वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

आजच्या काळात पत्रकार व्हायचं असेल तर वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाइन हे तीन पर्याय आहेत. इच्छाशक्तीला अभ्यासाची जोड दिली तर या क्षेत्रात चांगलं करिअर होऊ शकतं.

टीव्ही वृत्तवाहिन्यांचा उदय झाल्यापासून पत्रकारितेच्या क्षेत्राला चांगलंच ग्लॅमर आलं आहे. साहजिकच या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांची आणि त्यासाठी पत्रकारितेशी संबंधित शिक्षण घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या संस्थाही भरपूर निर्माण झाल्या आहेत. पत्रकारिता हे इतर क्षेत्रांच्या तुलनेत आव्हानात्मक तसंच सतत नावीन्याची अनुभूती देणारं क्षेत्र आहे. खूपदा पत्रकारिता करणं म्हणजे सतत डेडलाइन्सच्या ओझ्याखाली असणं, सतत राजकीय व्यक्तींचा दबाव येणं आणि तो झुगारून टाकावा लागणं, सतत चित्रपट तारेतारकांना भेटायला मिळणं, गुन्हेगारी क्षेत्राचं वृत्तांकन करायला मिळणं आणि त्यामुळे अंडरवर्ल्डचा दबाव येणं असे अनेकांचे गैरसमज असतात. या गोष्टी पत्रकारितेत असल्या तरी केवळ त्या म्हणजेच पत्रकारिता नव्हे. पत्रकारितेचा पट खूप व्यापक आहे; पण या क्षेत्राची आतून नीट माहिती नसल्यामुळे असे समज होतात. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी त्याची नीट माहिती करून घेणं आवश्यक आहे. खूपदा लिखाणाची आवड आहे, म्हणूनही काही जण पत्रकारिता हे क्षेत्र निवडतात; पण लिखाणाची आवड असणं आणि पत्रकारिता या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. लिखाणाची आवड आहे, असं म्हणणाऱ्यांना बहुधा सर्जनशील लिखाणाची म्हणजे कथा, कविता, ललित लेखन अशा लिखाणाची आवड असते; पण पत्रकारितेत करावे लागणारे लिखाण हे पूर्णत: वेगळ्या स्वरूपाचे असते. त्यामुळे आपल्याला पत्रकारितेत नेमके कशासाठी यायचे आहे याचा सगळ्यात पहिल्यांदा नीट विचार करणं आवश्यक आहे.

contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत पत्रकारिता म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रात किंवा साप्ताहिकात नोकरी करणं एवढंच मर्यादित होतं. प्रादेशिक वर्तमानपत्रात काम करणार की इंग्रजी वर्तमानपत्रात एवढाच निवडीला वाव होता. आज सुदैवाने तसं राहिलेलं नाही. वर्तमानपत्रं तर आहेतच, शिवाय टीव्ही वृत्तवाहिन्या आहेत. आता डिजिटलायझेशनच्या जमान्यात तर वेगवेगळ्या वेबसाइट्स, पोर्टल्स हेदेखील पर्याय निर्माण झाले आहेत. हे सगळेच पर्याय मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर काम मिळालं नाही असं सहसा होत नाही. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काम मिळतंच; पण एकदा ते मिळाल्यानंतर या क्षेत्रात कसं स्थिरावयाचं हे संबंधित व्यक्तीवर अवलंबून असतं. पूर्वीसारखं आता या क्षेत्रात एका ठिकाणी नोकरी मिळाल्यानंतर शेवटपर्यंत तिथेच चिकटून राहिलं असं होत नाही. तसं करूही नये. इतर सगळ्याच क्षेत्रांत आलेलं अस्थैर्य आता याही क्षेत्रात आहे; पण त्याचा इष्टापत्तीसारखा वापर करून घ्यायचा असतो. सुरुवातीच्या काळात तुम्ही जितक्या वेगवेगळ्या नोकऱ्या कराल तितकी तुमच्या अनुभवात भर पडत जाते. वेगवेगळ्या ठिकाणच्या कामाच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला समजत जातात. अनुभवात भर पडत जाते. परिणामी क्षमता विस्तारत जाते.

पत्रकारितेच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे, की आपल्याकडे सामाजिक भान आहे का? पत्रकारिता हे पूर्णपणे सामाजिक क्षेत्र आहे. समाजात सतत होत असलेल्या घडामोडी हेच या क्षेत्राचं मुख्य भांडवल आहे. आपल्याला त्या समजून घेण्यात रस आहे का याचा सर्वप्रथम विचार करावा. पत्रकारितेत कामाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. बातमीदारी आणि संपादन. बातमीदारी करणाऱ्या व्यक्तीला सतत समाजात वावरावं लागतं, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या वेगवेगळ्या थरांतल्या व्यक्तींशी कौशल्यपूर्ण पद्धतीने संपर्क निर्माण करावा लागतो. वेळप्रसंगी धावपळ करावी लागते. लिखाण करावं लागतं. वेगवेगळ्या घटनांचे अर्थ समजून घेऊन त्यांचं विश्लेषण करावं लागतं. अर्थात हे सगळं एकदम सुरू होत नाही. हळूहळू ते विकसित होत जातं; पण त्यासाठी भरपूर वेळ, ऊर्जा द्यावी लागते. एखादी मोठी सभा, मोर्चा आहे आणि तुम्ही घरी पाहुणे जमलेत म्हणून मी जाणार नाही, असं म्हणून चालत नाही. एरवी समाजात सगळ्यांना मिळतात त्या सगळ्या सुट्टय़ा मिळतातच असं नाही. आहेत ते संपर्क राखणं, नवनवे संपर्क निर्माण करणं, वेळप्रसंगी त्यांचा कौशल्याने वापर करणं, हे सगळं करत असतानाच सतत पुरोगामित्वाचं भान राखणं, आपल्या लिखाणामुळे कोणतीही अनुचित गोष्ट घडणार नाही याची काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. ही तारेवरची ती कसरत असते खरी, पण ती जमल्यानंतर या क्षेत्राइतकं आनंदाचं दुसरं क्षेत्र नाही.

इथे काम करणाऱ्यापर्यंत सतत नवनवीन गोष्टी येऊन पोहोचत असतात. त्यामुळे तो सतत ताजातवाना राहू शकतो. इथे कामाच्या निमित्ताने भरपूर माणसं भेटतात, समाजाचे अंतरंग समजतात, भरपूर प्रवास करायला मिळतो, एरवी कोणत्याही रुटीन नोकरीपेक्षा खूप वेगळं जग अनुभवायला मिळतं. बातमीदाराला बीट दिलेलं असतं. बीट म्हणजे त्याने ज्या क्षेत्राच्या बातम्या आणणं अपेक्षित आहे, ते क्षेत्र. उदाहरणार्थ एखाद्याकडे राजकीय हे बीट असतं. त्यातही त्याने फक्त भाजपाच्याच बातम्या कव्हर करायच्या, दुसऱ्याने फक्त  शिवसेनेच्याच करायच्या. एखाद्याने फक्त शिक्षण हेच बीट कव्हर करायचं. अर्थात वर्तमानपत्रात नेहमीच माणसांची कमतरता असल्यामुळे एका व्यक्तीकडे एकाच वेळी दोन-तीन बीटदेखील असू शकतत. बीटमुळे त्या एकेका क्षेत्रात उत्तम संपर्क निर्माण होतो. त्यातल्या घडामोडी सतत समजतात. त्या क्षेत्राचा अभ्यास तयार होतो. ते करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, की इनपुट दिल्याशिवाय आऊटपुट मिळत नाही. त्यासाठी स्वत:ला सतत अपडेट ठेवणं, भरपूर वाचन, एकाच वेळी अनेक गोष्टी करणं, सतत पुढच्या गोष्टींचा वेध घेणं, ऐकीव गोष्टीवर अवलंबून न राहता प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेणं, स्वत:बद्दल विश्वासार्हता निर्माण करणं हे करत राहिलं तर तुम्ही पत्रकार म्हणून समाजात स्वत:चं स्थान निर्माण करू शकता.

पत्रकारितेत संपादनाचं काम करणाऱ्या व्यक्तीला बातमीदाराप्रमाणे फारसं फिरावं लागत नाही. रोज ऑफिसमध्ये जाऊन रोजचा अंक तयार करण्यासाठीच्या कामात तिच्यावर जी जबाबदारी असेल ते पूर्ण करणं हे तिचं काम असतं. या जबाबदारीमध्ये मुख्यत: बातमीदाराकडून आलेल्या बातमीचं संपादन करणं, ती योग्य पद्धतीने पानात लावणं या कामांचा समावेश असतो. यात खूपदा बातमीदाराने घाईघाईत लिहिलेली बातमी वाक्यरचना दुरुस्त करून घेणं, त्यात आवश्यक असतील त्या तपशिलाच्या दुरुस्त्या करणं, योग्य शीर्षक देणं, बातमीनुसार आवश्यक छायाचित्रं वापरणं, ही कामं असतात. असं प्रत्येक बातमीबाबत करावं लागतं. दैनिकात कमी वेळेत हे काम करायचं असल्यामुळे वेगाने काम करणं आवश्यक असतं. अर्थात हा वेग सरावाने येतो. बातमीदाराप्रमाणे उपसंपादकाला बीट नसतं; पण तो स्वत:चे विषय विकसित करू शकतो. एखाद्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात रस असेल तर सतत त्याबाबतचे वाचन, अभ्यास यातून तो त्यातला जाणकार होऊ शकतो. बातमीदाराच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. त्या उपसंपादकाच्या असतात; पण याला खूपदा रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं. सतत नवीन गोष्टी समजून घ्यायची आवड आहे, पण बातमीदाराप्रमाणे सतत फिरायचं नाही, अशी व्यक्ती उपसंपादकाचे काम करू शकते. त्याच्या जोडीला वर्तमानपत्रात वेगवेगळ्या पुरवण्या असतात. त्यांच्या संपादनाचं, फीचर्सचं काम करणं हादेखील एक पर्याय असू शकतो.

वर्तमानपत्रापेक्षाही आज टीव्ही या माध्यमाला जास्त महत्त्व आलं आहे. तिथलं काम तर वर्तमानपत्रापेक्षाही जास्त धावपळीचं, जास्त वेळ देण्याची गरज असलेलं आहे. वर्तमानपत्राला वेळेची मर्यादा असते. छपाईला अंक पाठवण्याची एक निश्चित वेळ असते. ती संपली की तुम्ही तेवढय़ापुरते तरी मोकळे होता; पण वृत्तवाहिनीत तसं होत नाही. कधीही कुठेही काहीही घडलं की त्या घटनेला किती महत्त्व असेल त्याप्रमाणे ब्रेकिंग न्यूजचा धबडगा सुरू होतो. वर्तमानपत्राच्या तुलनेत वृत्तवाहिन्यांमध्ये पैसे जास्त मिळतात, ही खरी गोष्ट आहे; पण तिथे वेळही तेवढाच द्यावा लागतो. तेवढा वेळ देत असताना त्याबरोबरच तुम्ही स्वत:ला अपडेट ठेवणं आवश्यक असतं. वृत्तवाहिनीतदेखील वर्तमानपत्राप्रमाणे बातमीदार, डेस्कवर काम करणारे उपसंपादक असतात. त्यांच्या जोडीला इथे ग्लॅमर असतं अँकरला. टीव्हीवर झळकायला मिळतं म्हणून अनेकांना अँकर व्हायची इच्छा असते; पण अँकर होण्यासाठी फक्त चांगलं दिसणं, आवाज चांगला असणं पुरेसं नसतं. त्या दोन गोष्टींना अभ्यासाची जोड असेल तर अँकर नीट बातमी सांगू शकतो. प्रश्न चांगल्या पद्धतीने विचारू शकतो. या सगळ्यामुळे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण होणं ही आवश्यक गोष्ट असते.

वीसेक वर्षांपूर्वी वृत्तवाहिन्यांचा उदय व्हायला लागला तसं मुद्रित माध्यमं किंवा वर्तमानपत्रांची सद्दी संपली, अशी चर्चा सुरू झाली. कारण एक हजार शब्दांमधून तुम्ही जे सांगू शकणार नाही, ते एक दृश्य सांगू शकतं, सांगतं, असं अनेकांचं म्हणणं होतं. ते खरंही आहे. त्यामुळे वृत्तवाहिन्यांच्या उदयामुळे मुद्रित माध्यमांवर काही प्रमाणात परिणाम झालाही. वृत्तवाहिन्यांचा २४ तास रतीब सुरू असताना दुसऱ्या दिवशी त्याच बातम्या वर्तमानपत्रात कोण वाचणार, असा प्रश्न हिरिरीने उपस्थित होऊ लागला. तो काही प्रमाणात खराही होता, पण वृत्तवाहिन्यांमधून जे विश्लेषण मिळत नाही, ते वर्तमानपत्रांमधून मिळायला लागलं. त्या अर्थाने वर्तमानपत्रांनी आपली स्पेस तयार करायला सुरुवात केली; पण आता डिजिटल युगात पत्रकारिता आणखी बदलत चालली आहे ती ऑनलाइन या माध्यमामुळे. वर्तमानपत्राला वेळेची आणि जागेची मर्यादा होती. वृत्तवाहिन्यांना वेळेच्या मर्यादेवर मात करता आली; पण आता ऑनलाइन या माध्यमाने तर या दोन्हीवर मात केली आहे. या माध्यमातून भरपूर लिखाण करता येऊ शकतं. तसं वर्तमानपत्रातून करता येत नसे आणि ऑनलाइन या माध्यमातून व्हिडीओदेखील टाकता येतात. तेही वृत्तवाहिन्यांप्रमाणे २४ तासांत कधीही.

ही तीनही क्षेत्रं आव्हानात्मक आहेत. तिथं काम करायला, चांगलं करिअर करायलाही भरपूर वाव आहे. भरपूर कष्टाची, अभ्यासाची जोड दिली तर यश तुमचंच आहे.
सौजन्य – लोकप्रभा