लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या निमित्ताने आयसीएएस अधिकारी सुप्रिया देवस्थळी यांच्याशी संवाद साधण्यासाठी तरुणाई मोठय़ा संख्येनं उपस्थित होती. स्पर्धा परीक्षेचं आव्हान पेलताना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनी विचारल्या, अभ्यास कसा करावा इथपासून ते भाषा कुठली निवडावी इथपर्यंतच्या शंकांना सुप्रिया देवस्थळी यांनी उत्तरं दिली. याशिवाय नोटाबंदीपासून जीएसटीपर्यंत आणि भ्रष्टाचारापासून राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. वित्तविभागातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलण्यातली आव्हानं, नागरी सेवांच्या कक्षा यानिमित्ताने सोप्या शब्दात समजून घेता आल्या. कार्यक्रमाला उपस्थित तरुणाईच्या निवडक प्रतिक्रिया :

नागरी सेवांचं मर्म उलगडलं

नागरी सेवा परीक्षांविषयी माहिती आजच्या लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या माध्यमातून मिळाली. सुप्रिया देवस्थळी मॅडमनी नागरी लेखा सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली. या क्षेत्राचं महत्त्व कळलं आणि परीक्षांबद्दल अत्यंत आवश्यक असं मोलाचं मार्गदर्शन मिळालं.

निंबा माळी

 

नागरी सेवांविषयी शंकांचं निरसन

लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या माध्यमातून नागरी सेवा परीक्षांविषयी अनेक शंकांचं निरसन झालं. देवस्थळी मॅडमनी खूप सोप्या शब्दात अनेक संकल्पना स्पष्ट केल्या. विशेषत लेखा सेवांबाबत माझ्या मनातील अनेक कनसेप्ट क्लिअर झाल्या. एक अधिकारी म्हणून आव्हानांना कसं तोंड द्यावं ही गोष्ट मला शिकायला मिळाली.

स्वाती पाटील

 

नवीन माहिती मिळाली

मी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. आता पुढे काय करायचे याच विचारात होतो. लोकसेवा परीक्षांविषयी ऐकून होतो. आजच्या कार्यक्रमातून माझ्या करिअरविषयी विचारांना दिशा मिळाली. सुप्रिया मॅडमनी स्पर्धा परीक्षांबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं. सिव्हिल सव्‍‌र्हिसेसबद्दल फक्त ऐकून होतो. त्यांच्या कामातील अनुभव त्यांनी सांगितल्यामुळे त्याविषयी अनेक गोष्टी समजल्या.

विठ्ठल देवळे

 

थम्बरूल्स लक्षात ठेवेन

लोकसत्ता व्हिवा लाउंजचा आजचा कार्यक्रम खूप आवडला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे, विषय निवडण्याचे, मुलाखतीविषयीचे सुप्रिया मॅडमनी केलेलं मार्गदर्शन उपयुक्त आहे. विशेषत विषय निवडीचा जो थम्बरूल त्यांनी सांगितलाय तो बेस्ट वाटला. राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षांविषयी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण शिकण्यासारखं आहे.

रवी जाधव

 

ध्येयाचा मार्ग सापडला

मी सध्या ‘यूपीएससी’च्या परीक्षेची तयारी करत आहे. सुप्रिया देवस्थळी यांच्याशी गप्पांच्या या कार्यक्रमातून चांगलं मार्गदर्शन मिळालं.  सिव्हिल सर्विसेसबाबत अनेक शंकांना उत्तरं मिळाली. अभ्यासाची पद्धत, मुलाखतीचं मर्म यातून शोधता आलं आणि मला यातून पुढचा मार्ग सापडला. असे आणखी कार्यक्रम लोकसत्ताने पुण्यात करावेत अशी विनंती.

भानुदास खेडेकर

 

सकारात्मकता मिळाली

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढत आहे. पण देवस्थळी मॅडमच्या बोलण्यामुळे विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील अशी मला खात्री आहे. लोकसत्ता व्हिवानं असे आणखी कार्यक्रम करावेत, असं वाटतं. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना दिशा मिळू शकते. आजच्या कार्यक्रमातून अशी सकारात्मक ऊर्जा मिळाली.

ओंकार कलढोणे

 

महिला अधिकाऱ्याची भेट प्रेरणादायी

मी लोकसत्ता व्हिवा आवर्जून वाचते. त्यातले लेख चांगले असतात. व्हिवा लाउंज कार्यक्रम अटेंड करता आला. देवस्थळी मॅडमनी स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जायचे याचे खूप छान मार्गदर्शन केले.  एक महिला अधिकारी किती सक्षमपणे सगळं हाताळू शकते आणि मार्गदर्शन करू शकते, याची झलक मिळाली. त्यांची भेट आणि संवाद निश्चित प्रेरणादायी ठरला.

कोमल चिरमे

 

दिलखुलास अधिकाऱ्याशी भेट

नागरी सेवेतील अधिकारी लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या निमित्ताने प्रथमच भेटले. अकाउंट्स आणि वित्त विभागासारख्या किचकट कामामध्ये अधिकारपदावर असूनदेखील इतकं दिलखुलास व्यक्तिमत्त्व असू शकतं, हे भावलं.

प्राची सकपाळ