कारलं म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर आठ्या येतात आणि तोंड वाकडं केले जाते. मात्र कडू कारले आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. मधुमेहासारख्या आजारांवर तर कारल्यासारख्या कडू भाज्या उत्तम उपाय ठरु शकतात. हिरव्या भाज्या विविध कारणांसाठी उपयुक्त असतात. चवीने कडू असली तरीही ही भाजी खाण्याची लहानपणापासून सवय असल्यास ती नकोशी होत नाही. तसेच हा कडूपणा कमी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या ही भाजी करणाऱ्या महिलांनी माहीत करुन घेणे आवश्यक आहे. तेव्हा या पोषक भाजीचा शरीरासाठी नेमका काय फायदा होतो पाहूयात…

१. हृदयरोगासाठी कारलं अतिशय उपयुक्त असते. यामुळे हृदय मजबूत होऊन हृदयरोग होण्यापासून बचाव होतो. कारल्यानं हृदय मजबूत होते, आणि कोणतेही हृदयरोग होत नाहीत. याशिवाय कावीळ आणि हिपॅटेटीस यांसारख्या आजारांसाठीही अतिशय उपयुक्त असते.

२. कारल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते, एक ग्लास कारल्याचा रस आणि त्यात अर्धा लिंबू टाकून प्यायल्याने अनेक आजारांवर मात करण्याची ताकद मिळते. कारल्याच्या रसाने त्वचारोगावर नियंत्रण राहते.

३. रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते. अन्नाचे पचन सुरळीत होण्यासाठी कारल्याचा उपयोग होतो. कारल्याने भूक लागण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यासही उपयोग होतो.

४. कारलं शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवतं. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं अतिशय उपयुक्त ठरते. सकाळी उपाशी पोटी कारल्याचा रस पिणे हा मधुमेहासाठी रामबाण उपाय ठरु शकतो.

५. हिरव्या भाज्या या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. त्याचप्रमाणे कारल्याचा रस प्यायल्याने डोळे निरोगी राहतात. सध्या आपण दिवसातील सर्वाधिक काळ कॉम्प्युटर स्क्रीनसमोर असतो. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मात्र कारले खाल्ल्याने डोळ्यांचे आजार होत नाहीत.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)