जगात सर्वाधिक देशांमध्ये लाडक्या असलेल्या फुटबॉल या खेळातील सर्वोत्तमासाठीचे युद्ध रशियामध्ये सुरू झाले असून त्याची झिंग हजारो प्रेक्षकांच्या घोषणागीतांमधून टीव्हीच्या पडद्यावर पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकेल. या काळात आंतरराष्ट्रीय संगीतोद्योगही फुटबॉल गीतांची आरती उपलब्ध करून द्यायला सुरू करतो, ही गंमतीशीर गोष्ट आहे. साठोत्तरीच्या दशकात फुटबॉलप्रेमी देशांमध्ये आपल्या लाडक्या संघाला प्रोत्साहनपर आणि दोडक्या संघाला मनोखच्चीकरणपर ठरतील अशी गाणी तयार करण्याचा प्रघात पडला. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या प्रकाराने एमटीव्हीउत्तर कालखंडात व्यावसायिक रूप धारण केले. फुटबॉल वर्ल्डकपचे प्रक्षेपण जगभर व्यापणाऱ्या उपग्रह वाहिन्यांच्या काळात जाहिराती, इव्हेन्ट आणि फुटबॉलस्टार्स यांचे जागतिक वलय नवी आर्थिक उलाढाल करणारा ठरला. फुटबॉलची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणारी गाणी तयार झाली.

निव्वळ भारताबाबत बोलायचे झाले, तर आपल्या मनात इनबिल्ट असलेल्या क्रिकेट वेडाला उपग्रह वाहिन्यांनी तयार केलेल्या फुटबॉल आकर्षणातून सुरुंग लागला. नव्वदीच्या दशकात काही अंतिम सामन्यापुरते तयार होणारे फुटबॉलवेड हळूहळू वाढत गेले. फुटबॉल वर्ल्ड कपचा भव्य सोहळा झाला. तो हॉटेल-रेस्तराँमध्ये पाहायचे खूळ तयार झाले. जर्सी, कपडे, शालेय साहित्यांत फुटबॉल दिसायला लागला. याच काळात आघाडीच्या पॉपस्टारला पाचारण करून वैश्विक लक्ष वळविण्यात इव्हेन्ट संस्थांना यश मिळू लागले. शकिरा आणि जेनिफर लोपाजसारख्या मदनिकांच्या उपस्थितीने फुटबॉल वर्ल्ड कपचा आरंभ अद्भुत नृत्यसोहळा बनला. नव्वदोत्तरी काळातील भारतीय तरुणांना पहिल्यांदा फुटबॉलची झिंग जाणवली ती रिकी मार्टिन याच्या ‘कप ऑफ लाइफ’ या गाण्यामधून. त्यानंतर अनेक कलाकारांची ऑफिशिअल आणि अनऑफिशिअल फुटबॉल गाणी भारतीयांनी अनुभवली.

यंदा रॉबी विल्यम्स या ब्रिटिश पॉप कलाकाराने ‘लेट मी एण्टरटेन यू’ गाणे गाऊन या सोहळ्याच्या आरंभाला खिशात घातले. दोन दशकांपूर्वी  ‘टेक दॅट’ या बॅण्डमधून काडीमोड घेऊन स्वत:चं करिअर करणाऱ्या या गायकाच्या नावे कन्सर्टमधील तिकिटविक्रीचा विक्रम गिनेस बुकमध्ये नोंदला गेला आहे. तरीही गेले दशकभर मुख्य प्रवाहातून गायब असलेला रॉबी विल्यम्स फुटबॉल वर्ल्ड कपच्या आरंभ सोहळ्यामध्ये गाताना पाहणे संगीत शौकिनांसाठी आश्चर्य होते. शकीराच्या ‘हीप्स डोण्ट लाय’ आणि ‘वाका वाका’ या दोन गीतांचा प्रभाव अजूनही फुटबॉल वर्ल्डकपवर आहे, पण या प्रचलित गाण्यांहून बरीच गाणी फुटबॉल या खेळावर आधारलेली आहेत. सध्या यूू-टय़ुबवर अडेलच्या ‘हॅलो’ या गाण्याला थोडा वेग देऊन फुटबॉल तारा मेसीवर चित्रित केलेले व्हर्शन गाजते आहे. फुटबॉलवर नसलेल्या गाण्याला या खेळाशी उत्तम जोडण्यात आले आहे.

‘अ‍ॅण्ट अ‍ॅण्ड डेक’ या ब्रिटिश गायकद्वयीने २००२ सालच्या वर्ल्ड कपसाठी ‘वी आर ऑन द बॉल’ नावाचे गाणे तयार केले होते. अर्थातच ब्रिटिश संघाला गाण्यातून उत्तेजित करण्याचा त्यांचा हेतू होता. ‘बडील, स्कीनर अ‍ॅण्ड लाइटनिंग सीड्स’ या गाण्यासाठी एकत्र आलेल्या ब्रिटिश कलाकारांनी १९९८ साली वर्ल्ड कपसाठी ‘थ्री लायन्स’ नावाचे गाणे तयार केले होते. हे समूहगीत ऐकण्यासाठी खूपच चांगले आहे. आपल्याकडे त्याचे प्रदर्शन एमटीव्ही-व्ही चॅनेलवरून झाले नव्हते. ‘वी आर स्कोअर मोअर दॅन यू’ नावाचे आणखी एक ब्रिटिश गाणे १९९८ साली तयार झाले होते. या गाण्यामध्ये आपल्या संघाची बढाई आणि दुसऱ्यांची बुराई असलेला शब्दमसाला आहे. हे गाणे पुढल्या फुटबॉल ग्लोबल हीट्सने विस्मृतीत टाकले असले, तरी युटय़ुब आणि इतर माध्यमांतून अनुभवता येऊ शकते.

निली फुर्टाडो ही पोर्तूगीज-कॅनेडियन गायिका २००३-४ या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय होती. तिचे ‘पॉवरलेस’ हे गाणे सगळ्याच गीतयाद्यांमध्ये आघाडीवर पोहोचले होते. या गाण्याच्या प्रसिद्धी लाटेमध्येच युरोकपच्या काळात तिचे ‘फोर्सा’ हे फुटबॉल गाणे लोकप्रिय झाले. गाण्याची सुरुवातच तबल्याचा आधार घेऊन करण्यात आली आहे. पुढे या खेळाची झिंग गाण्यामध्ये उतरली आहे. ‘वाका-वाका’ इतके हे गाणे प्रसिद्ध नसले, तरी प्रचलित आहे. २०१० सालच्या वर्ल्ड कपने शकीराच्या आधीच असलेल्या प्रसिद्धीला शतपटीने वाढविले. त्याच काळात के-नानचे एक फुटबॉल गाणे हीट झाले. अर्थात ते गाणे ‘कोका कोला’ने थीमसाँग म्हणून वापरले असले, तरी त्यातील ड्रम्सचा झिंगझिंगणाट पावले थिरकवणारा आणि शरीरात चेतना जागवणारा आहे.

फुटबॉलप्रेमी असलात किंवा नसलात, तरी त्यावरच्या बदलत जाणाऱ्या गाण्यांच्या प्रभावाचा प्रवाह या गाण्यांद्वारे पाहता येऊ शकेल.

viva@expressindia.com