Apple Privacy Lebal: Apple नं आपल्या वर्ल्ड वाड डेव्हलपर कॉन्फरन्स दरम्यान अ‍ॅप स्टोअर मध्ये प्रायव्हसी न्यूट्रिशन लेबल आणण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत अ‍ॅपल स्टोअरमध्ये जी अ‍ॅप आहेत त्यांच्या प्रायव्हसी संदर्भात एक लेबल दिलं जाईल. आतापर्यंत अ‍ॅप स्टोअर मध्ये हे फिचर देण्यात आलेलं नाही. परंतु जानेवारी महिन्यापासून याची सुरूवात होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं सोमवारी कंपनीकडे अ‍ॅप स्टोअरसाठी आपलं प्रायव्हसी लेबल सोपवलं आहे.

परंतु यावर व्हॉट्सअ‍ॅपनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच अ‍ॅपललाही काही सल्ला दिला आहे. अ‍ॅप स्टोअरमध्ये प्रायव्हसी लेबल आल्यानंतर कोणतं अ‍ॅप कोणत्या प्रकारचा डेटा वापरत आहे आणि ते डाऊनलोड करण्यापूर्वीच याची माहिती संबंधित युझरला समजणार आहे.

युझरला प्रायव्हसी इन्फॉर्मेशन वाचण्याची योग्य संधी मिळेल. ही उत्तम बाब आहे. परंतु युझर्सना प्रायव्हसी न्यूट्रिशन लेबल आयफोनमध्ये यापूर्वीपासून उपलब्ध असलेल्या अ‍ॅपशीदेखील तुलना करून पाहता यावी असं व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे. आयफोनमध्ये आयमेसेज आणि अन्य काही अ‍ॅप्स पूर्वीपासूनच येत असतात. अशा प्रकारे मग त्या अ‍ॅपच्या प्रायव्हसी न्यूट्रिशन बाबत काय? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. आयमेसेज हे अ‍ॅप युझर्सना अ‍ॅप स्टोअर मधून डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही. अशावेळी प्रायव्हसी न्यूट्रिशन कसं काम करेल असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपनं यावेळी आणखी एक चिंता व्यक्त केली. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रायव्हसीचे मोठे फिचर्स आहेत. त्याद्वारे मेसेज कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला वाचता येत नाहीत, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी Axios शी बोलताना सांगितलं. जे प्रायव्हसी लेबल व्हॉट्सअ‍ॅपला दिलं जाणार आहे तेच व्हॉट्सअ‍ॅपसारख्या नसलेल्या अ‍ॅप्सनाही दिलं जाईल. यात व्हॉट्सअ‍ॅप इतर अ‍ॅपपेक्षा किती वेगळं आहे हे दिसणार नाही, असंही सांगण्यात आलं. दरम्यान, अ‍ॅपलंनं यावर उत्तर देत जे प्रायव्हसी लेबल इतर कंपन्यांसाठी लागू होणार आहेत तेच अ‍ॅपलच्याही अ‍ॅप्ससाठी लागू होणार असल्याचं म्हटलं आहे.