News Flash

ब्रॅण्डनामा : रिबॉक

स्पोर्ट्स शूजच्या दुनियेतलं असं जुनं आणि प्रसिद्ध नाव ‘रिबॉक.’

रिबॉक

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

ब्रॅण्डचे यश कशाच्या आधारे मोजले जाते? आकडेवारीचे निकष काही असोत पण गुलजार यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की माझं गाणं रिक्षात वाजताना आढळलं की ते हिट होणार याची मला खात्री असते, त्याच पद्धतीने एखाद्या ब्रॅण्डचे डुप्लिकेट्स बाजारात दिसू लागले की समजावं, ब्रॅण्ड यशस्वी ठरलेला आहे. स्पोर्ट्स शूजच्या दुनियेतलं असं जुनं आणि प्रसिद्ध नाव ‘रिबॉक.’

इंग्लंडमधील बोल्टन परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय जोसेफ विल्यम फॉस्टरची प्रयोगशाळा होती, त्याच्या वडिलांच्या मिठाईच्या दुकानात. या दुकानातील त्याच्या बेडरूममध्ये तो अनेक प्रयोग करीत असे. त्याला उत्तम प्रतीचे खेळाचे बूट तयार करायचे होते. अथक प्रयत्नांनतर त्याला त्यात यश आलं. तो काळ होता, १८९५ चा. उत्तम दर्जाचे स्पाइक्ड रनिंग शूज त्याने बनवले. हे धावपटूंसाठी सर्वोत्तम होते. या शूजब्रॅण्डला त्याने स्वत:चं नाव दिलं, ‘जे डब्ल्यू फॉस्टर शूज.’ पुढे त्याची दोन्ही मुलं या व्यवसायात आल्यावर ब्रॅण्डचं नाव ‘जे डब्ल्यू फॉस्टर अ‍ॅण्ड सन्स’ असं झालं. तर कंपनीचं नाव होतं ‘ऑलिम्पिक वर्क्‍स.’

फॉस्टरचे रनिंग पंप्स खेळाडूंमध्ये लोकप्रिय होते. ब्रिटिश अ‍ॅथलीटचा हा आवडता ब्रॅण्ड ठरू लागला होता. पुढे १९५८ मध्ये फॉस्टरचे नातू या व्यवसायात शिरले. त्यांनी जे डब्ल्यू फॉस्टर आणि सन्सचं नाव बदलून ते ठेवलं, ‘रिबॉक.’ आफ्रिकेतील करडय़ा काळविटाच्या प्रजातीवरून हे नाव ठेवण्यात आलं. ही फॉस्टर मंडळी अस्सल ब्रिटिश. पण इंग्लंडबाहेर हा ब्रॅण्ड पॉल फायरमन या अमेरिकन व्यावसायिकामुळे जगाला माहीत झाला. त्याने रिबॉकची अमेरिकेतील वितरणाची जबाबदारी घेतली. त्यानंतर रिबॉक ब्रॅण्ड मोठा होत गेला.

रिबॉकने शारीरिक कसरत करणारी मंडळी, खेळातील स्त्रियांची वाढती संख्या हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन कॅज्युअल वेअरवरही लक्ष केंद्रित केलं. १९८२ मध्ये अ‍ॅथलीट महिलांकरिता खास ‘द फ्री स्टाइल’ या शूजची निर्मिती करण्यात आली, जी खूप गाजली. आजही रिबॉक शूजमध्ये ही श्रेणी सर्वाधिक खपते. १९८० मध्ये खास करून मुलांसाठी ‘विबॉक’ हा स्पोर्ट्स ब्रॅण्ड आणला गेला.

त्यानंतर फूटवेअर, स्पोर्ट्सवेअर, कपडे यांच्या माध्यमातून हा ब्रॅण्ड विस्तारत गेला. जगातील नावाजलेला दुसरा स्पोर्ट्स ब्रॅण्ड म्हणजे ‘आदिदास’ने २००५ मध्ये रिबॉक कंपनी विकत घेतली. मात्र लोकप्रियतेमुळे हा जुना ब्रॅण्ड ‘आदिदास’मध्ये सामावून न घेता पूर्वीच्याच ‘रिबॉक’ नावासह विकण्याचा निर्णय झाला.

फॉस्टर मंडळींनी एखाद्या अस्सल ब्रिटिशाप्रमाणे १८९५ ते १९८६ या काळात रिबॉकचा लोगो युनियन जॅकच्या झेंडय़ाच्या रूपात ठेवला होता. पण १९८६ साली ‘वेक्टर’ लोगो आला आणि सध्या ‘डेल्टा’ हा रिबॉक लोगो आहे. तो फिटनेसला अधोरेखित करतो. त्या लोगोचा अर्थ आहे, बदल किंवा पूर्ण परिवर्तन. थोडीशी तत्त्वज्ञानपर वाटणारी रिबॉक टॅग लाइन म्हणते, ‘आय अ‍ॅम व्हॉट आय अ‍ॅम.’ स्वप्रेरणेविषयी ही टॅग लाइन काही सांगते.

काही ब्रॅण्डस् बस नामही काफी है, या प्रकारात मोडणारे असतात. रिबॉकही अगदी तसाच आहे. स्पेलिंगमध्ये अगणित बदल करीत रिबॉकच्या भ्रष्ट आवृत्त्या, नकला जगभर पाहायला मिळणं यातच या ब्रॅण्डचं यश दिसून येतं.

धावत्या, पळत्या, खेळत्या पायांना गेली १२३ वर्षे या जुन्या ब्रॅण्डने हरिणगती दिली आहे. पण त्याहीपेक्षा दिला आहे, आत्मविश्वास जो त्या नावाशी जोडला गेला आहे. या विश्वासामुळेच रिबॉक परिधान करणारा म्हणतो..आय अ‍ॅम व्हॉट आय अ‍ॅम..!!!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:06 am

Web Title: brand history of reebok
Next Stories
1 ‘पॉप्यु’लिस्ट : कोरसमधला रांगडा स्वरपट
2 ‘बुक’ वॉल
3 कॅफे कल्चर : जुन्या मुंबईचा साक्षीदार रिगल रेस्टॉरंट अँड बेकरी
Just Now!
X