News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : गरज सेक्स एज्युकेशनची!

बहुतेकांनी इंटरनेटवरून सेक्सविषयी बरीच माहिती मिळवलेली असते, पोर्नोग्राफी पाहिलेली असते.

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

शचीला वाटतंय की तपन तिला टाळतोय आजकाल. गेले काही दिवस ती त्याच्याशी निवांतपणे बोलायचा प्रयत्न करते आहे. पण इतके दिवस चुटकीसरशी हाजीर होणारा तपन सापडतच नाहीये तिला. ती खूप घाबरली आहे. तपन आणि शची प्रेमात पडले त्याला आता वर्ष झालं. फेसबुकवर, व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता करता आपले विचार जुळतायत असं त्यांच्या लक्षात आलं. मग ते हळूहळू भेटायला लागले, बाहेर जायला लागले. शचीच्या वाढदिवसाला लोणावळ्याला जायचं ठरवलं त्यांनी. परत आल्यावर काही दिवस गेले. शचीची पाळी नेहमीच्या वेळेत आली नाही. काही वेळा थोडाफार उशीर व्हायचा म्हणून तिनं दुर्लक्ष केलं पण तिला सारखी धाकधूक वाटायला लागली. शेवटी तिने हिंमत करून फार्मासिस्टकडून प्रेग्नन्सी टेस्ट कीट आणलं आणि युरिन तपासली. ती टेस्ट पॉझिटिव्ह होती. म्हणजे ती प्रेग्नंट होती! आता मात्र तिला खरंच टेन्शन आलंय.

तुमच्यातील कोणावर अशी वेळ आलीये? आपल्यापैकी काही जणांनी शाळेत सेक्स एज्युकेशनचे धडे घेतलेले असतात. बहुतेकांनी इंटरनेटवरून सेक्सविषयी बरीच माहिती मिळवलेली असते, पोर्नोग्राफी पाहिलेली असते. पुस्तकांमधून, इंग्लिश चित्रपटांमधून, मित्र-मैत्रिणींकडून या माहितीत भर पडलेली असते. तरीही काही केल्या स्त्री-पुरुष संबंधांमधलं गुपित कळलेलंच नसतं. तरुणपणात हॉर्मोन्स वाढतात, नवनवीन अनुभव घेऊन पाहायची जबरदस्त इच्छा होते. त्यातल्या धोक्यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. नव्यानं मिळालेलं स्वातंत्र्य अजमावायचं असतं. काही वेळा आपला मर्दपणा शाबीत करायचा असतो तर काही वेळा इतर सगळे करतायत म्हणून हा अनुभव घ्यायचा असतो. कित्येकांचं म्हणणं असतं की ही इतकी नैसर्गिक गोष्ट आहे तर काय हरकत आहे शरीरसंबंधाचा अनुभव घ्यायला?

प्रॉब्लेम इतकाच असतो की हक्काच्या या जाणिवेबरोबर त्यातल्या जबाबदारीची जाणीव मात्र आलेली नसते. खरं तर आपल्या आजूबाजूला माहितीचा विस्फोट झालाय. कुठलीही माहिती ‘अ‍ॅट द क्लिक ऑफ अ बटन’ मिळू शकते. पण म्हणून सेफ सेक्सविषयी किती जण माहिती घेतात? तुम्ही म्हणाल, नक्की कशापासून सेफ राहायचं असतं? शरीरसंबंधांच्या वेळी काही काळजी घेतली नाही तर प्रेग्नन्सी, लैंगिक आजार (Sexually Transmitted Infections) आणि लैंगिक अत्याचार असे काही धोके असतात. एग आणि स्पर्म एकत्र येऊन बाळ तयार होऊ  शकतं आणि ती मुलगी प्रेग्नंट राहू शकते. असं झालं तर दोन पर्याय असतात. प्रेग्नन्सी कन्टिन्यू करायची किंवा टर्मिनेट करायची. दोन्हींमध्ये फायद्यांपेक्षा तोटेच अधिक. बाळ होऊ देण्याचा निर्णय तसा अवघड असतो. कारण ते प्लॅन केलेलं नसतं. बहुतेक वेळा तशी मानसिक आणि आर्थिक तयारीही नसते. गर्भपाताचा निर्णय घेतला तर तुमचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल तर फक्त तुमची परवानगी चालत नाही, कुणा तरी अ‍ॅडल्टची सही लागते. शिवाय त्यात अतिरक्तस्राव, इन्फेक्शन अशा गुंतागुंती होऊ  शकतात. लपून छपून, बेकायदा ठिकाणी केलेल्या गर्भपातामुळे आणखीनच जिवघेणे प्रॉब्लेम्स येतात. लग्नानंतर मूल व्हायच्या वेळी काही नवीन प्रश्न उभे राहू शकतात. त्याशिवाय खर्च, मानसिक त्रास, सुट्टय़ा हे प्रश्न वेगळेच असतात.

दुसरा धोका लैंगिक रोगांचा. एड्सविषयी काही बेसिक माहिती आपल्याला असायला हवी. हा रोग एकदा झाला की यासाठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. कारण तो पूर्णपणे बरा करणारा उपचार अजून सापडलेला नाही. तो होऊ  नये म्हणून कुठली लसही अद्यापपर्यंत तयार झालेली नाही. बाहेरून नुसतं बघून कुणाला एड्स झाला असेल ते सांगता येत नाही; कारण ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसू शकते. त्यामुळे धोका अधिकच वाढतो. तुमच्याकडून तुमच्या पार्टनरला, बाळाला हा रोग होऊ शकतो. या व्यतिरिक्त होणाऱ्या गुप्तरोगासारख्या लैंगिक आजारांवर दोन्ही पार्टनर्सना तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार घ्यावे लागतात.

शची आणि तपन, दोघांनीही याविषयी काहीच विचार केलेला नव्हता. त्यांना काही माहितीही नव्हती. काय बरं माहिती असायला हवी होती त्यांना? जेव्हा दोन व्यक्ती शरीरसंबंधाचा निर्णय घेतात, तेव्हा त्यातले किती जण एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करीत असतात? बाळ मुलींच्या पोटात वाढतं म्हणून मुलांची काहीच जबाबदारी नाही का? सगळी काळजी, टेन्शन मुलींनीच घ्यायचं का? याविषयी पुढच्या आठवडय़ात पाहू..

क्रमश:

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 12:32 am

Web Title: sex education stress management
Next Stories
1 नैवेद्याचे पान
2 ओ साथी चल..
3 कल्लाकार : कपडे आणि बरंच काही..
Just Now!
X