रोहित अशोक

ट्रॅवल व्लॉगर्सच्या गर्दीत आणखी एका चॅनलची चांगलीच धूम आहे. ते चॅनल म्हणजे ‘टोल फ्री ट्रॅव्हलर’. वेगवेगळ्या ठिकाणांची विस्तृत माहिती, व्हॉइसओव्हरचा योग्य तो वापर करत हे टोल फ्री व्लॉग्स भटकंतीचा खराखुरा अनुभव देतात. हे व्हिडीओ ब्लॉग्स तयार करणारा रोहित अशोक हा मूळचा चेन्नईचा. मुंबईत काही वर्षे वकिली केल्यानंतर त्याने आपली वाट व्लॉगिंगकडे वळवली. भटकंतीची आवड पहिल्यापासून होतीच. या भटकंतीचे अनुभव शेअर करण्याच्या मोहातून व्लॉगिंग सुरू झालं. रोहित म्हणतो, ‘स्वत:ला थेट लोकांशी जोडण्याचा एक दुवा म्हणजे व्लॉगिंग. तुमच्या आनंदाच्या, थराराच्या आणि काही अविस्मरणीय क्षणांमध्ये व्लॉगिंगच्या साहाय्याने तुम्ही इतरांनाही त्या क्षणाचे साक्षीदार बनवून घेता. व्लॉगिंग म्हणजे फक्त स्वत:चा अनुभव शेअर करणं असंच काही नसतं. या माध्यमातून तुमच्यामुळे एखाद्या ठिकाणाकडे पाहण्याचा इतरांना एक नवा दृष्टिकोन मिळू शकतो.’

गेल्या काही महिन्यांपासून व्लॉगिंग सुरू केलेल्या या टोल फ्री ट्रॅव्हलरला म्हणजेच रोहितला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. रोड ट्रिप हे रोहितच्या व्लॉग्जसं वैशिष्टय़ असतं.  प्रेक्षकांचे रिस्पॉन्स, त्यांचं कुतूहल आणि त्यांची उत्सुकताच या सर्व व्लॉगर्सना काही तरी नवीन करण्याची प्रेरणा देत असते. व्लॉगिंग करताना अडचणीही येतातच. त्याबद्दल रोहित सांगतो, ‘व्लॉगिंगसाठी फुटेज घेणं कधी कधी फारच कठीण होऊन बसतं. त्यातही शूट केलेल्या त्या भरमसाट फुटेजमधून योग्य तो भाग निवडत काही मिनिटांच्या व्लॉगचं एडिटिंग करणं हीसुद्धा तसं पाहायला गेलं तर आव्हानात्मक बाब आहे. प्रवासादरम्यान, बाइक चालवत असताना हे सर्व शूट करणं, भटकंतीच्या विसाव्यादरम्यान व्लॉगिंगचं सगळं काम बघणं, त्यासाठीची साधनं कॅरी करणं.. या गोष्टी येतातच. पण ही संपूर्ण प्रक्रिया मला आनंद देते, असं रोहित म्हणतो.

जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन – देबाशीष घोष

आघाडीचा व्लॉगर मुंबईकर निखिलच्या लेह-लडाखच्या व्हिडीओ ब्लॉग्समध्ये देबू नावाच्या बाइकरनं सर्वाचं लक्ष वेधलं होतं. देबू अर्थात देबाशीष घोष त्याच्या विविध प्रकारच्या बाइक्समुळे हिट झाला होता. ‘वन वर्ल्ड वन राइड’ या यूटय़ूब चॅनलवर देबू त्याचे व्हिडीओ अपलोड करतो. व्लॉगिंग आणि देबू हे समीकरण जुळलं ते अर्थातच फिरण्याच्या सवयीमुळेच. वर्ल्ड टूरची डॉक्युमेंट्री बनवावी किंवा त्याचे व्लॉग्स करून प्रेक्षकांनाही आपल्या या प्रवासाचा एक भाग करून घ्यावं या उद्देशाने त्याने व्लॉगिंगची सुरुवात केली. याविषयी सांगताना देबू म्हणाला, ‘माझ्यासाठी व्लॉगिंग म्हणजे जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. येत्या जून महिन्यात मी विश्वभ्रमंतीवर निघणार आहे. त्यात मला साथ देईल माझी बीएमडब्ल्यू बाइक. त्या संपूर्ण वर्ल्ड टूरमध्ये माझे व्लॉग्स दर आठवडय़ाला ‘ओडब्ल्यूओआर’ या चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहेत.’

देबूची बाइक अनेकांना आकर्षून घेते. त्याच्या बाइक्सविषयी प्रेक्षकांना कमालीचं कुतूहल आहे. देबूला त्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘लांबच्या प्रवासासाठी बीएमडब्ल्यू योग्य बाइक आहे असं माझं मत.’ देबू, त्याचं भटकंतीचं वेड आणि त्याचं हार्ले डेव्हिडसनवर असणारं प्रेम त्याच्या प्रत्येक सबस्क्रायबरला ठाऊक आहे. देबू म्हणाला, ‘हार्ले डेव्हिडसन ही बाइक लक्षवेधी बाइक आहे यात शंकाच नाही. ही गाडी पाहताच अनेकांच्या नजरा वळतात, तेव्हा फारच छान वाटतं.’ देबाशीष घोषच्या या वर्ल्ड टूरची सध्या सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. मुख्य म्हणजे या वर्ल्ड टूरच्या निमित्ताने देबूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. तेव्हा व्लॉगिंग आणि भटकंतीच्या या रंजक प्रवासासाठी खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या नव्या प्रवासासाठी देबू सध्या फारच उत्सुक आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो या नव्या प्रवासाची तयारी करत आहे. सध्या ही तयारी शेवटच्या टप्प्यात आली असून व्लॉगिंगचा एक नवा पैलू देबू उलगडणार असं तो सांगतोय.

मुंबईनजिकची ठिकाणं पर्यटनसंवादाची मौज – शिवांगी वालिया

एमटीव्हीच्या ‘चेज द मॉन्सून’ या कार्यक्रमात शिवांगी वालियाही होती आणि त्यामध्ये गौरव प्रभूसोबतच तिने भटकंती केली होती. आता तिनंही व्लॉगिंग चॅनल सुरू केलं आहे. शिवांगी सांगते, ‘माझे व्लॉग्स वीकली व्लॉग्स असतील. त्यामध्ये भटकंतीखेरीज आणखीही बरेच विषय दाखवेन. पण, प्रवास हा माझ्या व्लॉग्सचा महत्त्वाचा भाग कायमच असेल. येत्या काळात माझ्या व्लॉग्समधून मध्य प्रदेश दिसणार आहे. जागोजागी फिरून तिथल्या लोकांशी गप्पा मारणं, त्यांना आपल्या जगण्याचा एक भाग करणं मुळातच मला आवडतं, त्यामुळे माझ्या व्लॉग्समधून मी शक्य तितक्या जास्त लोकांशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.’

viva@expressindia.com