वेदवती चिपळूणकर

‘हॅविंग ब्लूज’ ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. थोडाफार ताण जाणवणे किंवा अगदी थोडय़ा प्रमाणात डिप्रेशन जाणवणे याला ब्लूज म्हणतात. असे ब्लूज जाणवणं हे सामान्यत: पुढे येणाऱ्या गोष्टीच्या भीतीने घडतं. पुढे येऊ घातलेल्या कामाचा ताण किंवा अत्यंत जोखमीचं काम लवकरच अंगावर पडणार असल्याची जाणीव अशा गोष्टींनी हे ब्लूज जाणवू शकतात. फार मोठा काही मानसशास्त्रीय आजार वगरे नाही, पण त्याचं प्रमाण वाढलं तर करायचं असलेलं काम मात्र बिघडू शकतं.

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर परत कामावर जायचं आणि पुन्हा तितकंच राबायचं या कल्पनेनेच आजच्या तरुण पिढीला ताण येतो. कॉर्पोरेट कल्चरमध्ये  वीकएंडला मज्जा करणाऱ्या या पिढीला कामाच्या ठिकाणचा ताणही तितकाच जास्त असतो. त्यामुळे वीकएंडची मज्जा झाल्यानंतर परत सोमवारी लवकर उठून कामावर जायचं या गोष्टीने अगदी सहजपणे कोणालाही कंटाळा येऊ शकतो, वैताग येऊ शकतो. दोन दिवस जरा मनासारखे घालवल्यावर परत त्याच रामरगाडय़ात स्वतला अडकवून घेण्याच्या कल्पनेनेच कोणीही सहज वैतागेल.

यावर उपाय म्हणून अनेकदा आजकाल अनेकजण स्वत:च स्वत:ला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी करायला लागले आहेत जसं की गाणी ऐकणं, आवडता कॉफीचा मग ऑफिसमध्ये ठेवणं, खास सोमवारसाठी तयार होणे. काही ऑफिसेसमध्येही त्यांच्या कर्मचाऱ्यांना या मंडे ब्ल्यूजपासून वाचवण्यासाठी सोमवारी विशेष कौतुकाने वागवलं जातं. सीनियर्स त्यांच्याशी प्रेमाने बोलतात, त्यांच्याशी स्वत:हून गप्पा मारून त्यांना कंटाळा येऊ नये याची काळजी घेतात, त्यांचे डेस्क थोडेफार सजवून ठेवतात..काही ऑफिसेसमध्ये तर सोमवारी लंचचा मेन्यू हा नेहमीपेक्षा वेगळा असतो, मोकळ्या वेळात फन गेम्स खेळले जातात. कॉर्पोरेट जगात येणाऱ्या स्ट्रेसमध्ये हे मंडे ब्लूज अत्यंत साहजिक आहेत आणि त्यावर सगळे मिळून अगदी सहज उपायही शोधून काढत आहेत.

viva@expressindia.com