तेजश्री गायकवाड viva@expressindia.com

खरं तर एक साधं बटण जरी एखाद्या कपडय़ावर खुलून दिसत असेल तर ग्राहक त्याकडे सहज खेचला जातो. एकाअर्थी सरफेस ऑर्नमेंटेशन ही गार्मेट इंडस्ट्रीने कपडय़ांची किंमत वाढवण्यासाठी केलेली युक्ती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. मात्र सध्या हे सरफेस ऑर्नमेंटेशन फॅशनच्या क्षेत्रात परवलीचे झाले आहे..

कपडय़ांची खरेदी करताना आपल्यासमोर दोन सारख्या रंगांचे, सारख्या पॅटर्नचे पण कुठलेही डिझाइन्स नसलेले गार्मेट्स असतील. आणि त्यातल्या एकावर फक्त छोटंसं बटण लावलेलं असेल तर तुम्ही त्यापैकी कोणतं निवडाल? साहजिकच ज्यावरती ते छोटंसं बटण असेल तेच. कारण सहजपणे मानवी मनाला अशी एखादी ठळकपणे दिसणारी गोष्ट पटकन आकर्षून घेते, बाकी तपशिलात आपण नंतर शिरतो. त्यामुळे बटण लावलेला ड्रेस जास्त आकर्षक वाटतो. कोणतीही गोष्ट खरेदी करताना आपल्याला ती गोष्ट पहिल्यांदा आवडते ते त्याच्या आऊटलाइन आणि रंगामुळे. त्यानंतर सहजच आपली नजर त्यावर असलेल्या ऑर्नमेंटेशकडे जाते. ‘सरफेस ऑर्नमेंटेशन’ म्हणजे कपडय़ांच्या पृष्ठभागास अधिक सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी केलेली डिझाइन, सजावट. खरं तर एक साधं बटण जरी एखाद्या कपडय़ावर खुलून दिसत असेल तर ग्राहक त्याकडे सहज खेचला जातो. एकाअर्थी सरफेस ऑर्नमेंटेशन ही गार्मेट इंडस्ट्रीने कपडय़ांची किंमत वाढवण्यासाठी केलेली युक्ती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. मात्र सध्या हे सरफेस ऑर्नमेंटेशन फॅशनच्या क्षेत्रात परवलीचे झाले आहे..

आपण वापरात असलेल्या रोजच्या कपडय़ांवरून एक नजर नीट फिरवली तरी आपल्याला सहज लक्षात येईल की आपल्या कपडय़ावरती काही ना काही सजावट असतेच; म्हणूनच याची खरेदी आपण करतो. सरफेस ऑर्नमेंटेशनमध्ये बटण, लेस, पेंटिंग, प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी, झिप, लटकन, सिक्वेन्स असे अनेक प्रकार आहेत.

बटण – सुरुवातीच्या काळापासून बटणांचा वापर गार्मेट्सवरती सेफ्टी म्हणून किंवा योग्य त्या फिटिंगसाठी केला जात होता. पण अलीकडच्या काळात बटण हा सरफेस ऑर्नमेंटेशनचा मेजर भाग झाला आहे. तुम्हाला तुमच्या कपडय़ावर अनेक ठिकाणी उगाचच बटणं लावलेली दिसतील. त्याचा प्रत्यक्ष असा काही उपयोग जरी होत नसला तरी त्याचा वापर तुमच्या कपडय़ाला वेगळा उठाव आणून द्यायला नक्कीच होतो. लहान मुलांच्या ड्रेसवरती तर बटणांनी केलेली अशी अनेक डिझाइन्स तुम्हाला सहज दिसतील. वुमेन्स फॅशनमध्ये तर अगदी सगळ्याच प्रकारच्या गार्मेट्स स्टाइलवरती वेगवगळी बटणं दिसतील. मेन्स फॅशनमध्येही जास्त प्रमणात नाही पण तरी उपयुक्त ठरतील अशाप्रकारे बटणांचा वापर सरफेस ऑर्नमेंटेशन म्हणून केला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेन्स शर्ट. इन्फॉर्मल किंवा कॅज्युअल मेन्स शर्टमध्ये मुद्दाम शर्टाच्या रंगाला मॅच न होणारे असे बटण लावलेले दिसतात. तेच बटण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते आणि त्या शर्टची किंमत सहज वाढते. बटणांचेही अनेक प्रकार आहेत. यामध्ये वुडन बटण, डायमंड बटण, प्लास्टिक बटण, फॅन्सी बटण आणि अगदी डिझायनर बटणंही असतात     ज्याची किंमत डझनावारी तर कधी  काही पीसनुसार हजारांच्या  घरात असते. जीन्सवरती आणि शूजवरती वापरले जाणारे रीवीटसही बटणाचाच भाग आहे. ज्याचा वापरही सरफेस ऑर्नमेंटेशन म्हणून केला जातो.

दोरा – हो दोरा.. अगदी साधा दोरासुद्धा सरफेस ऑर्नमेंटेशन म्हणून वापरला जातो. याचं उत्तम उदारण म्हणजे आपली रोजच्या वापरातील जीन्स. जीन्स वरती पांढऱ्या मोठय़ा दोऱ्याने सरळ रेषेत एकसारखं अंतर ठेवून केलेली डिझाईन्स तर तुम्ही बघितली असतीलच. त्याला गार्मेट इंडस्ट्रीमध्ये चावल टाका किंवा चावल डिझाइन म्हणून ओळखलं जातं. तर अनेकदा गार्मेट शिवताना मुद्दाम कपडय़ाच्या रंगाच्या विरुद्ध रंगाने गार्मेट शिवलं जातं. त्यामुळे हेलाइन उठून दिसते. साध्या दोऱ्यांप्रमाणे एम्ब्रॉयडरी थ्रेडसुद्धा सरफेस ऑर्नमेंटेशन म्हणून वापरले जातात. याचा वापर करून उत्तम एम्ब्रॉयडरी केली जाते किंवा वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरीचे सॅम्पल बनवून ते गार्मेट्सवरती लावले जातात.

लेस – गार्मेट्सवरती लेसचा वापर मुळातच सरफेस ऑर्नमेंटेशन म्हणून सुरुवातीपासूनच के ला जातो आहे. सिम्पल पॅटर्न असलेल्या कुर्तीला किंवा टॉपला स्लीव्ह्जच्या ठिकाणी, बॉटमच्या हेमलाइनला, नेकलाइनला लेस लावली तर त्याला लुक बदलायला वेळ लागत नाही. डिझायनर लेसमधील डिझाइन काढून त्याचा वापर पॅच वर्क करण्यासाठीही केला जातो. लेसमधेही हॅण्डमेड आणि मशीनमेड असे दोन प्रकार असतात. सध्या तरी मशीनमेड लेसचाच जास्त वापर होताना दिसतोय. कारण त्यात जास्त लवचीकता असते, ज्यामुळे त्याचा वापर आपल्याला हवा तसा करता येतो.

झिप्स – झिप्स किंवा चेन गार्मेट फिटिंगसाठी वापरला जाणारा महत्त्वाचा फिनिशिंग फॅ क्टर आहे. पण आता झिप्स डेकोरेटीव्ह फॅ क्टर म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. असंख्य रंगामध्ये, डिझाईनमध्ये उपलब्ध असलेल्या झिप्स अनेक गार्मेटवरती कपडय़ाच्या फिटिंगचेही काम करते आणि डेकोरेशनसाठीही त्याचा वापर होतो. या झिप्सचा क्रिएटिव्ह वापर करून अनेक फॅशन डिझायनर ईझी पॅटर्न कन्व्हर्ट करण्यासाठीही वापरताना दिसतात. म्हणजेच एखाद्या शॉर्ट स्कर्टची झिप उघडली तर त्याचा स्कर्ट बनू शकतो. कपडे शिवून घेताना अनेकदा आपण आपल्या कपडय़ानुसार मॅचिंग रंगाची झिप शोधत असतो. पण जरा विरुद्ध रंगाची, प्लॅस्टिक ऐवजी सिल्वर किंवा गोल्ड मेटलची झिप लावून बघा. नक्कीच वेगळा लुक मिळेल. या झिपच्या लटकनमध्येही अनेक प्रकार मिळत आहेत. झिपचं लटकन म्हणजे ज्याला पकडून आपण झिपची उघडझाप करू शकतो तेही फॅशनेबल घटक म्हणूनच वापरले जाते.

सिक्वेन्स – सरफेस ऑर्नमेंटेशन म्हणून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरीमध्ये सिक्वेन्सचा वापर इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या गार्मेट्सवरती दिसून येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या, साइझच्या, रंगाच्या टिकल्या, बीड्स, काचा, मेटलचे तुकडे, ब्रोचेस यापासून डिझाइन्स तयार केल्या जातात. सिक्वेन्स डेकोरेशन हातानेही केलं जातं आणि मशीनवरतीही केलं जातं. सिक्वेन्सचा वापर करून केलेले कपडे किंवा बाकीच्या गोष्टीची किंमत जरा जास्त असते कारण सिक्वेन्समुळे गार्मेटचं रूपडंच बदलतं.

अशाच प्रकारे अनेक गोष्टी सरफेस ऑर्नमेंटेशन म्हणून वापरल्या जातात. आपण कितीही साधे कपडे घायचे म्हटलं तरीही शेवटी एकतरी सरफेस ऑर्नमेंटेशन असेलेलं गार्मेटच आपण खरेदी करतो. कारण त्या गार्मेटवरती केलेलं छोटंसंही काम आपल्या नजरेत भरतं, आपल्याला आकर्षित करतं. इतर कपडय़ांच्या, डिझाइन्सच्या गर्दीतही सरफेस ऑर्नमेंटेशनचा भाव वधारलाय तो त्याच्या याच कौशल्यामुळे. येत्या काळात याचे आणखी भन्नाट प्रकार फॅशन डिझाईनिंगमध्ये पाहायला मिळतील.