फॅशन कुठली फॉलो करायची, याबद्दल आपण कायम जागरूक असतो. ट्रेंडमध्ये असलेले कपडे, त्यांचे रंगरूप लक्षात घेऊन आपण आपल्याला पटेल, रुचेल अशा पद्धतीने आपली फॅ शन ठरवतो. आपली निवड अधिक सक्षम करायची तर मुळात फॅ शन म्हणजे काय? अमुक एक रंग, अमुक प्रकारचे ड्रेस ट्रेंडमध्ये येतात म्हणजे नेमकं काय होतं? त्यामागचा विचार काय, ते आपल्याला सूट होईल की नाही हे कसं ठरवायचं, अशा अनेक मूलभूत प्रश्नांची उकल करून देणारं आजची तरुण फॅशन डिझायनर सायली सोमणचं हे नवंकोरं सदर..

वर्ष नवं, स्वप्न नवं, उमेद नवी, संकल्प नवा, आनंद नवा .. सालाबादप्रमाणे नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपण बरेच संकल्प मनाशी ठरवतो. या वर्षी मी माझं वाचन वाढवेन, मी गिटार शिकेन, स्वयंपाक शिकेन, नियमित व्यायाम आणि डाएटिंग करून बारीक होईन.. इत्यादी इत्यादी. एवढे सगळे संकल्प आपण करतो खरं, पण तो मनाशी पक्का केलेला संकल्प पूर्णत्वास आणायला किती टक्के यश मिळतं हे सांगणं जरा कठीण आहे. या वर्षी मीपण स्वत:साठी एक संकल्प केला आहे तो म्हणजे मला माझ्या क्षेत्रातल्या फॅशन आणि कॉस्च्युम डिझाइनिंगमधील सर्व पैलूंचा अभ्यास, त्याचं भूत-वर्तमान आणि सातत्याने होणाऱ्या  घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याची सुरुवात मी आपल्या या आजच्या सदरापासून करते आहे..

आता अभ्यास म्हटलं की मग तो फॅशनचा का असेना त्याला अभ्यासक्रम असणारच. तर फॅशनदार बनण्याच्या तयारीतला आपला पहिला धडा असणार आहे एकूणच फॅशन डिझाइनिंगमधील वेगवेगळ्या घटकांचा. हे घटक म्हणजे रंग, सिल्हाऊट्स, फॅब्रिक किंवा कपडा त्याचं टेक्स्चर (पोत) आणि सर्फेस ऑर्नामेंटेशन टेक्निक्स. आपण रोज जे काही कपडे घालतो, त्यांची जी विशिष्ट रचना असते ती यावरील घटकांना एकत्र आणून केलेली कलाकृती म्हणता येईल. या घटकांबद्दल सविस्तर बोलतानाच आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात त्यांच्याशी असलेलं आपलं नातं आणि प्रभाव याबद्दलही सांगणार आहे. हे घटक काळ आणि ऋतूप्रमाणे सतत बदलत्या स्वरूपाचे असतात. त्यामुळेच फॅशन ट्रेंड्सपण बदलत असतात. जागतिक स्तरावरच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींप्रमाणे आपली राहणी, विचारसरणी जशी बदलत असते तसंच फॅशन ट्रेंड्सपण बदलत असतात. उदाहरणच सांगायचं झालं तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक तणावाचे वातावरण असल्यामुळे पन्नासच्या दशकापर्यंत लोक  हलक्या आणि डल रंगांचे कपडे घालायचे, हळूहळू परिस्थिती निवळल्यावर याच कपडय़ांच्या रंगांचे आणि फॅशनचे रूपांतर साठच्या दशकात अजून जास्त उठावदार, आकर्षक कपडय़ांमध्ये झाले; काळाप्रमाणे आणि लोकांच्या आवडीप्रमाणे सत्तरच्या दशकातील बेल बॉटम पॅण्ट्स नव्वदच्या दशकापर्यंत टाइट फिटिंगच्या पँट्समध्ये बदलल्या होत्या.

कालमहिम्यानुसार यंदाही फॅशन ट्रेंड्स मागच्या वर्षीपेक्षा थोडे बदललेले असतील. मग ते सर्वात जास्त दिसणारे रंग असोत, कलर पॅलेट-स्टाइल्स किंवा सिल्हाऊट असो नाहीतर त्यावरचं डिझाइन किंवा प्रिंट्स असोत. या संपूर्ण वर्षभरात कपडय़ांसाठी दिसणारे जे विशिष्ट रंग, रंगसंगती ठरल्या आहेत ते म्हणजेच ‘कलर पॅलेट’. या वर्षांची सुरुवात थंडीच्या शेवटाकडे आणि पाठोपाठ वसंत ऋतूच्या आगमनाकडे असल्यामुळे आत्ता रंगांचा कल आइस्क्रीम पेस्ट्ल्सकडे जास्त असेल. या प्रकारचे रंग थोडय़ा फिक्या छटेचे असतात. लवेंडर, लायलक पिंक, डल पीच, आइस ब्ल्यू, अक्वामरीन ब्ल्यू, पिस्ता ग्रीन, लेमोन सोर्बेट, कोकोनट व्हाइट इत्यादी. ऋतूप्रमाणे या आइस्क्रीम पेस्टल्सचे रूपांतर क्रेयॉन कलर्समध्ये होईल. हे रंग पेस्टल्सपेक्षा थोडय़ा उठावदार (व्हायब्रंट)छटांचे असतात. चेरी टोमॅटो रेड, मँगोबटर यल्लो, लेमन पील येल्लो, कोबाल्ट ब्ल्यूू, अल्ट्रा व्हॉयलेट रोजपिंक असे रंग यात असतात. वरील रंगांव्यतिरिक्त एगव्हाइट, नेव्ही ब्ल्यू, डेनिम ब्ल्यू, मिलिटरी ग्रीन, सँड बेज, मरून हे रंग वर्षभर सर्वासाठी अनुरूप ठरतील. पार्टीवेअर्समध्ये मेटॅलिक रंगांचा विशेष समावेश असेल. एकप्रकारे यंदाचा रंग संयोजनाचा आराखडा सतत विशिष्ट प्रकारे बदलता आणि भिन्न स्वरूपाचा राहील.

त्यानंतर आणखी मूलभूत घटकाबद्दल चर्चा करायची ती म्हणजे सिल्हाऊट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण कुठल्याही प्रकारचे कपडे अंगावर घातल्यानंतर जो मूळ आकार म्हणजेच आउटलाइन (रूपरेषा) दिसते त्याला सिल्हाऊट्स म्हणतात. ही रूपरेषा साधारण इंग्रजी अक्षरांमधल्या ए, व्ही, एक्स, ओ, एच या अक्षरांच्या बाह्य़ रूपासारखी दिसते. साधारणत: या वर्षी सिल्हाऊट ए लाइन, एच लाइनमधले असतील. कपडय़ांच्या फिटिंगबद्दल बोलायचं तर सगळ्यांचंच प्राधान्य ‘कम्फर्ट फिट’कडे असल्याने फॉर्मल पेहरावातही काही कॅज्युअल घटकांचा समावेश असेल. म्हणजे पुरुषांमध्ये फॉर्मल सूट्सबरोबर कॅज्युअल राउंड नेक किंवा व्ही नेक टीशर्ट आणि पायात लोफर शूज, स्नीकर शूज जास्त घातले जातील; स्त्रियांचे स्पगेटी वनपीस ड्रेसेस नेहमीसारखे अचूक फिटिंग, खोल गळ्याचे नसून ढगळ फिटिंग व हाय नेक असतील. जवळपास सगळ्या मॉल्स, दुकानांमध्ये हायवेस्ट पँट्सची चलती असेल. याशिवाय मुलींसाठी चौकोनी गळे, असिमेट्रिकल गळे, योक पॅटर्न, पफ्फड शोल्डरमधील कपडे जास्त प्रचलित असतील.

रंग आणि आकार यानंतर कपडय़ावर यायला हवं. या यादीत पहिला क्रमांक वॉश्ड डेनिम फॅ ब्रिकचा आहे. वॉश्ड डेनिम म्हणजे आपल्या जीन्स किंवा डेनिम जॅकेटवर एका विशिष्ट प्रकारचे शेडिंग दिसते त्याला वॉश्ड डेनिम म्हणतात. स्त्रियांसाठी शिअर आणि ट्रान्सलुसेंट म्हणजेच अर्धपारदर्श व हलक्या फॅब्रिक्सपासून बनवलेले शर्ट्स, टॉप्स, स्क र्ट्स, लाँग गाउन्स, साडी, घागरा जास्त घातले जातील. याच फॅब्रिक्समध्ये जॉर्जेट, शिफॉन, टीशू, लेस, नेट्स, टय़ुल या सगळ्याच फॅब्रिक्सचा समावेश आहे. त्यावरचं नक्षीकामही फॅब्रिकच्या जवळ जाणाऱ्या रंगाचं किंवा मग मेटालिक सिक्वेन्सची असेल. नक्षीबरोबरच फॅब्रिक रिपल्स, रफ्फल्स, फ्रेड्सचं फॅब्रिक ऑर्नमेंटेशन योग्य वापरात दिसेल. ‘फॅब्रिक ऑर्नमेंटेशन’ म्हणजे एखादं फॅब्रिक नेत्रसुखद, देखणं बनवण्यासाठी केलेली कलाकुसर. मग त्यात फॅब्रिक डाइंग, शेडिंग, प्रिंटिंग, पेंटिंग, शिवणकाम सगळ्याचा समावेश असतो.  या वर्षीही हँडलूम्सकडे लोक आकर्षित होतील. पुरुषांच्या फॉर्मल वेअरमध्ये प्लेड चेक्स, स्ट्रइप्ड फॅब्रिक्स तर कॅज्युअल वेअरमध्ये हवाईयन प्रिंटेड शर्ट्स जास्त दिसतील; स्त्रिया ब्लॅक आणि व्हाइट पोलका डॉट्स, जपानी ओरिएंटल बोल्ड फ्लोरल प्रिंट्सला प्राधान्य देतील. कार्टून्सवरून प्रेरित प्रिंट्स, उठावदार रंगातील अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रिंट्स हे तर दोन्हीकडे आवडीचे ठरेल. ठरावीक काळासाठी का होईना पारदर्शक विनैल प्लास्टिकपासून बनवलेले ट्रेन्चकोट्सही चर्चेत असतील. हा होता फॅशनच्या मूळ घटकांचा यंदाच्या फॅशन ट्रेंड्सवर दिसणारा प्रभाव. आता जरा मी माझा संकल्प गांभीर्याने घेतला असल्याने हाच उत्साह कायम ठेवत पुढच्या वेळी आजच्याच लेखाला जोडून घेणारा पुढचा भाग असेल. ज्यात या सगळ्या घटकांना एकत्रित विचार करून या वर्षीचे ट्रेंडी कपडे, अ‍ॅपरल्स, फुटवेअर, अ‍ॅक्सेसरीज, ज्वेलरी आणि बाकी ट्रेंड्स कसे असतील ते आपण पाहू.

viva@expressindia.com