News Flash

‘नऊवारी’चा नखरा वाढला!

मराठमोळ्या नऊवारीचे विविध ‘पदर‘ उलगडून बघण्याचा प्रयत्न..

संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’तील ‘पिंगा’चा वाद गाजला तो त्यातल्या नृत्यानं आणि नऊवारीनंही. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राच्या नऊवारीतील ‘लुक’वरून वाद झाला. त्यांनी नेसलेली साडी ही कशी पारंपरिक नाही याच्या चर्चा सामान्यांच्या घरातही रंगल्या. पण यानिमित्ताने कित्येकांना नऊवारीतील वैविध्याची जाणीव झाली. मराठमोळ्या नऊवारीचे विविध ‘पदर‘ उलगडून बघण्याचा प्रयत्न..
भारतीय पारंपरिक पेहरावात नऊवारी साडीचं स्वत:चं असं स्थान आहे. दक्षिण भारतात ही नऊवारी किंवा काष्टा साडी सर्वदूर पसरलेली होती. पण ती नेसण्याची पद्धत मात्र वेगवेगळी होती. महाराष्ट्रीय स्त्रीचा पारंपरिक पेहराव म्हणजे ‘लुगडं’ अर्थात हेच नऊवारी पातळ. पण आताच्या तरुण पिढीची आजीदेखील हे नऊवारी लुगडं नेसणारी राहिलेली नाही. पाचवारी साडीला महाराष्ट्रानं आपलंसं केलं आणि नऊवारी साडी केवळ सण-समारंभ, लग्नकार्य आणि शाळा-कॉलेजच्या गॅदरिंगपुरती मर्यादित राहिली. मध्यंतरीच्या काळात काहीशी दुर्लक्षित राहिलेली नऊवारी आता मात्र आधुनिकतेचा मुलामा चढवून पुन्हा तरुण मुलींना आपलंसं करायला लागली आहे. निमित्त कुठलंही असो.. कुण्या ‘मस्तानी’नं पडद्यावर घातलेला काल्पनिक पिंगा असो की आणखी काही.. मुलींसाठी फेव्हरेट फेस्टिव्ह वेअर किंवा एथनिक वेअरच्या यादीत ‘नऊवारी’ हळूहळू वरच्या क्रमांकावर येतेय.
संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’तील ‘पिंगा’ हे गाणं आणि या गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राच्या नऊवारीतील लुकची बरीच चांगली-वाईट चर्चा झाली. त्यांनी नेसलेली साडी ही कशी पारंपरिक नाही आणि केवळ सवंग लोकप्रियतेसाठी केलेला हा खेळ कसा आहे याची चर्चा सामान्यांच्या घरातही रंगली आहे. पण यानिमित्ताने कित्येकांना जाणीव झाली आहे ती, नऊवारीतील वैविध्याची. पेहरावातून मराठीपणा दाखवणाऱ्या नऊवारीचे ‘पदर’देखील अनेक आहेत आणि तेच उलगडण्याचा हा प्रयत्न.
नऊवारी तरुणाईपासून दुरावायचं कारण म्हणजे ती नेसण्यासाठी लागणारं कसब. एवढी मोठी साडी चापून चुपून व्यवस्थित नेसायची तर कसब लागतंच. पण गेल्या काही वर्षांपासून नऊवारी साडी मापाने शिवून घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. आता तर ‘स्टिच्ड नऊवारी असं ‘रेडिमेड वेअर’देखील बाजारात मिळायला लागलंय आणि चक्क ट्रेण्डी झालंय. पण आपण नेसलेली किंवा नेसू इच्छिणाऱ्या (खरं तर नेसणं आता राहिलेलंच नाही.. स्टिच्ड नऊवारीमुळे नऊवारीही हल्ली ‘घालावी’ लागते) तरुण मुलींना कोणत्या प्रकारची नऊवारी नेसायची आहे, याचं भान हवं. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दीपिका आणि प्रियांकाने नेसलेली साडी ही पेशवाई आणि लावणी पद्धतीच्या नऊवारीचं मिश्रण आहे. तो सर्वस्वी भिन्न प्रकार आहे’, असं मत या क्षेत्रातील व्यावसायिक आणि अभ्यासक पुण्याच्या सुचेता कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. नुसता काष्टा घेतला की झालं, इतकं हे नऊवारीचं तंत्र सोपं नाही. अनेक व्यावसायिक हल्ली नऊवारी शिवून देण्याचं काम स्वीकारतात. पण त्यांच्याकडे जाण्याआधी आपल्याला कुठल्या प्रकारची नऊवारी शिवून घ्यायची हे निश्चित केलेलं असलं पाहिजे. पुण्यातील शालगर हे स्टिच्ड नऊवारी साडी मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे. ‘सध्या लग्नाचा सीझन सुरू झाल्यामुळे नऊवारीची मागणी वाढली आहे. हल्ली वधूबरोबरच तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकसुद्धा नऊवारी नेसण्याची हौस भागवतात. स्टिच्ड नऊवारी साडी नेसण्यासाठी वयाचं बंधनही हल्ली राहिलेलं नाही. वयस्क स्त्रियादेखील हल्ली शिवलेल्या नऊवारीला पसंती देतात’, असं ‘शालगर’चे व्यवस्थापक शिवम पाटील यांनी सांगितलं.
नऊवारी किंवा काष्टा साडी खरं तर वावरायला पाचवारीपेक्षा सोयीची. पण कालौघात नऊवारीचा वापर रोजच्या वापरातून हद्दपार झाला खरा. आता नऊवारीचा समावेश ‘रेडी टू वेअर’ कपडय़ांमध्ये झाल्यापासून स्टिच्ड नऊवारी अगदी ऑनलाईन मार्केटमध्येही उपलब्ध झाली आहे. पुन्हा एकदा सणासुदीला, विवाहसोहळ्यांमध्ये नऊवारी मोठय़ा प्रमाणावर दिसू लागली आहे. स्टिच्ड नऊवारी ही काही पारंपरिक नाही. पण परंपरा आणि सोय यांच्या मधला मार्ग नक्कीच या प्रकाराने शोधून दिला आहे.

नऊवारी साडी नेसण्याच्या पद्धती

कोल्हापुरी पद्धत : या पद्धतीची साडी ग्रामीण भागात शेतकरी स्त्रिया नेसतात. शेतात काम करताना साडीचा अडसर येऊ नये व शेतात काम करणे सोपे जावे यासाठी ही नऊवारी साडी घोटय़ापर्यंत नेसली जाते.

कोळी पद्धत : हा नऊवारीचा ‘कोळी’ या समाजातील प्रकार असून ही साडी गुडघ्यापर्यंत नेसली जाते. कोल्हापुरी पद्धतीप्रमाणेच समुद्राकाठी काम करताना अडचण होऊ नये यासाठी या साडीला जास्त घोळ नसतो. ही साडी घट्ट नेसली जाते. साडी नेसताना पदराचा भागदेखील कमरेला गुंडाळला जातो आणि शरीराच्या वरच्या भागावर.. कोळी पद्धतीच्या साडय़ा या मुख्यत: कॉटनच्या आणि मोठी फुलांची नक्षीकाम केलेल्या असतात.

ब्राह्मणी पद्धत : या पद्धतीची साडी विवाह विधींच्या वेळी नेसली जाते. या साडीचा काठाकडचा भाग वर उचलून क मरेला खोचला जातो. त्याला ओचा असं म्हणतात. घोळदार ओचा हेच या पद्धतीच्या साडीचे वैशिष्टय़ आहे. हा ओचा साधारण ८ ते १० इंचाचा असतो. निऱ्यांचा घोळ जास्त असतो. पूर्वीच्या स्त्रिया या घोळदार ओचात काही वस्तू ठेवत असत. निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन ‘केळं’ काढलं जातं. स्त्रिया याचा उपयोग पैसे ठेवण्यासाठीही करीत असत. ही साडी पायांपर्यंत झाकलेली असली तरी पोटऱ्यांचा काही भाग उघडा राहतो.

मराठा पद्धत :
या पद्धतीच्या साडीमध्ये ओचा मोठा नसतो पण काष्टा अशा पद्धतीने घेतला जातो की, पायघोळ मोठा राहील. ही साडी पायभर नेसलेली असते आणि यासाठी जास्त नक्षीकाम केलेल्या भारी साडय़ा नेसल्या जातात.

पेशवाई पद्धत : ही नेसायची पद्धत ब्राह्मणी पद्धतीप्रमाणेच आहे. परंतु ब्राह्मणी पद्धतीच्या तुलनेत या साडीचा ओचा कमी, म्हणजेच ४ ते ५ इंचाचा असतो. सुरुवातीच्या काळात पेशवाई पद्धतीची साडी नेसण्यासाठी भरजरी साडीच वापरली जाई. परंतु सध्या आधुनिक पद्धतीच्या डिझायनर पारदर्शक साडय़ाही पेशवाई पद्धतीने नेसलेल्या दिसतात.

लावणी पद्धत : या पद्धतीची साडी लोकनृत्य सादर करताना नेसली जाते. ही साडी शरीराला घट्ट बसेल अशा प्रकारे नेसली जाते. घुंगरू घालण्याच्या हेतूने पायाकडचा घोळ कमी असतो. साडीचा पदर हा एका सरळ रेषेत न काढता खांद्यावरून वरखाली काढला जातो. त्याबरोबरच मागचा काष्टा हा अशा पद्धतीने काढला जातो की, दोन्ही दिशेला मधोमध काठ यावेत. सुरुवातीच्या काळात लावणीसाठी काठ पदराची साडी वापरली जात होती, परंतु सध्याच्या फॅशननुसार लावणी सादरकर्ते सिंथेटिक, डिझायनर पद्धतीची साडी नेसतात

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 1:30 am

Web Title: nauvari saree in trend after bajirao mastani pinga song
Next Stories
1 उलट सुलट
2 लेट्स ‘रॉक’
3 केऑस
Just Now!
X