खरं तर आता फेस्टिव्ह सीझन संपत आला. आजची संक्रांत झाली की, होळी सोडता वर्षांतले सण संपतीलच. पण तरी हाच सीझन आहे कॉलेज फेस्टिव्हल्सचा. साडी डे, ट्रॅडिशनल डे वगैरे डे ठरलेले आणि त्यातून वेडिंग सीझनही अजून संपलेला नाही. त्यामुळे फेस्टिव्ह कलेक्शन खरेदीला अजून वाव आहे. फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये लेहेंगा हा सगळ्यात पसंतीचा विषय ठरत आहे. लेहंगा-चोली मूळचा राजस्थानी पेहराव आता पॅन इंडियन झालाय. मराठी लग्न- समारंभांमध्येदेखील तो हल्ली सर्रास दिसतो. हल्ली लेहेंग्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातले ट्रेण्डमध्ये कोणते आहेत, पुढेही फॅशनमध्ये कोण टिकणार याविषयी थोडी माहिती.

या सगळ्या प्रकारांच्या बरोबरीनेच लेहेंगा साडी, पलाझो लेहेंगा असे प्रकारसुद्धा खूप इन आहेत. लेहेंगा साडीमध्ये दुपट्टय़ाला साडीच्या पदाराप्रमाणे ड्रेप केलं जातं. पलाझो लेहेंगामध्ये घेरदार पलाझो लेहेंग्याऐवजी चोलीबरोबर टीमअप केली जाते. लेहेंगा शक्यतो शिवून घ्यावा. त्यामुळे त्याचं फीटिंग नीट मिळेल. रेडीमेड लेहेंगा घेताना फीटिंग, लेन्थ या सगळ्याची तपासणी करून घ्यावी. सध्या रेंटवरसुद्धा लेहेंगा मिळायची सोय उपलब्ध झाली आहे.

लेहेंगा विथ जॅकेट
जॅकेट्स आणि लेहेंगा हे खूप वेगळ कॉम्बिनेशन असलं तरीही हे कॉम्बिनेशन मुलींच्या पसंतीस उतरतंय. यात स्ट्रेट कट जॅकेट्स, ‘नेट’चे जॅकेट्स , सिल्क जॅकेट्स असे अनेक प्रकार लेहेन्गाज बरोबर टीमअप केले जातात. क्रॉप टॉप आणि त्यावर फ्लेयर्ड नेट जॅकेट , तसेच स्ट्रेट जॅकेट्स, त्याच बरोबर लॉन्ग कमीज वर छोटं जॅकेट अशी कॉम्बिनेशन्स खूप उठावदार दिसतात.

लेहेंगा विथ लाँग कमीझ
सुंदर लेहेंगा आणि त्यावर लाँग कमीझ हे कॉम्बिनेशनसुद्धा सध्या खूप इन आहे. नेहेमीच्या लेहेंग्याला या कॉम्बिनेशनमुळे भव्यता प्राप्त होते. या प्रकारातील लेहेंगा इतर लेहेंग्यापेक्षा काहीसा जास्त घेरदार असून लॉंग कमीझ नॅरो आणि त्याचा साइड कट मोठा असतो.
या सगळ्यामुळे एक युनिक लुक आपल्याला मिळेल.

लेहेंगा विथ क्रॉप टॉप
एखाद्या क्लासी क्रॉप टॉपबरोबर भरजरी लेहेंगा टीम-अप केला जातो. हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. या कॉम्बिनेशनमुळे लेहेंगा तसेच चोली या दोन्हीला अटेंशन मिळतं. आणि त्याच बरोबरीने रेखीव बांधा डिफाइन होतो. सध्या कॉन्ट्रास्टच्या बरोबरीने मॅचिंगचा ट्रेंडसुद्धा खूप इन आहे. त्यामध्ये फ्लोरल डिझाइन्स, पेस्टल कलर्स यांची चालती आहे.