तू तो पाहून घे. भक्ती तेव्हा ‘हँड्स अप’ नावाचं नाटक करत होती. खरं तर ते भक्तीचा दमदार अभिनय असलेलं नाटक नव्हतं. मात्र, भक्ती ही रंगमंचावरची मी आजवर पाहिलेल्या अभिनेत्रींपैकी सर्वोत्तम अभिनेत्री होती याबद्दल माझी खात्री पटली होती. मी तिची खूप नाटकं पाहिलेली आहेत. रंगमंचावरचा तिचा अभिनय हा अचंबित करणारा असायचा. कुंदनने भक्तीचं नाटक पाहिलं.. आणि भक्तीची निवड झाली, हे वेगळं सांगायला नकोच.

गल्लाभरू चित्रपटांतील सहभाग..

मी सुरुवातीच्या काळात ‘सुनयना’सारखे तद्दन व्यावसायिक चित्रपट केले, हे खरंय. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की, झाडांभोवती नाचगाणं करणं हे आपल्याला जमणारं नाही. मला वाटतं, तुमच्या गरजा काय आहेत, हे इथे महत्त्वाचं ठरतं. अनेकांना वाटतं- आपल्याला आयुष्यभर चित्रपट मिळतील की नाही.. पैसे कमावता येतील की नाही.. काहीजण मग या लोभाला बळी पडतात. कलाकाराने आधी ठरवलं पाहिजे, की आपल्याला अमुक एक पद्धतीचा चित्रपट करावासा वाटत असेल तर त्याने तो जरूर करावा. त्यातून पैसे मिळतील की नाही, हा विचार तिथे उपयोगाचा नाही. बऱ्याच वेळा असं होतं, की तुमच्याही नकळत बॉलीवूड जे सांगतं त्यावर तुम्ही विश्वास ठेवू लागता. तुम्ही तडजोडी करत जाता. आणि मग आपल्याला हेच करायचं होतं, असं सांगत आपल्या या कृतीला दुजोरा देता. असं होता कामा नये. कलाकारांनी आपलं स्वत्व जपलं पाहिजे. अनेक चित्रपटकर्मीचं असं होताना मी पाहिलेलं.. अनुभवलेलं आहे. मला त्यांची खरंच काळजी वाटते. मराठीत या घडीला बरेच हुशार चित्रपटकर्ते आहेत. त्यांची या परिस्थितीत घुसमट झालेली मी स्वत: पाहिली आहे.. पाहतो आहे.

दुबे श्रेष्ठ!

एनएसडीत मी अल्काझींचा शिष्य होतो. अल्काझी आणि सत्यदेव दुबे यांचं कधीच एकमेकांशी पटलं नाही. मला वाटतं, तो दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वांमधील वाद होता. मी एनएसडीत होतो तेव्हा अल्काझींच्या नाटकांतली भव्यता, त्यातला चकचकीतपणा हे सारं मला भारावून टाकणारं ठरलं होतं. दुबेजींच्या बाबतीत सांगायचं तर त्यांची निर्मितीमूल्ये साधी असत. मला ते फोरसं रुचत नसे. एकदा अभिनेत्री ज्योती सुभाष मला एक मराठी नाटक बघण्यासाठी खूप आग्रह करून घेऊन गेली. ‘आधे अधुरे’ हे नाटक. मी म्हटलं, मला मराठी समजत नाही. पण ती म्हणाली, ‘ तू चलच.’ ‘कोण काम करतंय नाटकात?’ असं मी विचारलं. डॉ. श्रीराम लागू त्यात काम करत होते. त्या दिवशी प्रयोगात डॉ. लागूंनी रंगमंचावर जो अभिनय पेश केला, त्या तोडीचा अभिनय मी कुठेही कधीच पाहिला नव्हता. हे नाटक हिंदीत अमरीश पुरी आणि ओम पुरी यांनी केलेलं मी पाहिलं होतं. पण मला ते ‘ओके’ वाटलं होतं. पण डॉ. लागूंनी या नाटकात जे काम के लं होतं ते पाहिल्यावर ज्योतीला काय म्हणायचं होतं हे माझ्या लक्षात आलं. दिग्दर्शक म्हणून दुबेजींची काय ताकद होती, हेही मला तेव्हा कळून आलं. त्यानंतर मी दुबेजींची अनेक नाटकं पाहिली. ‘हयवदन’ पाहिलं. त्यांच्याबरोबर कामही केलं. दुबेजींचं थिएटर म्हणजे प्रेक्षकांशी थेट जोडून घेणारं जिव्हाळ्याचं नाटक होतं. त्यावेळी मला अल्काझींच्या नाटकातील भव्यतेची गरज तिथे वाटली नाही. वाईट इतकंच वाटायचं, की इतकं सुंदर नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र फारसे नसत. पण दुबेजींनी याचा कधीच विचार केला नाही. ते स्वत:च्या हिमतीवर नाटकं करत. त्यांना शोमनशिपशी काही देणंघेणं नव्हतं. या दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये नाटय़निर्मितीची जी प्रेरणा होती, ध्यास होता, तो तितकाच उत्कट होता. मला या दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांसोबत काम करण्याचं भाग्य लाभलं. पण या दोघांची तुलना करायचीच झाली तर मी अल्काझींपेक्षा दुबेजींची प्राधान्याने निवड करेन..

नवी माध्यमं..उद्याचं भविष्य!

लघुपट आणि वेब सीरिज हे उद्याचं भविष्य आहे. ज्यांच्याकडे चित्रपट काढण्यासाठी पैसे नाहीत त्यांना आपले कलागुण सिद्ध करण्याची संधी या माध्यमातून मिळते आहे. दहा मिनिटांचा चित्रपट करणं ही

खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. एखादी कादंबरी लिहिणंही एक  वेळ सोपी गोष्ट आहे, पण दहा मिनिटांत एखादा विषय त्यातल्या नाटय़ासह मांडणं ही खचितच सोपी गोष्ट नाही. लघुपट- वेब सीरिजमुळे दिग्दर्शकांना आता आपल्या मनाजोगते प्रयोग करून पाहता येताहेत.

भूमिका जगणं..

आपण जी व्यक्तिरेखा साकारतो त्यापासून काहीएक अंतर राखणं ही कलाकाराची जबाबदारी असते. मला त्या व्यक्तिरेखेतून बाहेर पडता येत नाही, असं म्हणणाऱ्या कलाकारांवर माझा विश्वास नाही. असं करून तुम्ही तुमची मानसिकताच धोक्यात घालत असता. भूमिका जगणं या गोष्टीशी मी सहमत नाही. नाटकातील भूमिकेपासून कलाकारानं योग्य ते अंतर राखायलाच हवं. अन्यथा त्याला जगणं मुश्कील होईल.

ब्रॉडवेचं अंधानुकरण अयोग्य

आपल्याकडे ब्रॉडवेसारखं नाटक का होत नाही? त्याचं खरं उत्तर आहे- परदेशात जसे रोज ब्रॉडवेवर नाटकाचे शो केले जातात तसं आपल्याकडे करायचं ठरवलं तर आपण काय विषय घेणार? त्या प्रकारे ‘मुगल-ए-आझम’सारख्या नाटकाचे प्रयोग इथे केले जातात. ज्यात ‘चित्रपटा’चा अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे अत्यंत चुकीचं आहे.