वैद्य अश्विन सावंत
प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गामध्ये होणार्‍या बदलांच्या परिणामी त्या ऋतुमध्ये एक रस प्रबळ होतो. ज्यामुळे त्या-त्या ऋतूमध्ये निसर्गामधील पाणी, वनस्पती, प्राणी आदी सर्वच सजीव गोष्टींमध्ये त्या कडू रसाचा (चवीचा) प्रभाव वाढतो. साहजिकच त्या पाण्याचे प्राशन व त्या वनस्पतींचे व प्राण्यांचे सेवन केल्यामुळे मानवाच्या शरीरामध्ये सुद्धा त्या रसाचा प्रभाव होतो. त्यानुसार त्या रसाचे (चवीचे) गुणदोष शरीरावर व आरोग्यावर दिसतात. हिवाळ्याच्या आरंभी अर्थात हेमंत ऋतुमध्ये मधुर रस प्रबळ होतो, जो थंडीतल्या हवामानाला व आरोग्याला पोषक सिद्ध होतो. याउलट हिवाळ्यातल्या उत्तरार्धामध्ये म्हणजे कडक थंडीच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये अर्थात शिशिर ऋतूमध्ये कडू रस प्रबळ होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिशिर हा एक ऋतू असा आहे ज्या ऋतूमध्ये प्रबळ होणारा रस (चव) हा आरोग्याला उपकारक होतो. वास्तवात कडू चवीचे पदार्थ बलवर्धक नाहीत, मात्र कडू रसाचा मोठा गुण म्हणजे तो कफनाशक आहे. शिशिर ऋतूच्या आधीच्या हेमंत ऋतूमध्ये गोडाचा प्रभाव असतो, त्याला गोडधोड,पौष्टिक व स्निग्ध खाण्याची जोड मिळालेली असते. शिशिर ऋतूमध्ये अग्नी हेमंतापेक्षाही प्रखर होत असल्याने या दिवसांमध्ये सुद्धा भूक वाढते व खाल्लेले पचतेही, जेवण अधिकच खाल्ले जाते,तेसुद्धा गोड व पौष्टिक. वातावरणातला थंडावा आणि दीर्घकाळ गोड, स्निग्ध व पौष्टीक आहार, यांच्या परिणामी शरीरामध्ये कफ वाढत जातो. स्वाभाविकरित्या शिशिर ऋतूमध्ये कफाचा संचय होतो, शरीरात साचत-वाढत जाणार्‍या कफाला नियंत्रणात नियंत्रणात ठेवण्यास निसर्गतः शरीरात वाढणारा हा कडू रस उपयुक्त सिद्ध होतो.

हेही वाचा… Health Special : फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम काय असतं? त्याने आपल्या एकाग्रतेवर कसा परिणाम होतो?

षड्‍रस (सहा रसांचा) सिद्धान्त आणि आरोग्य

षड्‌रस म्हणजे सहा रस – गोड, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट. या सहा चवींच्या आधारावर आयुर्वेदाने शरीराचे आरोग्यजतन कसे करता येईल,आरोग्याचे संवर्धन कसे करता येईल,रोग कसे टाळता येतील एवढंच नव्हे तर रोगाचे निदान कसे करावे,समोर आलेल्या रुग्णाच्या आजाराची कारणे कशी ओळखावी ,त्या रोगाचा प्रतिकार कसा करावा, चिकित्सेमध्ये कोणती औषधे वापरावी व पथ्य कोणते करावे या सर्व बाबींवर व्यापक विचार केला आहे. आज शास्त्रशुद्ध आयुर्वेद चिकित्सा करणारा आयुर्वेद वैद्य हा रोगाच्या कारणांचा अभ्यास करताना विचार करतो तो त्या रुग्णाने अतिप्रमाणात सेवन केलेल्या रसांचा आणि त्याच्या शरीरावर झालेल्या योग्य-अयोग्य परिणामांचा. रोगाचे कारण समजून घेतल्यानंतरच औषधाचा विचार होतो, जे साहजिकच त्या रुग्णाने अतिसेवन केलेल्या रसाच्या विरोधी रसाचे असते. इतका हा सहज विचार आहे, जो आपण त्या विषयाच्या अधिकाधिक खोलात जाऊ तसतसा क्लिष्ट होत जातो.

या सहा रसांचा मानवी शरीरावरील हितकारक व अहितकारक परिणाम , त्यांचे गुण-दोष , त्यांचे रोगनाशक गुणधर्म , एवढंच नव्हे तर त्यांच्या अतिसेवनाने शरीरावर होणारे परिणाम या सर्वांचा आयुर्वेद शास्त्राने केलेला सविस्तार अभ्यास बघितला की आपले मस्तक पूर्वजांच्या निरिक्षणशक्तीसमोर आपोआपच झुकते. केवळ पदार्थाची चव समजून घेऊन त्या पदार्थाच्या गुणदोषांची परीक्षा करायची व त्यांचा मानवी आरोग्याच्या संवर्धनासाठी आणि रोगनाशनासाठीसुद्धा उपयोग करायचा, हे केवळ अलौकिकच आहे. दुर्दैवाने आयुर्वेदाने केलेल्या या अनमोल मार्गदर्शनाचा आज विसर पडला आहे. वास्तवात हे मूलभूत ज्ञान २१व्या शतकामधील अनेक आजारांपासून प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त सिद्ध होऊ शकते.

हेही वाचा… Health Special: मानेवर चामखीळ कशामुळे येतात?

कडू रस कसा ओळखावा?

कडू रस म्हणजे कडू चव. ही एक अशी चव आहे जी चाखली की जिभेला इतर चवी कळत नाहीत.तुम्ही एक चमचा कारल्याचा रस प्यायलात किंवा कडूनिंबाची दोन पाने चावून-चावून चघळलीत तर त्यानंतर तुम्हांला ना साखर गोड लागेल ना लिंबू आंबट. याचसाठी आयुर्वेदाने म्हटले आहे की, ’जो रस जिभेची अन्य रसांना ओळखण्याची शक्ती बाधित करतो,तो कडू रस’, अर्थात हे तात्पुरत्या काळासाठी होते. कडू रसाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो जिभेवर असणारा चिकटपणा दूर करुन जीभ स्वच्छ करतो. गोड श्रीखंड खाल्ल्यावर तोंडामध्ये निर्माण होणारा चिकटपणा, खारट मीठ व आंबट चिंचेने तोंडामध्ये सुटणारे पाणी, तिखट मिरची खाल्ल्यावर तोंडामध्ये चरचरून सुटणारा लालास्त्राव याच्या अगदी विरुद्ध कार्य कडू रसाचे आहे, ते आहे तोंडाची शुद्धी करणे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special after winter ends why should we eat bitter hldc asj
First published on: 19-02-2024 at 14:10 IST