शुभा प्रभू-साटम

घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असलं की गोडधोड पदार्थांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर पूर्वीच्या काळी स्त्रिया घरामध्येच शिरा, खीर, बासुंदी असे गोड पदार्थ करत असतं. मात्र, आजकाल बाहेर तयार मिळणाऱ्या आयत्या गोड पदार्थांना स्त्रियांनी विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे कोणताही सणवार असला की थेट दुकानातून घरामध्ये पेढे, बर्फी, जिलबी असे पदार्थ येऊ लागले आहेत. मात्र, बाहेर मिळणारे पदार्थ घरीदेखील तितकेच चविष्ट आणि सहजरित्या करता येऊ शकतात. यामध्येच जिलबी ही अनेकांच्या आवडीची असून ती घरी करणं अत्यंत सोपं आहे. त्यातच आता यात विविध फ्लेव्हरची जिलबीदेखील घरी करता येऊ शकते. म्हणूनच घरच्या घरी अ‍ॅपल जिलबी कशी करायची ते पाहुयात.

साहित्य – ४ मोठे पिकलेले सफरचंद (भुसभुशीत नको). १ वाटी मैदा, चिमूटभर सोडा, १ वाटी साखर, २ वाट्या पाणी, तूप, खायचा रंग.

कृती – सफरचंद धुऊन, पुसून घ्या. गुलाबजामकरता जसा करतो त्याप्रमाणे साखरेचा पाक करून घ्या. त्यात वेलची पूड मिसळून ठेवा. मैद्यात थोडं दूध, पाणी घाला आणि भज्यांच्या पिठापेक्षा थोडं पातळ मिश्रण तयार करा. यात थोडासा सोडाही घाला. जर खायचा रंग घालायचा असेल तर तोही आत्ताच या पिठात घालून घ्या. सफरचंदाच्या आडव्या गोल चकत्या करा. मधला बी असलेला भाग हलक्या हाताने पोखरून घ्यावा. आता तूप तापवत ठेवा. सफरचंदाच्या चकत्या मैद्याच्या पिठात बुडवून तुपामध्ये सोनेरी होईपर्यंत तळाव्यात. त्यांचा एक घाणा झाल्यावर तो पाकात बुडवून ठेवा. मग दुसरा घाणा तळून झाल्यावर पहिला पाकातून बाहेर काढा. मस्त कुरकुरीत झटपट जिलबी तयार.