अतिमद्यपान केल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या लोकांना आजारपण आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

हे संशोधन नुकतेच लँकेट या आरोग्यविषयक मासिकात प्रसिद्ध झाले आहे. अतिमद्यपानामुळे होणारा त्रास आणि आर्थिक स्तर यांचा परस्पर संबंध असल्याचे या संशोधनात मांडण्यात आले आहे. ब्रिटनमधील ग्लास्गो विद्यापीठातील संशोधकांनी अतिमद्यपानामुळे गरीब कुटुंबातील लोकांना मोठय़ा प्रमाणात हानी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. सुस्थितीत राहणाऱ्या मद्यपींना सातपट आरोग्याचा धोका असतो. तर सर्वसाधारण परिस्थितीत राहणाऱ्या मद्यपींना अकरापट अधिक आरोग्याचा धोका असतो.

आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचा आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो. अस्वस्थ जीवनशैली आणि मानसिक ताणामुळे आरोग्य बिघडण्यास आणखी हातभार लागत असल्याचे संशोधक कातिकिरेड्डी यांनी सांगितले. गरिबीमुळे मद्यपानानंतर आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहते आणि त्यामुळेच धोका अधिक वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अतिमद्यपानामुळे सर्वच गटातील नागरिकांना त्रास होतो. मात्र, आर्थिक कमकुवतपणामुळे जीवनमानाचा खालावलेला स्तर, उत्पन्नाची कमतरता, शिक्षणाची उणीव यांमुळे अतिमद्यपान अधिक धोक्याचे ठरते.