हिंदी चित्रपटांना गुन्हेगारीचे आकर्षण यासाठी असते, की त्यानिमित्ताने प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या घटना दाखवता येतात. या माध्यमाची अटच मुळी घटना, घडामोडी, कारवाया असते. त्यामुळे एखादा गुन्हेगार बालपणापासून कसा वाढला, त्याच्या प्रेरणा कोणत्या, त्याला निबर व कठोर मन कसे लाभले, आदी बाजू चित्रपटात सांगता येत नाहीत. ‘जडणघडण’ हा चित्रपटांचा विषय असू शकतो. मात्र, ती दाखवणे फार कंटाळवाणे होईल. म्हणून कादंबरी हा साहित्यप्रकार अशी जडणघडण वा गुन्हेगाराची घडण योग्य तऱ्हेने हाताळू शकतो. ‘क्राइम अँड पनिशमेंट’ ही दस्तवयेस्की यांची कादंबरी गुन्हेगाराच्या मनोरचनेची कहाणी सांगते. तसाच नव्हे, परंतु माणूस गुन्हेगार कसा बनतो याचा शोध विभूती नारायण राय या हिंदी लेखकाने ‘लोकशाहीची ऐशीतैशी’ या कादंबरीत घेतलेला आहे. हे शीर्षक आणि त्या अनुषंगाने हाताळलेला विषय कादंबरीच्या अगदी शेवटी येतो. त्यामुळे शीर्षक चांगलेच दिशाभूल करणारे आहे.

प्रेमपाल यादव ऊर्फ पी. पी. या गुन्हेगाराची लहानपणापासूनची वाढ, त्याच्या आसपासचे वातावरण, निवडणुका, राजकारण, खेडी व त्यांची अर्थरचना हा विषय हाताळत गुन्हेगाराची उत्पत्ती कशी होते, याचे वर्णन राय यांनी केले आहे. उत्तर भारतातील अहिर व गुजर जातीच्या शेतकरी कुटुंबांचे जगणे, शेतीपेक्षा दारू गाळणे त्यांना कसे लाभदायी असते, हे राय स्पष्ट करतात. शिक्षणाविषयी फार आदर नाही की शेतीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत अशा परिस्थितीत पी. पी. हळूहळू गुन्हेगारीकडे वळतो आणि सराईत बनतो. उत्तरेत अशा शेतीत अडकलेल्या परिवारात एखाद् दोन मुले धटिंगण, गुंड म्हणून मुद्दाम वाढवून जगण्याची लढाई कशी सुकर व निर्धोक केली जाते याचे वर्णन या कादंबरीत आहे. ते अर्थातच तीस-चाळीस वर्षांपूर्वीचे आहे. आता ते तसे नसावे. तरीही १९६७ नंतर काँग्रेसला जसजसे विरोधी पक्षांनी पराभूत करणे आरंभले, तसा गुन्हेगारांचा उत्तरेतील हा कारखाना तुफान चालला, असे लेखक सूचित करतो. सरंजामी वर्तन, शोषण, अत्याचार आणि सत्तेसाठी वाट्टेल त्या थरास जाण्याची राजकारण्यांची तयारी यामुळे गुन्हेगारी बळावली. तुरुंग, खून, अपहरण, पोलीस व त्यांचा कारभार, कायद्याचा गैरवापर असे सर्व काही या कादंबरीत आहे.

लेखक स्वत: पोलीस अधिकारी होते. त्यामुळे त्यांनी गुन्हेगार जन्मायला तुरुंग कसा जबाबदार असतो याचे नेमके वर्णन केलेले आहे. ते लिहितात, ‘पी. पी.ला यावेळी औषधांपेक्षाही सहानुभूतीची जास्त गरज होती. कुणी जरा वेळ जरी त्याच्याजवळ बसला असता, त्याच्या जखमांबाबत चौकशी केली असती तरी पी. पी. हमसून हमसून रडला असता.  आणि अश्रूंच्या बरोबरीनं त्याच्या मनाचं काठिण्यदेखील वाहून गेलं असतं; जे इथल्या उपेक्षेमुळे त्याच्या मनात निर्माण झालं होतं. पण रात्रभर त्याच्याजवळ कुणीच आलं नाही आणि त्याचं रूपांतर पत्थरदिल माणसात झालं.’

या कादंबरीत धर्म, अध्यात्म, देवदेवता, साधुपुरुष, भक्ती, जातपंचायती असे काही नाही. त्यामुळे एक तरुण कठोर गुंड होत असताना त्याला त्यापासून परावृत्त करणारी सामाजिक शक्ती गावात नसावी याचे आश्चर्य वाटते. आई-वडील व अन्य नातलग पी. पी.च्या इतक्या धाकात जगतात, की त्यांची अगतिकता ते जगत असलेल्या भौगोलिक परिसराची वाटते. एक प्रकारची अटळता या परिस्थितीत जगणाऱ्यांची आहे की काय असे भासत राहते. एका व्यक्तीचे चित्रण करता करता लेखक इतका त्यात गुंगतो, की तो समाज विसरतो अन् अवघी कादंबरी फिल्मी वाटत राहते. मानसिक चित्रणात जर ही कादंबरी खरी उतरली असती तर ती उजवी ठरती. महत्त्वाचे म्हणजे एकही स्त्रीपात्र त्यात नाही. गुन्हेगारी व स्त्रीसंबंध या कादंबरीत आढळत नाहीत. पुरुष आणि पुरुषी खलप्रवृत्ती, हिंस्रपणाच त्यात आहे.

लेखकाने तुरुंगातील वागणूक, बालमनाचे गुन्हेगारीविषयीचे आकर्षण, शेतीतील कष्ट यांसारखे महत्त्वाचे विषय फार ओझरते चितारलेत. तसाच एक महत्त्वाचा विषय लेखक असा हाताळतो- ‘..पी. पी.ने इतका पैसा कमावला होता, की गुन्हेगारी जगतात त्याचं स्वत:चं असं एक स्थान निर्माण झालं होतं. त्यानं आता जमिनीचा व्यवहार करायला सुरुवात केली. देशाच्या राजधानीच्या आसपास जी छोटी-मोठी गावं होती, ती वेगानं शहरीकरणाच्या प्रक्रियेत खेचली जात होती. पंजाबमधील दहशतवादी घटनांनी जमिनीचे भाव एकदम गगनाला भिडले. राजधानीत एक इंच जमीनदेखील उपलब्ध नव्हती. त्यामुळे लोक वेगानं जवळच्या गावांमध्ये राहण्यासाठी जमीन शोधू लागले होते. प्रत्येक वर्षी राजधानी आणि तिच्या आसपासच्या इलाख्यातील लोकसंख्येत लाखांनी भर पडू लागली. पंजाबमधील अशांततेमुळे लोक कामधंद्याच्या शोधात बाहेर पडले आणि ते रेल्वे स्टेशन, फुटपाथ आणि झोपडपट्टीत आसरा शोधणाऱ्या गर्दीचा एक भाग बनून गेले. एक छोटंसं घर किंवा एक जमिनीचा तुकडा हेच त्यांचं स्वप्न बनलं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपली आयुष्यभराची कमाई लुटायला तयार होऊ लागले.’

मतदान केंद्रे ताब्यात घेणे, एकगठ्ठा मतदान करणे यातून पी. पी.ला राजकीय सत्तेची ताकद कळते. तो निवडणुकीत उतरतो. त्यासाठी पत्रकार परिषद घेतो. दोन पत्रकारांना जबरीने दारू पाजू बघतो. त्यामुळे पत्रकार रागावतात. एक बागी नामक पत्रकार पी. पी.ला धडा शिकवू पाहतो. कादंबरीचा शेवट व आरंभ पत्रकारांसोबतच्या प्रसंगांचा आहे. शेवट पी. पी.च्या साम्राज्याला लेखणी कसा धक्का देते, असा आहे. पण तोही सांकेतिक आहे. तरीही कादंबरीचे नाव ‘लोकशाहीची ऐशीतैशी’ असे का द्यावेसे वाटले, कोण जाणे! अनुवाद ठीक आहे. प्रस्तावना रंगनाथ पठारे यांची आहे.

‘लोकशाहीची ऐशीतैशी’, मूळ लेखक- विभूती नारायण राय, अनुवाद- चंद्रकांत भोंजाळ, मैत्रेय प्रकाशन, किंमत- १६० रुपये, पृष्ठे- १५२.