राधिका कुंटे

फॅशन, पर्यावरण आणि प्रयोग या तिन्ही सूत्रांना एका धाग्यानं जोडणारा, जुन्या आणि नव्याचा संगम साधणारा हा कल्लाकार आहे डिझायनर अमित अग्रवाल. टाकाऊतून टिकाऊचा मंत्र साडय़ांच्या बाबतीत लागू करत त्याने जुन्या पटोला साडय़ांना नवीन लुक दिला. कोलकात्याहून खास हातमागावर विणलेलं जामदानी कापड, चेन्नईहून आणलेले खास गालिचे आणि पॉलिथिन बॅग्स यांची सहज सरमिसळ करून अमित कलेक्शन तयार करतो.

टाकाऊपासून टिकाऊ  वस्तू तयार करण्याचे धडे आपण शाळेत गिरवलेले असतात. नारळाची करवंटी, रिकामी खोकी, कागद, चिंध्या अशा ढीगभर टाकाऊ वस्तूंपासून कितीतरी उपयुक्त वस्तू बनविल्याचं अनेकांना आठवत असेल. या प्रयोगाला फॅशनेबल टच देत टाकाऊतून कलात्मक ज्वेलरी किंवा अ‍ॅक्सेसरीज बनविण्याचे प्रयोगही आपण नेहमी ऐकतो, पाहतो नि त्यातलेच काही प्रयोग करूनही पाहतो. हे प्रयोग बहुतांश वेळा वैयक्तिक पातळीवर  मर्यादित असतात. पण एखादा डिझायनर अशाच प्रयोगांमधून दर वेळी नवं कलेक्शन आणत असेल तर? ही कलेक्शन्स केवळ भारतात नाही, तर परदेशातही विकली जात असतील तर? तो कपडे तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणं कापड तर वापरतोच, पण औद्योगिक प्रक्रियेत वाया गेलेल्या गोष्टीही आवर्जून वापरतो. ऐकायला थोडंसं विचित्र वाटत असलं, तरी गेल्या काही वर्षांपासून आपल्या कलेक्शन्समध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न डिझायनर अमित अग्रवाल सातत्यानं करतो आहे.

प्लॅस्टिक, औद्योगिक कचरा आणि कापड हे अमितचे मुख्य प्रेरणास्रोत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘‘इकोफ्रेंडली फॅशन म्हणताना नैसर्गिक घटकांचा वापर करून कपडे तयार करणं, ही संकल्पना येतेच. पण त्याचसोबत कारखान्यात निर्माण झालेल्या आणि वाया जाणाऱ्या साहित्याचा वापर करणंही महत्त्वाचं आहे. तरच शून्य कचरानिर्मितीचं लक्ष्य साध्य होईल,’’ हे अमित आवर्जून नमूद करतो.

फॅशन क्षेत्रात असल्यामुळं कापडापासून प्रेरणा मिळणं साहजिकच आहे. पण औद्योगिक वस्तूंशी अमितचा संबंध आला, तो त्याच्या वडिलांमुळं. ‘‘माझे वडील आर्किटेक्ट होते. लहानपणापासून त्यांच्या कामाच्या साइटवर माझं फिरणं व्हायचं. त्या वेळी वेगवेगळी स्ट्रक्चर, ब्लू प्रिंट्स यांचा प्रभाव माझावर पडला,’’ असं तो सांगतो. त्यामुळं इतर डिझायनर्सच्या कलेक्शनपेक्षा वेगळं असणारं त्याचं डिझाइन चटकन लक्षात येतं. त्याच्या ड्रेसेसचे शार्प कट्स, भौमितिक आकार, प्रमाणबद्धता, बोल्ड कलर्स पहिल्यांदा नजरेत भरतात. प्लॅस्टिक, रबर, पॉलिमर शीट्सचा वापर त्याच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये होत असतो. कापडाचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे त्याचा सुळसुळीतपणा. कापड कितीही जाड किंवा पातळ असलं, तरी एका सरळ रेषेत खालच्या दिशेनं त्याला फॉल असतो. अर्थात कापडाच्या वजनानुसार हा सुळसुळीतपणा कमी-जास्त होतो. त्याविरुद्ध प्लॅस्टिक, रबर, पॉलिमर शिट्स त्यांच्यातील कडकपणामुळं विशिष्ट आकार घेतात. थोडक्यात सांगायचं झालं, तर ड्रेसमध्ये जादाचं कापड घेतल्यास त्याचा घेर वाढेल, पण ड्रेसला गोलाई येणार नाही. त्यासाठी ड्रेसच्या आत कास्केट, कॅनकॅन स्कर्ट वापरावा लागतो. पण तेच प्लॅस्टिक, पॉलिमर शीट्सला गोलाकार आकार दिला तर हा परिणाम साधता येऊ  शकतो. दोन वर्षांपूर्वी स्ट्रॉपासून बनविलेला स्कर्ट आणि ड्रेस त्यानं कलेक्शनमध्ये सादर करत सगळ्यांना थक्क केलं. करिश्मा कपूर, नर्गिस फाक्री, जेनिलिया देशमुख, दिया मिर्झा, सय्यामी खेर, पूजा हेगडे, सोना मोहपात्रा, मानसी स्कॉट, तमन्ना भाटिया, आदी अनेक सेलेब्रेटींनी त्याचं डिझायनरवेअर वापरलं आहे. डिझायनर वेअर केवळ रॅम्पवरच सुंदर दिसतात, हा समज दूर करत प्रत्येकीला हे कपडे वापरता येतील, याकडं तो जातीनं लक्ष देतो. त्यामुळं त्याचं कलेक्शन सादरीकरणापलीकडं जाऊन वापरण्यासाठीही तितकंच सोयीचं असतं.

फॅशन डिझायनिंगचं रीतसर शिक्षण घेतल्यावर अमित सुरुवातीला डिझायनर तरुण तेहलीयानींकडे काम करत होता. २०११मध्ये ‘अवेडौ ब्रँड’सोबत त्यानं ‘पॅरिस हेअर अँड मेकअप शो’मध्ये स्वत:चं कलेक्शन सादर केलं. नंतर त्यानं स्वत:चं लेबल सुरू केलं. ‘अमित अग्रवाल’ या त्याच्या लेबलअंतर्गत ‘कुटुर कलेक्शन्स’ तयार केली जातात. तर ‘एम.इट’ हे रेडी टू वेअर कलेक्शन लेबल आहे.  ही दोन्ही लेबल्स ‘टाकाऊपासून टिकाऊ’ तत्त्वावर चालतात. भारतासोबतच अबूधाबी, दुबई, लंडन अशा जगाच्या कानाकोपऱ्यात अमितचा ग्राहकवर्ग विखुरलेला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यानं सुरू केलेल्या ‘एम.इट’ लेबलचं वैशिष्टय़ म्हणजे यात भारतातील पारंपरिक टेक्सटाइल, डाइंग, विव्हिंग पद्धतीही आवर्जून वापरल्या जातात. ‘एम.इट’ म्हणजेच ‘आय अ‍ॅम इट’ ही संकल्पना. ‘इर्टनिटी’ किंवा ‘शाश्वतता’ हे या लेबलमागचं तत्त्व असल्याचं अमित सांगतो. आपण एका बाजूला जुन्या परंपरा, पद्धतींबद्दल बोलतो तेव्हा सहजच नवं संशोधन, पद्धतींना बाजूला सारतो. तेच लेटेस्ट ट्रेण्ड्सबद्दल बोलताना जुन्या कलाकुसरीकडं दुर्लक्ष करतो. या लेबलमध्ये त्यानं हा प्रकार आवर्जून टाळला आहे. ‘आज आपलं आयुष्य लेटेस्ट टेक्नोलॉजीवर अवलंबून आहे. औद्याोगिकीकरण हा आपल्या आयुष्याचा पाया आहे. दुसऱ्या बाजूला या भल्यामोठय़ा भारत देशात इतक्या वेगवेगळ्या आणि सुंदर विणकामाच्या पद्धती आहेत. मग त्यांचं विभाजन करण्यापेक्षा एकत्रीकरण करायला काय हरकत आहे,’ असं अमित कळकळीनं विचारतो. कोलकातावरून खास हातमागावर विणलेलं जामदानी कापड, चेन्नईहून आणलेले खास गालिचे आणि पॉलिथिन बॅग्स यांची सहज सरमिसळ करून अमित कलेक्शन तयार करतो. २०१५मध्ये एका कलेक्शनसाठी त्यानं बिंदी किंवा टिकलीपासून प्रेरणा घेत कापडावर वेगवेगळे पॅटर्न तयार केले. या पॅटर्न्‍सची रचना इक्कतसारखी होती, प्लॅस्टिक शीट्स वितळवून त्याचा वापर कापडासारखा केला होता.

प्रत्येक दिवाळीला अमित दिल्लीच्या एका अंध मुलांच्या शाळेत दिवाळी मेळाव्यासाठी जायचा. तिथं गुजरातमधील वाघरी जमातीच्या एका महिलेशी त्याची ओळख झाली. या समाजाच्या बायका घरोघरी जाऊन नव्या भांडय़ांच्या बदल्यात जुन्या पटोला साडय़ा गोळा करायच्या. ही महिला शहरात या साडय़ांचे वॉलपासून बनवलेले हँगिंग, डेकोरेटिव्ह पीस म्हणून विकायची. तिच्याकडून अमितनं या साडय़ा गोळा केल्या. शिवाय त्याच्या साहाय्यकांनी गावोगावी फिरून जुन्या, फाटक्या पटोला साडय़ा गोळा केल्या. या साडय़ांचं रिस्टोरेशन करणं, त्यांना नवीन लुक देणं हे मोठं महत्त्वाचं नि जिकिरीचं काम होतं. कारण ते करताना अमितला त्या साडय़ांचं मूळ सौंदर्य बिलकूल घालवायचं नव्हतं. प्लिटिंग, बॉण्डिंगसारख्या नव्या पद्धती या रेस्टोरेशनसाठी त्यानं वापरल्या. साडय़ांसोबत टाकाऊ  औद्योगिक साहित्य वापरून एक आगळं कलेक्शन सादर केलं. ते तयार करताना त्यानं पटोलाचं डिझाइन आणि रंग आणि औद्योगिक पद्धतीतून मिळणारे रंग यांच्यावर लक्ष दिलं. पटोलामध्ये साधारणपणे निळा, जांभळा असे रंग पहायला मिळतात. त्यांना मेटॅलिक रंगांची जोड देण्यासाठी त्यानं नव्या पद्धतींचा वापर केल्याचं तो सांगतो. या कलेक्शनमध्ये प्रामुख्यानं जॅकेट्स, स्कर्ट्स, केप्स, क्रॉप टॉप्सचा समावेश होता. असे प्रयोग पाहायला किंवा ऐकायला वेगळे वाटले, तरी त्यांचं खरेदीमूल्य किती हा प्रश्न उद्भवतो. पण अमितच्या कलेक्शन्सचा चाहता वर्ग भारतात नाही तर परदेशातही आहे. ‘परदेशात भारतीय कलेक्शन्स, डिझाइन्सबाबत कमालीची उत्सुकता आहे. आपल्याकडं केली जाणारी बारीक कलाकुसर जगात इतरत्र अभावानंच पहायला मिळते. त्यामुळं परदेशी ग्राहक आवर्जून अशी भारतीय कलेक्शन्स घेतो,’ असं तो नमूद करतो. परंपरा आणि नवतेचा सुयोग्य मेळ साधत एकेका वस्त्राच्या धाग्यांचा नि बाजांचा विचार करणाऱ्या अमितच्या करिअरसाठी ‘शाश्वत’ शुभेच्छा!

एक डिझायनर म्हणून सतत नवनव्या स्टाइल्स शिकून त्यांचा नेमका नि नेटका वापर कलेक्शनमध्ये करणं महत्त्वाचं आहे,  तसं पारंपरिक कला-कौशल्यांमधली नवता शोधून त्यांचं जतन करणं हेही महत्त्वाचं! या सगळ्या प्रक्रियेत मी जुन्या पारंपरिक साडय़ा नि त्यांवरील कलाकुसरीकडे कायमच आकर्षित होतो.

अमित अग्रवाल

viva.loksatta@gmail.com