11 August 2020

News Flash

कवितेचे गाणे होते तेव्हा..

नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’..

नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
कविता : अभिव्यक्तीने लावलेला एक असा शोध, ज्याच्या मदतीने आपल्याला सांगायचे असलेले खूप काही, फक्त काही मोजक्या शब्दांत मांडता येते. आपल्याला वाटत असलेले खूप काही, ज्या वाटण्याला नाव नसते, अव्यक्त असे ते सगळे व्यक्त करता येते. ज्याप्रमाणे हजारो मेगाबाइटचे फोटो, गाणी इत्यादी एका छोटय़ाशा पेन ड्राइव्ह किंवा मेमरी कार्डमध्ये बसवून किंवा  ‘zip’ ते दुसऱ्याला देता येते, त्याचप्रमाणे मनात असलेला, व्यक्त होण्यासाठी धडपडत असलेला भावनांचा सागर कवितेच्या सूक्ष्म रूपाने दुसऱ्यासमोर ठेवता येतो. या सूक्ष्म रूपात काय काय दडले आहे, हे शोधून ते unzip करण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘चाल देणे’, कवितेचे ‘गाणं’ बनवणे. श्रेष्ठ संगीतकार नुसता अर्थ शोधत नाही, तर त्या कवितेला आपला स्वत:चा अर्थ देऊन तिच्या भव्यतेत आणि सूक्ष्मतेतही भर घालतो. माझ्या मते या श्रेष्ठ संगीतकारांमधील सर्वश्रेष्ठ नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर! बहुधा म्हणूनच ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले, अवघेचि झाले देह ब्रह्म’ या ज्ञानेश्वरांच्या स्थितीशी एकरूप होऊन, हक्काने बाळासाहेबांनी त्याचे गाणे बनवले. पंडितजी ज्ञानेश्वरांच्या त्या अमृतानुभवाच्या भावनेशी एकरूप झाले असणार, यात शंका नाही. अद्वैताच्या शोधात ज्ञानोबांना जे जे होत गेले, ते बाळासाहेबांनासुद्धा होत गेले असावे, असेच त्यांचे अभंग ऐकून वाटते. ‘ॐ नमोजि आज्ञा’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘पैल तोगे काऊ’, ‘मोगरा फुलला’, ‘रुणुझुणू रुणुझुणू’, ‘आजी सोनियाचा दिनु’, ‘कानडाऊ विठ्ठलू’, ‘घनु वाजे रुणुझुणा’, ‘पसायदान’.. हे अभंग जोडीला डायरेक्ट देवाशी कनेक्शन असलेले दोन आवाज- आशा आणि लता! अजून काय पाहिजे?
‘शिवकल्याण राजा’ – ही अशीच एक अजरामर कलाकृती. यात नुसते कवितांना चाल लावणेच नाही, तर प्रसंगानुरूप एक एक कविता शोधून काढणे आणि त्याला संगीतबद्ध करणे असे काम बाळासाहेबांनी केलेय. ‘सरणार कधी रण’, ‘गुणी बाळ असा’, ‘निश्चयाचा महामेरू’, ‘आनंदवनभुवनि’, ‘वेडात मराठे वीर’, ‘अरुणोदय झाला’, ‘हे हिंदू नृसिंहा’ – प्रत्येक गाणे असे, की ऐकून अंगात येते, रक्त सळसळायला लागते, एक वेगळेच स्फुरण चढते.
संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज आणि नंतर ग्रेस! ग्रेस म्हणजे – नुसते वाचायला अवजड, अवघड अशा कवितांना चालबद्ध, लयबद्ध करायचे धाडस आणि इच्छा होण्यासाठी प्रतिभेच्या कुठल्या पातळीवर त्यांना पोहोचायला लागले असेल? आता ‘मनाचा दगड घेतो कण्हत उशाला’ (गेले द्यायचे राहुनि) या ओळीतले स्वर शोधायचे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. फक्त ग्रेसच नाही, तर अनेक कवींच्या कवितांना पंडितजींनी असे हाताळले आहे, की जणू बाळासाहेबांमार्फत गाणे होऊन जगासमोर येण्यासाठीच जणू त्या कवितांचा जन्म झाला होता. ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी’ (भा. रा. तांबे).. या अशा कविता आणि त्यांची गाणी ऐकली की, मला ‘मेरा कुछ सामान’ची आठवण होते. ते तरी पंचमदांना गाणे करण्यासाठी गुलजार साहेबांनी दिलेले गीत होते, इथे तर या कवितेचे गाणे करण्याचा निर्णय स्वत: बाळासाहेबांनी घेतलेला! खरंच, ‘घर थकलेले’, ‘ती गेली’, ‘वाऱ्याने हालते रान’, ‘लवलव करी पातं’, ‘सावर रे सावर रे’, ‘भय इथले संपत नाही’, ‘दु:ख ना आनंद ही’, ‘त्या फुलांच्या गंधकोशी’, ‘पूर्तता माझ्या व्यथेची’, ‘केव्हा तरी पहाटे..’ या आणि अशा कविता बाळासाहेब नसते, तर कागदावरून कॅसेटमध्ये कधीच नसत्या आल्या!

हे ऐकाच..
न ऐकलेले हृदयनाथ
बाळासाहेबांची गायकीसुद्धा मंगेशकर घराण्याला शोभणारी अशीच आहे; हे बाळासाहेबांचे डायहार्ड फॅन असणाऱ्यांना वेगळे सांगायची गरज नाही. ‘भावसरगम’ला अजूनही तुडुंब गर्दी होते ते यामुळेच; पण खूप मोठा फॅन असूनही बाळासाहेबांनी ‘ब्लॅक अँड व्हाइट’ काळात गायलेली काही गाणी मी अजूनपर्यंत ऐकली नव्हती. इतक्यातच ती ऐकली म्हणून उल्लेख करतोय. बाल-हृदयनाथनी गायलेली हिंदी गाणी – ‘लहरों के रेले’ (बाबला – १९५२) आणि ‘ये दुनिया कैसी है भगवान’ (दीवाना १९५३) आणि ‘माणसाला पंख असतात’मधली कुमार हृदयनाथने गायलेली ‘पतित पावन नाम ऐकुनि’ आणि ‘उभवू उंच निशाण’. स्वच्छ शब्दोच्चार, सूर लावायची मंगेशकारी शैली आणि असंस्कारी आवाज.. आवर्जून ऐका आणि आनंद घ्या.
जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 1:49 am

Web Title: jasraj joshi song playlist of the week
टॅग Jasraj Joshi
Next Stories
1 मेसेज आला रे
2 सोशल नेटवर्किंग डायजेस्ट
3 ऑनलाइन शॉपिंगमध्ये सवलतींचा पाऊस
Just Now!
X