दर्शन केळजी

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

‘इडली, ऑर्किड आणि मी!’ पुस्तकाचे नाव कळताच माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. नावाप्रमाणेच हे पुस्तकही आगळेवेगळे आणि अजोड आहे. इडलीबरोबर ऑर्किड नावाचे श्रीमंती थाटाचे फूल काय करत असेल? आणि हा ‘मी’ म्हणजे नक्की कोण?, या प्रश्नांची उत्तरे मिळता मिळता पुस्तक वाचून कधी संपले याचा पत्ताच लागला नाही. त्यातून ही ओळ जास्त भावली. सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांचे हे आत्मचरित्र. या पुस्तकात वडील-मुलाच्या एका भावूक कथेबरोबरच काहीतरी वेगळे करायचे आणि त्यासाठी ‘रिस्क’ घ्यायची ही विठ्ठल कामत यांची जिद्द जास्त भावली. काहीतरी जगावेगळे करून पाहण्याच्या मानवी वृत्तीला बऱ्याचदा विरोध होतो. विठ्ठल कामतांनी जिद्दीला पेटून आपल्या उपाहारगृहात मांसाहरी पदार्थ व दारू उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला. सर्वसामान्य मराठी परिवारातून या गोष्टीला विरोध होणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. तरीही त्यावरून कितीही हॉटेलमध्ये भांडणतंटे झाले तरी हे काम न सोडण्याचा निर्णय, त्यांची प्रयोगशील वृत्ती आणि जबाबदारीची भावनाही दिसून आली आहे. आपल्या आयुष्यात कोणतेही नवे काम सुरू करताना एक तरुण म्हणून या आव्हानांना सर्वप्रथम स्वीकारलं पाहिजे कारण पहिला विरोध घरातून येतो, मग समाजातून. कोणतेही नवीन काम जर लोकांच्या किंवा घरातल्यांच्या तत्त्वात बसत नाही म्हणून आपण घाबरून त्यासाठी ती ‘रिस्क’ घ्यायचं टाळतो. असे न करता आपण ते आव्हान पेललं पाहिजे कारण शेवटी आपल्या मेंदूतून आलेल्या कल्पनेवरच आपण विविध प्रयोग करू शकतो. त्यामुळे कधी ना कधी समाजात त्या प्रयोगाला दाद मिळते आणि आपण पत्करलेला धोका यशस्वी ठरला आहे, आपले निर्णय योग्य होते याची पावती आपल्याला नक्कीच जीवनात मिळते. त्यामुळे आपल्या विचारांना, कल्पक वृत्तीला सतत जागं ठेवणं आणि त्या वृत्तीचा त्याग न करता ठरवल्यानुसार पुढे जात राहणं ही एका यशस्वी व्यक्तीची पहिली पायरी असते, असं या ओळीतून व्यक्त होतं.