80/10/10 Diet : मागील अनेक वर्षांपासून जगभरात ८०/१० /१० या आहार पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ही आहार पद्धत माजी अॅथलीट आणि रॉ फूडिस्ट डॉ डग्लस ग्रॅहम यांनी सुरू केली होती. या आहार पद्धतीमध्ये प्रथिने आणि चरबीचे सेवन मर्यादित करीत प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्सच्या सेवनावर लक्ष केंद्रित केले जाते.
मागील अनेक वर्षांत या आहार पद्धतीने वजन कमी करणे, निरोगी आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्ती वाढणे यांसारखी आश्वासने दिली आहेत. या आहाराच्या समर्थकांचा असा दावा आहे की, कमी चरबीयुक्त, कच्चे, वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांवर लक्ष केंद्रित करून, व्यक्ती अन्न सहज पचवू शकतात आणि शरीराचे वजन आणि शरीर अधिक सुदृढ ठेवू शकतात.
DHEE हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ व पोषण तज्ज्ञ शुभा रमेश एल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी चर्चा करताना सांगितले, “८०/१० /१० आहार ८०% कॅलरीज कार्बोहायड्रेटमधून म्हणजेच प्रामुख्याने फळे आणि भाज्यांमधून यावीत या कल्पनेवर आधारित आहे. तसेच हा आहार १०% प्रथिने आणि १०% चरबीवर आधारित आहे. हा आहार संपूर्ण प्रक्रिया न केलेल्या पदार्थांवर भर देतो; ज्यात ताजी फळे, पालेभाज्या काही प्रमाणात ड्रायफ्रुट्स व बिया यांचा समावेश असतो.
आहारतज्ज्ञ व पोषण तज्ज्ञ शुभा सांगतात की, फळांमधून मिळणारे कार्बोहायड्रेटचे प्रमाण प्रामुख्याने नैसर्गिक साखरेचा जलद स्रोत पुरवते; ज्यांना प्राथमिक ऊर्जाचालक मानले जाते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. तसेच कमी चरबी आणि प्रथिने असलेल्या पदार्थांमुळे काही व्यक्तींना शरीरात साखरेची पातळी कमी झाल्याचे जाणवू शकते; ज्यामुळे ऊर्जेच्या पातळीत घट झाल्याचे जाणवते.
हेही वाचा: घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
शुभा सांगतात, “उर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी अधिक संतुलित आहारामध्ये प्रथिने आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. ८०/१० /१० आहार कार्बोहायड्रेट्सवर जास्त अवलंबून असल्यामुळे उर्जेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतो.
८०/१० /१० आहार पद्धतीचे फायदे
या आहार पद्धतीचा अवलंब केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. कारण- या आहारामध्ये चरबीचे कमी प्रमाणात सेवन केले जाते.तसेच या प्रकारच्या आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन जास्त केले जाते. त्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते.या आहारात फळांचे सेवन अधिक करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. पण, ती वाढणारी साखर नैसर्गिक पदार्थातील असल्यानरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
८०/१० /१० आहार पद्धतीचे तोटे
या आहारामध्ये आवश्यक चरबी आणि प्रथिने कमी असतात; जे हार्मोनल संतुलन आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे अत्यावश्यक फॅटी अॅसिडची कमतरता जाणवू शकते. तसेच अमीनो अॅसिडस, B12 सारखी जीवनसत्त्वे, लोह व कॅल्शियम यांसारखी खनिजे कमी होऊ शकतात.या आहार पद्धतीचे दीर्घकाळ पालन केल्याने स्नायू, हाडे कमकुवत होऊ शकतात; तसेच इतर अनेक पोषण घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.