शाकाहारी असो किंवा मांसाहारी, पदार्थाला चव देणारं काम हे चिमूटभर मीठचं करते. मिठाचे स्वयंपाकघरात स्थान जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते शरीराच्या क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठीसुद्धा आवश्यक आहे. मात्र, चवीला चांगले लागते म्हणून आहारात मीठ जास्त घालणे किंवा आरोग्यासाठी मीठ घातक म्हणून मिठाचे सेवन कमी करणे या दोन्ही गोष्टींचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हीसुद्धा आहारात मीठ कमी करण्याचा प्रयत्न करीत आहात? तर याचे दुष्परिणामसुद्धा एकदा या लेखातून नक्की वाचा.
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्यतज्ज्ञ डॉक्टर जेम्स डिनिकोलँटोनियो चेतावणी देतात की, कमी मिठाचे सेवन तुमच्या झोपेवर आणि हाडांच्या ताकदीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. डॉक्टरांनी एका रीलमध्ये नमूद केले आहे की, सहानुभूतीशील मज्जासंस्था सक्रिय झाल्यामुळे कमी मीठयुक्त आहार घेतलेल्या लोकांची झोप खराब झाली आहे. क्लिनिकल दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास सहानुभूतीशील मज्जासंस्थेतील ही वाढ खरं तर ताण आहे आणि याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे शरीरातील कमी सोडियममुळे हाडांचे आरोग्य बिघडते. कारण हाडांमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी आवश्यक खनिजे कमी होतात.
तर या संबंधित अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की, शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सचे होमिओस्टॅसिस राखण्यात सोडियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कमी मिठाचे सेवन हे संतुलन विस्कळीत करू शकते. संभाव्यतः झोपेच्या चक्राच्या नैसर्गिक प्रक्रियेवरसुद्धा परिणाम करू शकते. संशोधन असे सूचित करते की, सोडियम पातळी कॉर्टिसॉल (एक तणाव नियंत्रण करणारा हार्मोन) आणि ॲड्रेनालाईनसारख्या तणावाच्या संप्रेरकांवर प्रभाव पाडते; ज्यामुळे झोपेची पद्धत बदलू शकते. सोडियम झोपेचे नियमन करणाऱ्या न्यूरोट्रांसमीटर, सेरोटोनिन, ओरेक्सिनवरसुद्धा परिणाम करतो. शरीरातील अपुरी मीठ पातळी या न्यूरोट्रांसमीटरच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे गाढ, पुरेशी झोप मिळविण्यात अडचणी येतात.
मिठाचे सेवन आणि हाडांचे आरोग्य –
मिठात सोडियम असते, जे कॅल्शियम शोषून हाडांमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. कमी सोडियम आहारामुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि हाडे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. विशेषत: रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून येते, असे डॉक्टर प्रणव श्रीनिवासन सांगतात. अपुऱ्या मिठाच्या सेवनामुळे कॅल्शियमचे नकारात्मक संतुलन होऊ शकते, ज्यामुळे शरीर आवश्यक रक्त पातळी राखण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम बाहेर टाकू शकते; ज्यामुळे हाडांची रचना कमकुवत होते.
मिठाच्या सेवनाची काही मार्गदर्शक तत्त्वे :-
फायदे आणि तोटे संतुलित करणे – जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग टाळण्यासाठी दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याची शिफारस केली आहे. पण वय, आरोग्यस्थिती आणि जीवनशैलीच्या घटकांवर आधारित वैयक्तिक गरजा बदलू शकतात, असे डॉक्टर प्रणव श्रीनिवासन स्पष्ट करतात.
इष्टतम पातळी – मिठाचे संतुलित सेवन राखणे महत्त्वाचे आहे, जे शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त किंवा शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा कमी नाही. त्यामुळे मिठाच्या सेवनाची इष्टतम पातळी चांगली राहते आणि शांत झोप लागते.
कोणत्या व्यक्तींना कमी मिठाच्या आहारामुळे शरीरावर परिणाम होण्याची अधिक शक्यता असते?
मूत्रपिंडाचे विकार, एडिसन रोग किंवा काही लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे (पोटॅशियम-स्पेअरिंग लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ) वापरणाऱ्या व्यक्तींना जास्त मीठ घेणे आवश्यक असू शकते. वृद्ध आणि क्रीडापटू ज्यांच्या घामाने शरीरातून सोडियमचे प्रमाण कमी होते, त्यांनीही मिठाचे सेवन केलं पाहिजे. त्यांच्या सोडियम पातळीचे बारकाईने निरीक्षण करून हायपोनेट्रेमिया (असामान्यपणे कमी सोडियम पातळी) टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार आहार समायोजित करण्यासाठी आरोग्य सेवा प्रदात्यांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टर प्रणव श्रीनिवासन म्हणतात.
आहारात मिठाचं प्रमाण कोणी कमी करायचंय?
कमी मिठाचा आहार सामान्य लोकांसाठी हानिकारक मानला जात असला तरीही उच्च रक्तदाब, हार्ट फेल्यूअर किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना मात्र कमी मीठ आहाराचे सेवन करण्याच्या सल्ला दिला जातो. या रुग्णांसाठी पोटॅशियम क्लोराईड, औषधी वनस्पती आणि मसाल्यांसारखे पर्याय सोडियमचे सेवन न वाढवता अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांचे संतुलित सेवनदेखील सोडियमच्या कमी वापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते; असे डॉक्टर प्रणव श्रीनिवासन म्हणतात.