लवकरच मधुमेहींनादेखील स्वादिष्ट चॉकलेटचा आस्वाद घेता येणार आहे. चविष्ट आणि पोषक तत्वांनी युक्त असे गुळापासून तयार करण्यात आलेले चॉकलेट येत्या काही दिवसांत बाजारात उपलब्ध होणार आहे. शोधकर्त्यांचा एक समूह या दिशेने काम करत आहे. सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध असलेल्या चॉकलेटमध्ये पौष्टिक तत्वांची कमतरता असते. यामध्ये प्रोसेस्ड साखरेचा वापर केलेला असतो. हे चॉकलेट खाल्याने दात किडणे, दातांमध्ये फटी निर्माण होणे आणि मधुमेहासारख्या व्याधी अथवा आजार होण्याची भीती असते.
लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या चॉकलेटमध्ये प्रोसेस्ड साखरेच्या जागी विविध प्रकारच्या गुळाचा वापर करण्यात आल्याची माहिती संत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालयाच्या लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेच्या खाद्य तंत्रज्ञान विभागाच्या श्वेता एम. देवताळे यांनी दिली. चॉकलेटचा स्वाद कायम राखण्यासाठी पातळ गुळात कॉफी अथवा कोको पावडचा वापर करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे यात पोषक घटकांचा वापरदेखील केला जातो.
आयआयटी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या पाच दिवसीय विज्ञान मेळाव्यात सहभागी झालेल्या रही देवतालेनी ‘जॅगरी डिलाइट : ए हेल्दी सबस्टिट्यूट फॉर चॉकलेट’ नावाचे शोधपत्र प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्राप्त होणाऱ्या गुळाच्या अनेक प्रकारांचा वापर करून चॉकलेट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, गुणवत्तेच्या निकषावर कोल्हापूरचा गुळ राज्यात सर्वात लोकप्रिय आहे. जगातील गुळ उत्पादनाच्या ७० टक्के गुळाची निर्मिती भारतात होते. तरळ गुळ, जैविक ठोस गुळ, नारळाच्या झाडाच्या रसापासून तयार केलेला गुळ, खजूर, ताडाच्या झाडाच्या रसापासून तयार करण्यात आलेला गुळ आणि पावडर गुळाचा वापर करून चॉकलेट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.