Fresh vs pre-shaved coconut water : सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी जास्तीत जास्त द्रव्य पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे जसे गरजेचे आहे तसेच फळांचा रस, नारळाचे पाणीसुद्धा पिणे आवश्यक आहे. तुम्हाला ताजे नारळाचे पाणी प्यायला आवडते की पॅकबंद? कोणते नारळाचे पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने या विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

जिंदाल इन्स्टिट्यूटच्या आहारतज्ज्ञ सुष्मा पीएस यांनी पॅकबंद नारळाच्या पाण्याचे काही दुष्परिणाम सांगितले आहेत. त्यापूर्वी नारळाचे पाणी आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले आहे, याविषयी जाणून घेऊ या.

नारळाचे पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण आढळतात. उन्हाळ्यात हे इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यास मदत करतात. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल सांगतात, “नारळाच्या पाण्यामध्ये सायटोकिन्स असतात, जे पेशींच्या वाढीस, कर्करोगाविरुद्ध लढण्यास आणि एकंदरीत संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.”

हेही वाचा : Health Special: प्रथिनांची पावडर कशी तयार केली जाते? त्यात प्रथिनांचे प्रमाण किती असते?

ताजे नारळाचे पाणी की पॅकबंद नारळाचे पाणी?

“पॅकबंद नारळाचे पाणी दीर्घकाळ टिकावे म्हणून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे ताज्या नारळाच्या पाण्यातील पौष्टिक घटक आणि चव कमी होते”, असे सुष्मा सांगतात.

नारळाच्या पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी, पाच टक्के साखर (अल्डोहेक्सोज, फ्रॅक्टोज आणि डिसॅकराइड) असतात; याशिवाय यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे असतात. चेन्नई येथील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या न्यूट्रिशनिस्ट डॉ. हरिप्रिया एन. सांगतात, “जेव्हा या नारळाच्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते, तेव्हा हवेच्या संपर्कात येऊन त्याच्यातील पौष्टिक घटक कमी होतात.”

“पॅकबंद नारळाचे पाणी दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि चव राखण्यााठी उत्पादक त्यामध्ये ॲडिटीव्ह आणि बायो-प्रिझर्वेटिव्ह वापरू शकतात. त्यामध्ये साखर, आर्टिफिशिअल फ्लेवर्सचा समावेश असू शकतो. त्यामुळे नारळाचे ताजे पाणी प्यायल्याने तुम्ही या गोष्टी टाळू शकता आणि निरोगी असे नारळाचे पाणी पिऊ शकता”, असे डॉ. हरिप्रिया सांगतात.
सुष्मा पीएस लक्षात आणून देतात की, पॅकबंद नारळाच्या पाण्याचे कंटेनर हे प्लास्टिक किंवा अविघटनशील घटकांपासून बनतात, ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचू शकते.”याशिवाय पॅकबंद नारळाचे पाणी अस्सल ताजे नसते. ताज्या नारळाच्या पाण्याची एक वेगळी चव असते, पण ही चव आता पॅकबंद पद्धतीमुळे हरवली आहे”, असे त्या पुढे सांगतात.

“पॅकबंद नारळाच्या उत्पादनादरम्यान स्वच्छता आणि गुणवत्ता पाळली नाही तर ते पाणी आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. ताज्या नारळामध्ये असा कोणत्याच प्रकारचा धोका निर्माण होत नाही”, असे हरिप्रिया सांगतात.

नारळ विकत घेणे आणि त्यातून स्वत: पाणी काढणे हे पॅकबंद नारळाच्या पाण्यापेक्षा कमी खर्चिक असू शकते. नारळ खरेदी केल्याने आपण ताजे पाणी पित आहोत, याची खात्री पटते. यातून तुम्हाला फायबर आणि चांगले फॅट्स मिळू शकतात. त्यामुळे ताजे नारळाचे पाणी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असून जे आपल्याला चांगल्या चवीसह, पौष्टिक घटक प्रदान करतात.