मेटॅलिक शेडचा ट्रेण्ड अॅ:क्सेसरीजपासून कपडय़ांपर्यंत सगळीकडे दिसतोय. कसे कॅरी करायचे मेटॅलिक शेडचे कपडे?

दिवाळी गेली, आता मेटॅलिक, शिमर लुकबद्दल बोलायचं निमित्त काय? नाही म्हणता आता ख्रिसमस, न्यू इयरची तयारी सुरू झाली आहेच, त्यामुळे आज बहुतेक पार्टीवेअरबद्दल बोलणार आहोत, असा अंदाज बांधला असेल. अर्थातच आपण पार्टीवेअरबद्दल बोलणार आहोतच, पण सध्या मेटॅलिक लुकचा संबंध फक्त पार्टीपुरता राहिला नाही. रोजच्या ड्रेसिंगमध्येही गोल्डन, सिल्व्हर, कॉपर रंग शिरू लागले आहेत. केवळ मेटॅलिक मेकअप आणि अॅ क्सेसरीजबद्दल बोलत नसून आपला विषय मेटॅलिक ड्रेसिंगचा सुरू आहे. तुमच्या वॉडरोबमधील काही ठेवणीतील कपडे आणि थोडं शॉपिंग याच्या मदतीने या मेटॅलिक ट्रेण्डमध्ये सहज सामील होता येईल.

बाजारात फेरफटका मारल्यास तुम्हाला मेटॅलिक रंगातील कपडे, ज्युलरी, अॅॅक्सेसरीज, बॅग्ज, शूज पाहायला मिळतील. अॅाक्सेसरीजच्या बाबतीत मेटॅलिक शेड्स वापरणं हे नवीन नाही. पण कपडय़ांमध्ये मेटॅलिक कलर्स वापरणं आणि तेही फक्त पार्टीवेअर नाही तर रोजच्या लुक्समध्ये हे आणणं थोडंसं अवघड काम आहे. पण सध्या हाच लुक ट्रेण्डमध्ये आहे.

सगळ्यात आधी तुम्हाला नक्की कोणत्या ऑकेजनसाठी मेटॅलिक ड्रेस घालायचा आहे, ते ठरवा आणि त्यानुसार शेड निवडा.

तुम्हाला गोल्ड आणि सिल्व्हरपैकी कोणती शेड चांगली दिसेल, हे ठरवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गोल्ड की सिल्व्हर हे तपासणं तसं सोप्पं आहे. तुमच्या ज्युलरी कलेक्शनमध्ये एकदा नजर टाका. या दोन्हीपैकी कोणत्या शेडचे दागिने तुमच्याकडे जास्त आहेत, हे बघा. तुमच्या ड्रेससाठीही तीच शेड निवडा. सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाताना घालण्यासाठी तुम्हाला मेटॅलिक शेड हवी असेल तर शक्यतो मॅट गोल्ड, मॅट सिल्व्हर, मिरर फिनिश शाइन निवडा. त्यातही सुरुवात तुम्ही मेटॅलिक जॅकेट, क्रॉप टॉप, टी -शर्टने करू शकता. यांना तुम्ही इतर कपडय़ांसोबत टीम-अप करून मेटॅलिकचा भडकपणा कमी करू शकता. अर्थात यासाठी लेअरिंग पद्धत वापरावी लागेल, त्यामुळे हिवाळा मेटॅलिक शेड्ससाठी परफेक्ट निमित्त ठरू शकतो.

संध्याकाळी पार्टीसाठी मात्र मेटॅलिक ड्रेस, गाऊन, स्कर्ट, पलाझो नक्कीच वापरू शकता. संध्याकाळसाठी तुमची मेटॅलिक शेड फोकसमध्ये येईल अशा प्रकारे लुक ठेवा. मेटॅलिक लुकसोबत मेकअप मिनिमल असू द्यावा. मल्टीकलर मेटॅलिक शेड्स, ब्राइट गोल्ड किंवा सिल्व्हर संध्याकाळी नक्कीच वापरता येतील. लुकमध्ये ट्विस्ट हवा असेल, तर गोल्ड – सिल्व्हरऐवजी गुलाबी, लाल, निळा, हिरव्या रंगाच्या मेटॅलिक शेडचा ड्रेस निवडू शकता.

मेटॅलिक शेड्सना उठून दिसण्यासाठी इतर कशाचीही गरज नसते. त्यामुळे त्यांच्या पेअरिंग करताना व्यवस्थित काळजी घ्या. जर तुम्ही सिक्वीन्स ड्रेस (टिकल्यांचं काम) घेणार असाल तर त्याची शिलाई, इनर लेअर नीट तपासून घ्या. जर ड्रेसचं स्टिचिंग व्यवस्थित नसेल, तर सिक्वीन्स टोचू शकतात. अशा वेळी तुम्हाला ड्रेसच्या मापाचं इनर वापरावं लागू शकतं.

मेटॅलिक शेड कशी कॅरी करावी?

* सकाळी मीटिंग किंवा आउटिंगसाठी जाताना मेटॅलिक शेडसोबत वुलन, जर्सी किंवा होजिअरी कापड वापरू शकता. प्रिंटेड टी-शर्ट आणि डेनिमसोबत मेटॅलिक जॅकेट उठून दिसेल. तसंच मेटॅलिक क्रॉप टॉप घालणार असाल, तर लेदर किंवा हूडेड जॅकेट वापरू शकता.

* लांब मेटॅलिक टय़ुनिक किंवा वन पीस ड्रेसवर हूड किंवा एखादा न्युट्रल शेडचा टी-शर्ट घालू शकता.

* मेटॅलिक स्कर्ट किंवा पलाझोवर लूझ टी-शर्ट किंवा शर्ट वापरता येईल. त्यावर गरज पडल्यास छान ब्लॅक सेमी फॉर्मल जॅकेट घ्या. मीटिंगसाठी मस्त लुक होऊ  शकतो.

* काळा आणि सफेद रंग, डेनम्स यामुळे मेटॅलिकचा भडकपणा कमी होतो. त्यामुळे लुकमध्ये यांचा वापर आवर्जून करा. मेटॅलिक टॉपसोबत डेनिम जॅकेटसुद्धा टीम-अप करू शकता.

* दिवसा मेटॅलिक शेडसोबत स्नीकर्स वापरा. त्यामुळे मेटॅलिक शेडचा भडकपणा डोळ्यात येत नाही. रात्री मात्र ब्लॅक किंवा न्यूड शेडचे हिल्स वापरू शकता. तुमच्या ड्रेसच्या मॅचिंग शेडची हिल्ससुद्धा वापरता येईल.

* सकाळी फारशी ज्युलरी वापरणं टाळा. त्यामुळे लुक भडक होऊ  शकतो. रात्री मात्र मेटॅलिक ड्रेससोबत बोल्ड शेडचा स्टेटमेंट नेकपीस किंवा कडं वापरू शकता.

* एखाद्या खादीच्या साडीला मॅट मेटॅलिक क्रॉप टॉप किंवा ब्लाउजसोबत टीमअप करून मस्त लुक मिळेल.