प्रख्यात पोलिश सिनेदिग्दर्शक  आंद्रे वायदा यांच्या चित्रकीर्दीचा वेध..

पोलंडची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि तिच्यामागची पोलिश संवेदना या दोन्हींची थक्क करणारी प्रचीती सातत्यानं आपल्या कलाकृतींमधून देणारे सिनेदिग्दर्शक आंद्रे वायदा आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीअखेर वयाच्या नव्वदीत काळाच्या पडद्याआड गेले. पहिल्या महायुद्धापर्यंत जर्मनीचा भाग असलेलं पोलंड जर्मनीच्या पराभवामुळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून आधुनिक जगाच्या नकाशावर आलं. त्याच्या जवळपासच (१९२६) वायदांचा जन्म झाला. नंतरचा दीर्घकाळ पोलंडसाठी अंदाधुंदीचा ठरला. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभीच जर्मनीनं पोलंडवर हल्ला केला. अखेरीस रशियन फौजांनी नाझींचा पाडाव केला, पण तो पोलंडसह मध्य युरोप कम्युनिस्ट वर्चस्वाखाली आणण्यासाठी. १९८० मध्ये कामगार नेते वॉवेन्सांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकारविरोधात सॉलिडॅरिटी चळवळ सुरू झाली. पण १९८१ मध्ये ‘मार्शल लॉ’ लादला गेला. या काळातलं गुंतागुंतीचं वास्तव वायदांच्या चित्रपटांत दिसतं. या इतिहासाचा आरसाच ते आपल्यासमोर उभा करतात. १९५७ च्या ‘कॅनॉल’पासून २००७ च्या ‘कातिन’पर्यंत अनेक चित्रपटांतून वायदांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या पोलंडचे विविध पलू दाखवले. तर १९७७ च्या ‘मॅन ऑफ मार्बल’पासून २०१६ च्या ताज्या ‘आफ्टरइमेज’पर्यंत अनेक चित्रपटांतून त्यांनी कम्युनिस्ट राजवटीखालचं पोलंड दाखवलं.

स्टॅलिनच्या फौजांनी कातिनच्या जंगलात हजारो पोलिश नागरिकांची निर्घृण कत्तल केली. त्यात वायदांचे वडील मारले गेले. तेव्हा वायदा तेरा वर्षांचे होते. वेळोवेळी होत गेलेले सत्ताबदल आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणात्मक कोलांटउडय़ाही त्यांनी जवळून अनुभवल्या. पोलंडचा शोकात्म इतिहास प्रत्यक्ष जगल्यामुळे माणसांच्या जगण्याचा नतिक पायाच परिस्थितीमुळे कसा हादरतो याची जाण वायदांना आली. विलक्षण परिणामकारकरीत्या त्यांनी ती आपल्या सिनेमात आणली.

चित्रपटाचं रीतसर शिक्षण घेण्यापूर्वी वायदांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं. दृश्यचौकटीची त्यांची समज त्यातून घडली. उदा. उद्ध्वस्त चर्चमध्ये उलटा लटकणारा ख्रिस्त, युद्धानंतरची विदग्ध भूमी, या चौकटीत जखडलेला नायक आणि त्याची मत्रीण ही ‘अ‍ॅशेस अ‍ॅण्ड डायमंड्स’मधली (१९५८) दृश्यचौकट जागतिक सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाली आहे. ‘कॅनॉल’ (१९५७) हा चित्रपट वॉरसॉच्या रस्त्यांखालून जाणाऱ्या गटारांत घडतो. सांडपाणी आणि अंधार यांसारख्या घटकांद्वारे वायदा प्रेक्षकाला अधोविश्वाचा सुन्न करणारा अनुभव देतात. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात घडणाऱ्या या दोन चित्रपटांद्वारे वायदांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वास्तवाच्या विराट दर्शनानं थक्क करते.

वायदांनी अनेक प्रायोगिक नाटकंही दिग्दर्शित केली. प्रसंग परिणामकारक करण्यासाठी नाटय़मयता हवी, पण मेलोड्रामा नको, ही कसरत त्यामुळेच वायदांना चित्रपटांतही साधली. एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्याची त्यांची निवडही चोख असे. ‘अ‍ॅशेस अ‍ॅण्ड डायमंड्स’चा नायक साकारणारा चिबुल्स्की, १९७७ च्या ‘मॅन ऑफ मार्बल’पासून २००८ च्या ‘स्वीट रश’पर्यंत वायदांच्या अनेक चित्रपटांत दिसलेली क्रिस्तिना यांदा किंवा ‘लॅण्डस्केप आफ्टर द बॅटल’ (१९७०) आणि इतरही चित्रपटांत दिसलेला डॅनिएल ओलब्रिच्स्की असे गुणी अभिनेते वायदांच्या चित्रपटांत अक्षरश: लखलखतात. अमेरिकेतल्या यशस्वी कारकीर्दीनंतर मायभूमीकडे परतलेला ऑर्केस्ट्रा कंडक्टर साकारण्यासाठी (‘कंडक्टर’- १९८०) वायदांनी शेक्सपिअरच्या नाटकांमधून घडलेल्या जॉन गिलगुडना निवडलं. वय झालेलं असूनही आणि कारकीर्दीचा बहर ओसरला असूनही जो अभिजात दिमाख गिलगुड दाखवतात तो पाहून आपण गिलगुडबरोबर वायदांच्या पारखी नजरेलाही दाद देतो. फ्रेंच राज्यक्रांतीतल्या शोकात्म नायकाच्या भूमिकेत (‘दॉन्तों’- १९८३) जेरार दपार्दिअसारखा कसलेला अभिनेता आपल्या कारकीर्दीतलं एक शिखर जेव्हा गाठतो तेव्हा त्याचं मुख्य श्रेय जरी खुद्द अभिनेत्याला जात असलं, तरीही त्याच्याकडून सर्वोत्कृष्ट काम करून घेणाऱ्या वायदांकडेही काही श्रेय जातंच.

वायदांच्या चित्रपटांतलं संगीत केवळ आशयाला अनुरूपच नव्हे, तर अनेकदा आशय अधोरेखित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. उदा. ‘इनोसंट सॉरसर्स’मध्ये (१९६०) वायदा युद्धोत्तर काळात आयुष्याची मजा घेणाऱ्या तरुण-तरुणींचे नातेसंबंध दाखवणारी तलम कथा सांगतात. साठच्या दशकात जाग्या होणाऱ्या या नव्या जाणिवांशी जवळीक साधणारं जॅझ संगीत ते त्यासाठी वापरतात. ‘मॅन ऑफ मार्बल’ची नायिका कम्युनिस्ट राजवटीनं विस्मृतीच्या गत्रेत ढकललेल्या एका कामगाराचा अत्यंत चिवटपणे आणि परिणामांची पर्वा न करता शोध घेत असते. कम्युनिस्ट नोकरशाही तितक्याच नेटानं तिला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून परावृत्त करत असते. नायिकेची अथक ऊर्जा व्यक्त करण्यासाठी वायदा जलद ठेक्याचं पॉप संगीत वापरतात. अभिजात पाश्चात्त्य संगीताच्या पायावर उभ्या असलेल्या ‘कंडक्टर’मधला आशयगर्भ संगीताचा वापर चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेतो.

पोलंडच्या राजकीय नेतृत्वाशी उघड किंवा छुपा संघर्ष करता करताच वायदांची कारकीर्द घडली. कम्युनिस्ट राजवटीला समाजवादी वास्तववादी (Socialist Realism) शैलीतले प्रचारकी चित्रपट हवे असायचे. पण वायदांचा सिनेमा तसा नाही. त्यांच्या व्यक्तिरेखा स्खलनशील असतात. त्यामुळे नायक असण्यापेक्षा त्या ‘माणूस’ असतात. त्या कोणत्याही विचारसरणीच्या अधीन होऊ शकत नाहीत. तशा त्या होऊ लागल्याच तर त्यातल्या नतिक गुंतागुंतीत त्या गुरफटून तरी जातात किंवा त्यांचं माणूसपणच हरवून बसतात. या जीवनदृष्टीचं मूळ कदाचित पोलंडच्या इतिहासातच आहे. उदा. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात पोलिश जनतेनं नाझींशी गनिमी काव्यानं लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपला लढा आदर्शासाठी आहे असं त्यांना वाटत होतं. पण पोलंडवर कम्युनिस्ट सत्ता आणण्यासाठी रशियन फौजांनी त्याचा गरफायदा घेतला. ‘कॅनॉल’मध्ये याचं चित्रण दिसतं. ‘मॅन ऑफ मार्बल’ची नायिका बिरकुत या वीटकामगाराच्या शोधात आहे. पन्नासच्या दशकात आदर्श कामगार म्हणून तो गौरवला गेलेला असतो. कम्युनिस्ट विचारसरणीचा यशस्वी चेहरा म्हणून तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला ‘सेलेब्रिटी’ बनवून त्याचा पद्धतशीर आणि प्रचारकी वापर केलेला असतो. मात्र, गरसोयीचा ठरू लागताच तो बाजूला फेकला गेलेला असतो. कम्युनिस्ट विचारसरणीतून सामान्य माणसाचं भलं होईल, हा विश्वास किती भाबडा व अंतिमत: जीवघेणा ठरतो याचं मूर्त स्वरूप बिरकुतच्या शोधाच्या गोष्टीत दिसतं. अनेक वर्षांपासून लिहून तयार असलेली ही पटकथा सरकारी परवानगीविना पडून होती. आपल्याकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे हे दाखवण्याची सरकारला जेव्हा गरज भासली तेव्हाच वायदांना हा चित्रपट पूर्ण करता आला. मात्र, अगदी मोजक्या चित्रपटगृहांतल्या खेळांपुरतीच परवानगी त्याला मिळाली. ही अघोषित मुस्कटदाबीच होती. पण जनतेला त्यात वास्तवाचं इतकं परिणामकारक चित्रण दिसलं, की केवळ तोंडी प्रसिद्धीतून चित्रपट जोरदार चालला. १९८१ चा ‘मॅन ऑफ आयर्न’ तर सरळसरळ सरकारविरोधातल्या सॉलिडॅरिटी चळवळीविषयीच होता. पोलिश जनतेनं त्याचंही उत्साहानं स्वागत केलं. फ्रान्समधल्या कान चित्रपट महोत्सवातला सर्वोच्च ‘गोल्डन पाम’ पुरस्कारही त्याला मिळाला. पण १९८१ मध्ये पोलंडवर ‘मार्शल लॉ’चा विळखा पडला आणि लगेच चित्रपटावर बंदी आली. यानंतर काही काळ वायदांना पोलंडबाहेर राहावं लागलं. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या सत्तासंघर्षांवर आधारित ‘दान्तों’ चित्रपट त्यांनी मग फ्रान्समध्ये दिग्दर्शित केला. दान्तों व रोबेस्पिएर या राज्यक्रांतीच्या दोन महानायकांमधला वैचारिक अंतर्विरोध आणि त्या संघर्षांअंती बळी गेलेल्या दान्तोंची गोष्ट ही एक प्रकारे सॉलिडॅरिटी चळवळीबद्दलची टिप्पणी होती असं तेव्हा मानलं गेलं. पण तत्कालीन संदर्भाशिवाय हा चित्रपट आज पाहिला तरीही ‘सत्ता विरुद्ध विचारसरणी’ किंवा ‘आदर्शवाद विरुद्ध व्यवहार्यता’ अशी त्यातली द्वंद्वात्मक मांडणी अगदी ताजी वाटते.

कालातीत आणि म्हणून प्रत्येक काळात नवं काही सांगणाऱ्या अभिजात कलाकृतीचा अनुभव ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरच्या किंवा राजकीय भाष्य करणाऱ्या चित्रपटांतून वायदांनी दिलाच; पण व्यक्तिगत नातेसंबंधांविषयी भाष्य करणाऱ्या त्याच्या तुलनेनं कमी गाजलेल्या चित्रपटांतूनही दिला (‘इनोसंट सॉरसर्स’- १९६०; ‘हंटिंग फ्लाइज’- १९६९). सिनेचित्रीकरणाच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या काही चित्रपटांद्वारे (‘एव्हरीथिंग फॉर सेल’- १९६८; ‘स्वीट रश’- २००८) कलाकारांचं भावविश्व दाखवता दाखवता ‘कलेचं प्रयोजन काय असावं?’ किंवा ‘जगणं कशामुळे सुसह्य़ होतं?’ यांसारख्या गहन प्रश्नांवरही वायदा मूलगामी भाष्य करतात. मुळात माणसांविषयी वायदांना किती आस्था आहे आणि माणूसपणाच्या गाभ्याशी जाण्याचा त्यांनी किती सातत्यानं प्रयत्न केला, हे जाणवत राहतं. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या अखेरच्या काळातही ‘कातिन’  व ‘स्वीट रश’मध्ये त्यांनी या माणूसपणाचं लख्ख दर्शन घडवलं. कलात्मकतेशी तडजोड न करता आणि कलाकृती ढोबळ वा प्रचारकी होऊ न देता सकस राजकीय-सामाजिक भाष्य करणं महाकठीण असतं. वायदांना ते अनेकदा साधलं. जागतिक सिनेमाच्या इतिहासात त्यामुळे वायदांचं स्थान अढळ आहे.

अभिजीत रणदिवे – rabhijeet@gmail.com