लाल मांस व प्रक्रिया केलेले मांस यामुळे हृदयरोगाचा धोका अधिक असतो त्यातही पेपेरोनी व बोलोगना या प्रक्रियाकृत मांसामुळे तो धोका आणखी वाढतो असे दिसून आले आहे. अमेरिकी वैद्यकीय संघटनेच्या इंटरनल मेडिसीन या नियतकालिकात याबाबत शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून त्यात म्हटले आहे की, तांबडे मांस किंवा कोंबडीचे प्रक्रिया केलेले मांस आठवडय़ातून दोन पेक्षा अधिक वेळा सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका असतो पण मासे सेवन केल्याने तो कमी असतो. मांससेवनाने हृदयविकाराचा धोका ३ ते ७ टक्क्य़ांनी वाढतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

लाल मांस व प्रक्रिया केलेले मांस आठवडय़ातून दोनदा सेवन केल्यास धोका ३ टक्के वाढतो, असे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न व कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे. हा फरक फार थोडा असला तरी तो महत्त्वाचा ठरतो. पेपरोनी, बोलोगना व देली मांस यामुळे धोका जास्त असतो असे नोरिना अॅडलेन यांचे मत आहे. लाल मांसाचा संबंध कर्करोगाशी जोडला गेल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. प्राणिज प्रथिनांचे प्रमाण नियंत्रित करून कर्करोग व हृदयविकार या दोन्हींवर काही प्रमाणात मात करता येते. अनेकांनी लाल मांस खाणे योग्य ठरवले असले तरी आमच्या मते ते धोकादायक आहे, असे त्यांनी सांगितले.

कोंबडीचे मांस खाणेही हृदयविकारासाठी कारण ठरू शकते असे २९,६८२ व्यक्तींच्या अभ्यासातून दिसून आले आहे. या व्यक्तींच्या आहाराची माहिती यात विचारण्यात आली होती. त्यात वर्ष किंवा काही महिन्यांच्या आहाराची माहिती समाविष्ट होती. परतलेले चिकन किंवा जास्त असंपृक्त मेदाम्ले असलेला आहार हा गंभीर आजारांना निमंत्रण देतो, असे दुसरे एक संशोधक झोंग यांनी सांगितले.