मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने विविध ऑफर्स जाहीर करत असतात. यामध्ये कंपनी आणि ग्राहक दोघांचाही फायदा असतो. नुकताच मोटोरोला कंपनीने आपला एक विशेष सेल जाहीर केला असून मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी ठरण्याची शक्यता आहे. आपल्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोटोरोलाने भारतीय स्मार्टफोन युजर्ससाठी खास ऑफर दिली आहे. याअंतर्गत G सीरीजच्या ‘मोटो G5s’ या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट देण्यात आला आहे. यामध्ये ‘मोटो G5s’ स्मार्टफोनचा ४ जीबीचा १४,९९९ रुपयांना असलेला व्हेरिएंट ९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

मोटोरोलाची ही ऑफर ११ एप्रिलपर्यंत असेल असे मोटोरोलाने ट्वीट करुन सांगितले आहे. ‘मोटो G5s’ स्मार्टफोनमधील आकर्षक गोष्ट म्हणजे यात ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच या फोनचा स्क्रीन ५.२ इंचाचा आहे. रॅम ४ जीबी असून प्रोसेसर ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ४३० आहे. या फोनला ६४ जीबी मेमरी देण्यात आली आहे. या फोनला १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा या देण्यात आला आहे. याशिवाय ३ हजार मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनसोबत देण्यात येणारा टर्बो चार्जर विशेष क्षमतेचा आहे. त्यामुळे १५ मिनीटांमध्ये ६ तास पुरेल इतकी बॅटरी चार्ज होते.