सायली सोमण

बहुधा सगळ्याच स्त्रिया कुठलेही कापड निवडताना आणि तेच घातल्यावर आपले व्यक्तिमत्त्व कसे खुलून दिसेल याबाबतीत निर्णय घेताना खूपच चोखंदळ असतात. बहुतेकदा बऱ्याच स्त्रियांना मुळातच तोच कपडा कसा असेल, आपल्यावर कसा दिसेल, याची पूर्वकल्पना असते. पण कधी कधी बाजारात बरेच कपडय़ांचे पर्याय उपलब्ध असतात आणि त्यातून नेमकं आपल्याला कशाप्रकारचं फिटिंग हवं याचा विचार करताना त्यांचा गोंधळ उडतो. म्हणूनच स्वत:चे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारच्या सिल्हाऊट्स किंवा स्टाइलमध्ये खुलून दिसेल याचा विचार करताना आपल्याला शरीराचा आकार कशा पद्धतीचा आहे हे समजून घेणे फायदेशीर ठरते. आपली शरीरयष्टी आणि त्यानुसार कशाप्रकारे स्टाइल करता येईल, यावर नजर टाकू या..

पेअर आकाराची किंवा त्रिकोणी शरीरयष्टी/ बांधा :

या प्रकारचा बांधा असलेल्या स्त्रियांचे खांदे अरुंद आणि झुकणाऱ्या दिशेला असतात. कंबरेचा आकार छातीपेक्षा रुंद असतो आणि नितम्ब (हिप्स) खांद्यांपेक्षा रुंद असतात. थोडक्यात या स्त्रियांना बारीक आणि डौलदार  म्हणू शकतो. चांगली उंची असेल तर कुठल्याही प्रकारचे कपडे त्यांना उत्तम दिसतात. मग ते जीन्स-ट्राऊझर्स आणि टॉप्स असो, फ्रॉक्स असो, स्कर्ट्स किंवा कुर्ते, साडय़ा अथवा इतर कुठल्याही प्रकारचे कपडे असोत ते त्यांना खुलून दिसतात. पण तरीही स्वत:चं व्यक्तिमत्त्व अजून उठावदार करण्यासाठी काही मोजक्या-वेगळ्या कल्पनांचा जरूर विचार करावा. म्हणजे काऊल नेक, थोडा खोल व्ही नेक, गोल गळा असलेले टॉप्स वापरता येऊ शकतात. या स्त्रियांचे खांदे अजून थोडे रुंद दाखवण्यासाठी बोट नेक किंवा पफ स्लीव्हजचा वापर करावा. ज्यांचे हात लांब आहेत त्यांनी सध्या खूप चर्चेत असलेल्या बेल स्लीव्हजचा नक्कीच विचार करावा. पेअर शेप असलेल्या बायका साधारण कमरेतून बारीक असतात आणि त्या भागाभोवती फार जास्त चरबी नसते. त्यामुळे क्रॉप टॉप्स आणि हाय वेस्ट पॅट्स/ स्कर्ट्स पण त्यांना उत्तम दिसतात. कंबर अजून ठळक करण्यासाठी एक छानसा बेल्ट असेल तर त्यांच्या दिसण्यात अजूनच बहार येते. आपल्या भारतीय पद्धतीच्या कपडय़ांमध्येसुद्धा सगळ्याच प्रकारचे कुर्ते, पलाझो, चुडीदार, पेन्सिल पँट्स, घागरे, साडी, ब्लाऊज यांच्यावर उत्तमच दिसतात. खूप घेर असलेले घागरे, पलाझो किंवा बूट कट पँट्सही उत्तम दिसतात.

अ‍ॅथलेटिक शेप्ड बॉडी/ आयत आकाराचा बांधा

अशा प्रकारचा बांधा असलेल्या स्त्रिया साधारणत: कर्वी नसतात. त्यांचे खांदे, छाती, कंबर आणि हिप्स हे समांतर असल्यामुळे एकाच रुंदीचे असतात. अशी शरीरयष्टी असलेल्या स्त्रिया खेळाडू तरी असतात किंवा पश्चिम देशातील नृत्य करणाऱ्या तरी असतात. यांना बरेच वेळा आपण टॉम बॉय असेही म्हणतो. त्यामुळे एक समतोल साधण्यासाठी वरचा टॉप जर ढगळ असेल तर खालची पँट स्किन फिट किंवा अंगाला घट्ट लागून असलेली अशी पाहिजे; जर टॉप थोडा घट्ट मापाचा असेल तर पँट स्ट्रेट फिट किंवा थोडी ए लाइन/ बॉयफ्रेंड फिट पद्धतीची असावी. हॉल्टर नेक, रेसार बॅक, ऑफ शोल्डर पद्धतीचे कपडे या स्त्रियांना उत्तम दिसतात. तुमची कंबर हायलाईट करायची असेल तर बेल्ट्स किंवा ए लाइन पद्धतीच्या कपडय़ांचा जास्त विचार करावा.

अवर ग्लास किंवा कव्‍‌र्ही बांधा :

मुळातच या प्रकारचा बांधा हा अत्यंत कव्‍‌र्ही आणि प्रमाणित बांधा मानला जातो. या प्रकारचा बांधा असलेल्या बायकांचे खांदे थोडे रुंद असतात, त्यांची छाती आणि हिप्सचे माप बऱ्यापैकी सारखे असते. आणि कंबर किंवा वेस्टलाइन नीट हायलाईट होते. या स्त्रियांचा बांधा कवी कल्पनेतल्या वर्णनांप्रमाणे किंवा जुन्या पेंटिंग्जमध्ये असलेल्या बायकांसारखाच असतो. त्यामुळे आयडियल फिगर असे त्यांना म्हणायला हरकत नाही. पिअर शेपप्रमाणेच या प्रकारचा बांधा असलेल्या स्त्रियांना सुद्धा जवळजवळ सगळ्याच प्रकारचे कपडे उत्तम दिसतात. कधी वेळप्रसंगी फिटिंग बॉडीकॉन ड्रेसेस, पेपलम टॉप्स किंवा स्कर्ट्स, रॅप किंवा अंगरखा पद्धतीचे टॉप्स आणि कुर्ते, अंगावर चापूनचोपून नेसवलेली साडी हे सर्व प्रकार उत्तम दिसतात. या प्रकारचा बांधा असलेल्या स्त्रियांचा कल लेयर्ड क्लोथिंगकडे नक्कीच असावा. रॅप किंवा अंगरखा पॅटर्नचे कपडे यातीलच एक भाग किंवा सध्या फिटिंगच्या टॉपवर मोठय़ा लांबीच्या श्रग्जचा केलेला वापरही खूप छान दिसतो.

अ‍ॅपल शेप्ड / इन्व्हर्टेड ट्रँगल बॉडी

या प्रकारचा बांधा असलेल्या स्त्रियांचे खांदे त्यांच्या वेस्टलाइन/ कंबर आणि हिप्सपेक्षा रुंदीने शक्यतो जास्त असतात. साधारणत: या प्रकारची शरीरयष्टी शक्यतो मध्यम वयातील स्त्रियांमध्ये जास्त बघितली जाते. अशा स्त्रियांनी शक्यतोवर प्लेन किंवा थोडे उभ्या लाइन/ डिझाइनचे ढगळ कपडे, ए लाइन सिल्हाऊट्सचे मोठय़ा लांबीचे फ्रॉक्स, रुंद गळ्याचे आणि व्ही आकाराच्या गळ्याचे टॉप्स, बॉयफ्रेंड फिटचे हिपपर्यंतच्या लांबीचे टय़ुनिक किंवा टी-शर्ट्स, स्ट्रेट फिट किंवा स्किन फिट पँट्स अशा पद्धतीचे कपडे घालावेत. या लोकांवर गडद रंगाचे कपडे चांगले दिसतात.

आपला बांधा ज्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे कपडे परिधान करताना आपले व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसावे यासाठी वर सांगितलेल्या टिप्सचा तुम्ही नक्की वापर करालच, पण कपडे कुठलेही असोत त्याबरोबरीने एक महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. कुठल्याही प्रकारचे कपडे निवडताना तुम्हाला तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे दिलेल्या गाइडलाइन्समध्ये नमूद केलेल्या विविध कपडय़ांमध्ये सतत प्रयोग करत राहा म्हणजे तुमच्या पेहरावात तोचतोचपणा येणार नाही. परत सध्याचा फॅशन ट्रेंड कुठल्याही ठरावीक पद्धतीच्या स्टाइलच्या साच्यात बांधलेला नसल्यामुळे आपल्याला बरंच काही एकदा घालून बघायला तरी नक्कीच वाव आहे. त्यामुळे स्वत:ला सतत नवनवीन पेहराव करण्याची आणि त्या पेहरावात वावरण्याची, बघण्याची सवय कधीही सोडू नका!

viva@expressindia.com