तेजश्री गायकवाड

खरंतर फिटनेस डान्स ही संकल्पना नवीन नाही. वर्षांनुवर्षे आवड म्हणून, स्टॅमिना वाढवण्यासाठी, शरीर लवचीक राहावे यासाठी डान्स केला जात होताच. आता फक्त लोक आपल्या आरोग्याचा जास्त विचार करू  लागले आहेत. हेल्थकेअर आणि फिट लाइफस्टाइल याकडे आवर्जून लक्ष देणाऱ्यांना म्हणूनच डान्स फ्लोअरवर घाम गाळत आनंद आणि फिटनेस साधणाऱ्या या फिटनेस डान्सचं अफलातून मिश्रण भलतंच आवडू लागलं आहे..

भारतीयांचं सेलिब्रेशनशी काही भलतंच नातं आहे. आपण प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतोच. आणि सेलिब्रेशन करायचं तर उत्तम फूड, उत्तम म्युझिक आणि उत्तम डान्स व्हायलाच हवा. याच त्रिसूत्रीला एकत्र क रत गेल्या दीड वर्षांत फिटनेस डान्स हा प्रकार प्रसिद्ध झाला आहे. चांगलं म्युझिक वाजलं की लहान असो वा मोठे पाय थिरकतातच. हेच लक्षात घेऊन व्यायाम करण्यासाठी ‘फिटनेस डान्स’ ही संकल्पना सगळीकडे लोकप्रिय होऊ लागली आहे. खरंतर फिटनेस डान्स ही संकल्पना नवीन नाही. वर्षांनुवर्षे आवड म्हणून, स्टॅमिना वाढवण्यासाठी, शरीर लवचीक राहावे यासाठी डान्स केला जात होताच. आता फक्त लोक आपल्या आरोग्याचा जास्त विचार करू लागले आहेत. हेल्थकेअर आणि फिट लाइफस्टाइल याकडे आवर्जून लक्ष देणाऱ्यांना म्हणूनच डान्स फ्लोअरवर घाम गाळत आनंद आणि फिटनेस साधणाऱ्या या डान्स फिटनेसचं अफलातून मिश्रण भलतंच आवडू लागलं आहे..

फिटनेस डान्स म्हटलं की पहिला डान्सचा प्रकार समोर येतो तो म्हणजे ‘झुम्बा’. झुम्बा हा फिटनेस डान्स प्रकार खूप प्रसिद्ध आहे. लोकांना बाकी कोणतेही प्रकार माहीत असो वा नसो पण झुम्बा माहीत असतोच. मोठय़ा आवाजातील बॉलीवूड किंवा वेस्टर्न म्युझिक, डान्स स्टेप्स आणि योग्य आहार याचं एकत्रीकरण म्हणजे झुम्बा हा डान्स प्रकार. याबद्दल ‘फील द बिट्स’ हे ब्रीदवाक्य समजून गेल्या काही वर्षांपासून झुम्बा डान्स शिकवणारी तरुणी श्रुती साळुंखे सांगते, ‘धकाधकीच्या जीवनशैलीत झुम्बा डान्स कामाचा ताणताणाव कमी करायला मदत करतो. मला स्वत:ला कॉलेजमध्ये शिकताना, अभ्यास करताना मनावर खूप ताण यायचा. तेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये झुम्बा वर्कशॉप केलं आणि मला वेगळाच आराम मिळाला. म्हणून मी स्वत: त्याचं योग्य शिक्षण घेतलं आणि आता हाच डान्स प्रकार इतरांना शिकवत त्यांनाही ताणावर मात करण्यासाठी मदत करते आहे.’ श्रुतीच्या मते झुम्बा हा प्रकार फक्त फिजिकली फिट राहण्यासाठी मदत करतो असे नाही, तर झुम्बामुळे मानसिक आरामही खूप मिळतो आणि म्हणूनच हा डान्स प्रकार लोकप्रिय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जिममध्ये किंवा योगा करायला जायला तसा कंटाळा येतो. पण झुम्बा करायला जायचं म्हटलं की व्यायाम करायला जातोय असं वाटतच नाही. झुम्बा म्हणजे एक प्रकारची पार्टीच असते. एखाद्याला जास्त कष्ट न घेता वजन कमी करायचं असेल तर झुम्बा हा उत्तम प्रकार आहे, असं ती सांगते. झुम्बा शिकवताना तुमच्या वयानुसार डान्सच्या स्टेप्स बसवल्या जातात. दोन-तीन करत हळूहळू जवळ जवळ १२ ते १५ गाण्यावर बॅक टू बॅक डान्स केला जातो. यात  डान्स करताना जोरात ओरडायचंही असतं. त्या ओरडण्यामुळे वेगळी ऊर्जा येते आणि माणूस न थकता पुढे डान्स करू शकतो. शरीराचा प्रत्येक भाग व्यवस्थित स्ट्रेच होईल अशाच प्रकारे डान्सच्या स्टेप्स बसवलेल्या असतात. झुम्बा हे फक्त वजन कमी करणाऱ्यांसाठी आहे असंच सगळीकडे म्हटलं जातं, पण झुम्बा हा फिटनेस डान्सचा प्रकार आहे त्यामुळे फक्त फिटनेससाठी म्हणूनही लोक हा डान्स शिकू शकतात. फक्त फिटनेससाठी डान्स शिकणाऱ्यांनाही रोजचं परफेक्ट डाएट सांभाळावं लागतं. डाएट प्लॅनिंगशिवाय एखाद्या बारीक माणसाने झुम्बा डान्स केला तर त्याचं वजन आणखी कमी होतं. म्हणून डाएट आणि डान्सचा समतोल यात प्रत्येकाने साधला पाहिजे, अशी माहितीही तिने दिली.

फिटनेस डान्स म्हणून आजच्या घडीला झुम्बा जरा जास्तच लोकप्रिय आहे. मात्र याखेरीज अनेकांचा आवडता डान्स प्रकार म्हणजे सालसा. खरंतर सालसा हा डान्स प्रकार फिटनेस डान्स म्हणून प्रसिद्ध नाही. तो अनेकांच्या मते निव्वळ कपल डान्स आहे, पण सालसा हा डान्स प्रकारही आपल्या फिटनेससाठी उपयोगी ठरतो, असं मत अभिनेता आणि स्वत: उत्तम नर्तक असलेला नकुल घाणेकर व्यक्त करतो. ‘सालसा हा डान्स प्रकार कोणत्याही वयाचे लोक सहज करू शकतात. यात शरीराच्या अमुक अमुक एका भागाचाच व्यायाम होतो असं नाहीये तर यात पूर्ण शरीराचा यात सहज व्यायाम होतो. महत्त्वाचं म्हणजे या डान्समुळे आपला स्टॅमिना वाढतो. लहानपणी आपण दोन बोटांमध्ये दोरा अडकवून जसे वेगवेगळे डिझाइन बनवायचो तसंच अगदी सालसाचं आहे. आपल्या जोडीदाराचा हात पकडून पूर्ण बॉडी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या दिशेला मूव्ह करत डान्सच्या स्टेप्स केल्या जातात. यामुळे आपला बॅलन्स, हाड आणि जॉइंट्स, मसल यामध्ये प्रगती तर होतेच याशिवाय हा कपल डान्स असल्यामुळे इमोशनल हेल्थ, समोरच्या माणसावरचा विश्वास अशी मानसिकदृष्टय़ाही सर्वागीण प्रगती होते,’ असं नकुल सांगतो.

झुम्बा आणि सालसाप्रमाणेच अ‍ॅरोबिक्स हा डान्स प्रकार फिटनेससाठी म्हणून केला जातो. बाकीच्या डान्स प्रकारांपेक्षा अ‍ॅरोबिक्स हा प्रकार तसा खूप जुना आहे. अनिशा मनकिकर नायडू ही तरुणी गेल्या वीस वर्षांपासून हा डान्स प्रकार शिकवते आहे. ‘अ‍ॅरोबिक्स हा डान्स प्रकार स्ट्रेन्थ, स्टॅमिना, वजन कमी करणे यासोबतच स्पेशली मसल, बोन्स यावर खूप उत्तमरीत्या काम करतो. अ‍ॅरोबिक्स हा प्रकार कोणीही करू शकतो फक्त अट एवढीच की आपल्या ट्रेनरला आपल्याला काही मसल किंवा बोनचा त्रास असेल तर तो सांगणे. कारण तशाच परस्थितीत जर अ‍ॅरोबिक्स केलं तर त्याचा उलटा परिणाम आपल्या शरीरावर होऊ  शकतो. अ‍ॅरोबिक्ससुद्धा योग्य डाएट प्लॅनच्या आधारे केला तर जास्त फायदेशीर ठरतो. अ‍ॅरोबिक्सबरोबरच पिलेट्स हा व्यायामाचा प्रकार एकत्र करूनही डान्स केला जातो. पिलेट्स यातील व्यायामाच्या स्टेप्स योग्यरीत्या कोरिओग्राफ करून वापरल्या जातात. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचा मी योग्य तो अभ्यास करते. कोणाला काय समस्या आहे हे नीट समजलं की त्यांच्यासाठी योग्य त्या पद्धतीने कोरिओग्राफी केली जाते. अनेकांची दुखणी अ‍ॅरोबिक्समुळे बरी झाली आहेत, अशी माहिती अनिशाने दिली.

सालसा, अ‍ॅरोबिक्स आणि झुम्बा हेच फक्त फिटनेस डान्सचे प्रकार आहेत असं नाही. आपला आवडता बॉलीवूड डान्स हाही एक प्रकारचा व्यायामच आहे. हिप हॉप, कन्टेम्पररी, बॅले, मॉर्डन जॅझ, बॅलेट असे विदेशी आणि भांगडा, लावणी, लेझीम असे देशी डान्स प्रकारही फिटनेससाठी फायदेशीर आहेतच. त्यात तुम्हाला नेमका कोणत्या प्रकारचा डान्स आवडतो हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या फिटनेसची सुरुवात करू शकता!