23 January 2018

News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : अपघात आणि नियम!

पेपरमध्ये आलेल्या दुसऱ्या एका बातमीतली मुलं मात्र तितकी नशीबवान नव्हती.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: August 4, 2017 2:54 AM

शिखाच्या कॉलेजमध्ये या प्रसंगानंतर ट्रॅफिक पोलिसांनी एक वर्कशॉप घेतलं.

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं?

 स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

शिखाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा गेल्या आठवडय़ात अपघात झाला. रात्री उशिरा एक काम संपवून ती परत येत होती. ग्रीन सिग्नल लागला म्हणून ती थांबली तर मागून जोरात येणाऱ्या गाडीने तिला धडक मारली. डॉक्टर म्हणाले की तिने हेल्मेट घातलं होतं म्हणून ती वाचली. पण पाय फ्रॅक्चर झाला. तातडीने ऑपरेशन करायला लागलं.

पेपरमध्ये आलेल्या दुसऱ्या एका बातमीतली मुलं मात्र तितकी नशीबवान नव्हती. पार्टी मूडमध्ये असलेल्या त्या दोन मुलांची तुफान वेगात असलेली कार वाटेतल्या झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की दोघेही वाचू शकले नाहीत.

रोज पेपर उघडला की अपघाताची एक तरी बातमी वाचायला मिळते. बहुतेक अपघात पहाटेच्या वेळी होतात आणि तुमच्यासारखे तरुण त्यात बळी जातात. बातमी वाचून आपण हळहळतो, चुकचुकतो आणि विसरून जातो. कित्येक तपशील आपल्याला कधीच समजत नाहीत. नक्की काय झालं? टाळता आला असता का तो अपघात? हेल्मेट घातलं होतं का? स्पीड लिमिट पाळलं होतं का? गाडी चालवताना मोबाइलवर बोलत होते का? दारू प्यायले होते का? कुणाशी विनाकारण स्पर्धा चालू होती का? रात्रीचा प्रवास टाळून नीट झोप काढून सकाळी निघता आलं असतं का? का होतात अपघात रात्रीच्या वेळी जास्त? उलट तेव्हा रस्त्यावर गर्दी किती तरी कमी असते.

कोणत्याही सिग्नलवरचं दृश्य घ्या. अनेक शूरवीर लाल सिग्नलला थांबण्याचे कष्ट न घेता झपकन जात असतात. पिवळ्या सिग्नलमधून वेगात गाडी काढत असतात. चुकूनमाकून थांबलेच असतील तर त्यांचा हॉर्नवरचा हात काही निघत नाही. तिथे थांबलेले सगळे वेडे आहेत अशा नजरेनं ते लोकांकडे तिरस्कारानं पाहत असतात. आणि तो सिग्नल हिरवा झाल्या झाल्या हॉर्न वाजवून सुटायची किती घाई!

सिग्नलला थांबण्याचे इतके कष्ट का वाटतात आपल्याला? एरवी तासन्तास वेळ वाया घालवणारे आपण काही सेकंदांसाठी एवढे अस्वस्थ का होतो? आमच्या युथ क्लबमध्ये जेव्हा याविषयी चर्चा झाली तेव्हा सुरुवातीला सगळ्यांची उत्तरं ‘पॉलिटिकली करेक्ट’ या प्रकारात मोडणारी होती. आपण कसे नेहमी सिग्नल पाळतो हे प्रत्येक जण हिरिरीनं सांगायला लागला. तेवढय़ात कुणी तरी म्हटलं, ‘ए, पण रस्त्यावर कोणी नसेल तर कशाला थांबायचं उगीच? नीट इकडे तिकडे बघून गेलं की झालं.’ कोणी तरी असं म्हणायची वाटच बघत होते सगळे. लगेच बहुतेकांना ते पटलं. ‘बरोबर आहे, रात्रीच्या वेळी कारण नसताना चालू ठेवतात सिग्नल तेव्हा कुणीच नसतं रस्त्यावर, उगीच वेळ वाया जातो.’

एकूणच रहदारीचे नियम आपल्याला त्रास देण्यासाठी बनवलेले असतात असं बहुतेक तरुणांचं ठाम मत असतं. मग ते हेल्मेट घालणं असो, कागदपत्र बाळगणं असो की स्टॉप लाइनच्या मागे थांबणं असो. ‘वन वे’ज आणि ‘नो एन्ट्रीज’ तर फारच अडचणीच्या. आणि नेमका आपल्याला उशीर झाला की सगळे सिग्नल लाल लागणार हे ठरलेलं.

न्यू इअरच्या रात्री नाक्या-नाक्यावर पोलीस उभे असतात ते का? कारण कुठलीही पार्टी म्हणजे अल्कोहोल पिणं हा नियम झालाय. काही वेळा इतर ड्रग्जही घेतले जातात. अमलाखाली आपला मेंदू कसा काम करेल? वर मूडही मस्तीचा असतो. एकमेकांशी गप्पा मारत, रेस लावत कशाही गाडय़ा चालवल्या जातात. शक्य तितकं ट्रॅफिकच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं जातं. साहजिकच अपघात जास्त होतात.

घाई तर नेहमीच असते आपल्याला! पण दर वेळी असं स्वत: अनुभव घेऊन पाहायचं का? एखादी वेळ अशी येते की या घाईची जबर किंमत चुकवायला लागते.

मोडलेली गाडी दुरुस्त करता येते. अगदीच नाही तर नवीन घेता येते. पण मोडलेलं शरीर दुरुस्त करणं नेहमीच शक्य होतं असं नाही. त्यात वेळ, पैशाचा चुराडा तर होतोच शिवाय मानसिक आणि भावनिक त्रास होतो तो वेगळाच. आणि जीव गेला तर? तो दुसरा कुठून आणायचा?

शिखाच्या कॉलेजमध्ये या प्रसंगानंतर ट्रॅफिक पोलिसांनी एक वर्कशॉप घेतलं. अपघात झालेली ती मैत्रीण मुद्दाम व्हीलचेअरवर आली होती. जे सगळे नियम निर्थक वाटतात ते मोडले तर काय काय होऊ  शकतं यावर काही रोल प्लेज झाले. चौकात बसवलेले सिग्नल्स किती विचार करून बसवलेले असतात, त्यासाठी किती काळजीपूर्वक नियोजन केलेलं असतं ते पोलिसांनी सांगितलं. रस्ता रिकामा आहे म्हणून गाडी सुसाट सोडण्याचे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याचे काय भीषण परिणाम होऊ  शकतात हे काही फिल्म क्लिप्समधून दाखवलं. रात्रीच्या वेळी काय काळजी घ्यायला हवी तेही सांगितलं. शेवटी अगदी शाळेत घेतात तशी सगळ्यांनी ट्रॅफिक रुल्स पाळण्याची शपथ घेतली. शिखा, तिची मैत्रीण आणि इतर बऱ्याच मुलांनी ट्रॅफिक अवेअरनेसचा हा वसा पुढे न्यायचा ठरवलाय.

डॉ. वैशाली देशमुख viva@expressindia.com

First Published on August 4, 2017 2:54 am

Web Title: traffic rules accidents issue stress management
  1. No Comments.