“आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा.” डॉक्टर म्हणाले. सिझोफ्रेनियाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची एकत्र मीटिंग सुरू होती. एकूण १०-१२ नातेवाईक, जे रुग्णाची नियमित काळजी घेतात, असे उपस्थित होते. सुरवातीला स्कीझोफ्रेनियाची लक्षणे, कारणे, उपचाराच्या विविध पद्धती अशा अनेक विषयांची माहिती देऊन झाली होती. समीरचे आई वडील दोघेही ह्या मिटींगला आले होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे संपूर्ण घर समीरच्या मानसिक आजारामुळे ढवळून निघाले होते.
सुरुवातीला डॉक्टरांनी प्रत्येकाला आपआपल्या रुग्णामध्ये काय काय लक्षणे आहेत ते विचारले. आपल्या मुलासारखीच आणखीही ४-५ रुग्णांमध्ये लक्षणे आहेत असे समीरच्या आई- वडीलांच्या लक्षात आले. काही जण गेली १२-१५ वर्षे आपल्या रुग्णाची काळजी घेताहेत हे समजले. आपल्याला पडणारेच प्रश्न इतरांच्याही मनात आहेत हे पाहून त्यांना बरे वाटले. आपल्यासारखेच अनुभव इतरांनाही येतात हे पाहून आपण या वाटेवरचे एकटे प्रवासी नाही, तर अनेक नातेवाईक, आपल्यासारखे आपल्या रुग्णाच्या आजाराला तोंड देत मार्गक्रमणा करत आहेत हे लक्षात येऊन मनाला धीर आला.

आणखी वाचा: Mental Health Special: स्किझोफ्रेनियावर काय उपचार असतात?
डॉक्टरांनी प्रश्न विचारायला सांगितल्यावर समीरचे वडील म्हणाले, ‘डॉक्टर, अनेकदा नशीबाला दोष देतो मी, आपण अशी काय चूक केली ज्यामुळे आपल्या मुलाला इतका मोठा मानसिक विकार झाला असे वाटते. काय करावे?’ दुसरे एक जण म्हणाले, ‘माझ्या मुलाच्या वागण्याचा मला फार राग येतो. मग त्याला मी बोलतो आणि नंतर मला वाईट वाटते.’ एक बाई म्हणाल्या, ‘ मला सतत काळजी वाटत राहते. पुढे कसे होणार असे वाटते. रात्री बऱ्याच वेळा झोप लागत नाही. पटकन रडू येते.’
स्वतःच्या भावभावना मोकळेपणाने व्यक्त करायला या सगळ्यांना ही जागा मिळाली होती. एका रुग्णाची पत्नी तर मीटिंगमध्येच रडू लागली. डॉक्टरांनी सगळ्यांना बोलू दिले आणि नंतर रुग्णाचे ‘काळजी वाहक’ (caregiver) असल्याचे काय काय परिणाम रुग्णाच्या नातेवाईकांवर होतात हे सविस्तरपणे सांगितले. प्रत्येकाला वाटले आपल्याविषयीच डॉक्टर बोलताहेत. “ स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक विकार झालेल्या रुग्णाची कायम काळजी वाहणे सोपे नाही हे खरेच. रुग्णाचे तुम्ही सारे जणू सहप्रवासी आहात. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही त्याची साथसंगत करता आणि त्याचे जीवन सुकर कसे होईल त्यासाठी झटता! पण वर्षानुवर्षे आपल्या पेशंटचे वागणे, विचारातील विक्षिप्तपणा, कधी कधी भावनांचा उद्रेक किंवा भावनांचा अभाव असल्यासारखे प्रतिसाद या सगळ्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे. आपला मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, पती, पत्नी यांच्या आजारपणाचा आपल्याला भार(burden) जाणवणे हे ही नैसर्गिक आहे. याचे कारण बऱ्याच वेळेला पेशंटची लक्षणे तीव्र होतात, पेशंट आरडाओरडा करतो, कधी हात उगारतो. त्याच्या आक्रमकतेची भीती निर्माण होते, त्याच्या वागण्याचा राग येतो. एखादा पेशंट कितीही वेळा सांगितले तरी अंघोळ करत नाही, नीट जेवत नाही, कोणाशी मिळून मिसळून राहत नाही. पेशंट गोळ्या घ्यायला नाही म्हणतात, गोळ्या टाकून देतात, रागावतात. अशा वेळेस नातेवाईकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.” डॉक्टर आपलेच सगळे अनुभव वर्णन करताहेत असे प्रत्येक नातेवाईकाला वाटले.

amazing Coconut Milk benefits for skin
त्वचा, केस आणि आरोग्यासाठी नारळाच्या दुधाचे ५ आश्चर्यकारक फायदे; घरच्या घरी कसे बनवावे नारळाचे दूध?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Fennel seeds carom seeds water benefits
आरोग्याच्या ‘या’ ५ समस्या होतील झटक्यात दूर; जाणून घ्या ओवा, बडीशेपच्या मॅजिक ड्रिंकचे फायदे
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…
facts about emergency contraceptive pills
स्त्री आरोग्य : तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेताय? खबरदारी घ्या!
Skin Care Tips Urad Dal For Skin:
Skin Care: चेहरा चमकवण्यासाठी घरच्या घरी तयार करा उडदाच्या डाळीचा फेसपॅक; प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम
what is right time of dinner and breakfast
Dinner & Breakfast Timing : रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता कधी करावा? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

आणखी वाचा: Health Special: स्किझोफ्रेनिया पूर्ण बरा होणारा आजार आहे?
डॉक्टर पुढे सांगू लागले, “रुग्णाची काळजी घेणाऱ्याच्या त्याच्याशी होणाऱ्या परस्परसंवादाचे (interactions) काही विशिष्ट प्रकार आढळून येतात. रुग्णाची काळजी घेणाऱ्याच्या मनात विशिष्ट भावना निर्माण होतात. काही जण आपल्या रुग्णाच्या प्रत्येक कृतीवर टीका(criticism) करू लागतात. “ ‘अरे, जरा नीट बस, थोडे स्वच्छ कपडे घालायला काय झालं? असाच राहणार तू गबाळा!’ एका पेशंटच्या वडीलांना वाटले, माझेच तर उदाहरण देत नाहीत ना डॉक्टर?
काही जण आपल्या पेशंटशी जणू आपले शत्रुत्व(hostility) आहे असे वागतात. ‘माझ्याबरोबर जेवायला बसत जाऊ नकोस. किती वेळ लावतोस जेवायला! चल, ऊठ इथून.’ आपण आपल्या भावाला मागच्या महिन्यात असे सांगितल्याचे एका पेशंटच्या भावाला आठवले आणि त्याच्या नंतर आपण आपल्या भावाशी बोलणेच टाकले आहे, असे आठवून वाईट वाटले.
या उलट काही जण पेशंटच्या आयुष्यात प्रमणाबाहेर गुंततात.(over involvement). परिणामी पेशंटला स्वतःचे निर्णय न करू देता, तेच सगळे निर्णय करतात. आपल्या पेशंटला काही जमणार नाही असे एखाद्या नातेवाईकाला वाटते, किंवा अनेक निर्णय आपणच आपल्या पेशंटसाठी घेतले पाहिजेत, त्याच्या सगळ्या हितसंबंधांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरच आहे असे त्यांना वाटते. समीरच्या आईला आठवले, आपण कसे आधी त्याच्या कॉम्प्युटर क्लासला विरोध करत होतो, आपल्या मनात कशी भीती होती की तो एकटा जाऊ शकेल की नाही, अभ्यास करू शकेल की नाही!
त्या गटात बसलेल्या अनेकांना आपल्या भावना ओळखणे सहज शक्य झाले. डॉक्टरांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. ते म्हणाले, “आपल्या रुग्णाची काळजी घेताना केवळ नाकारात्मकताच असते असे नाही. अनेक जण आपल्या पेशंटवर खूप माया(warmth) करतात, पेशंटविषयी सकारात्मक राहतात, तसेच त्याच्याशी वागतात(positive regard). प्रत्येक रक्षाबंधनाला समीरसाठी त्याच्या आवडीचे आईसक्रीम किती प्रेमाने आपली मोठी मुलगी आणते, त्याच्याबरोबर दिवसभर गप्पा मारते हे आठवून समीरच्या आईच्या डोळ्यात पाणी आले.
या नंतर डॉक्टरांनी आपली स्वतःची काळजी कशी घ्यायची हे सगळ्या काळजी वाहक(care givers) नातेवाईकांना समजावून सांगितले. आपल्या मनावरचा भार कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, गरज पडल्यास कोणाची तरी मदत घेणे, औषधोपचारासंबंधी मनात येणारे प्रश्न मोकळेपणाने विचारणे, पुरेशी विश्रांती घेणे असे अनेक उपाय करणे आवश्यक असते. कधी कधी हा भार सहन होत नाही, अतिचिंता किंवा उदासीनतेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळेस योग्य ते उपाय करणे महत्त्वाचे.
आपल्या रुग्णाची काळजी घेताना मनात आशा बाळगणे, आपल्या रुग्णाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद मानणे, आणि गरज पडल्यास स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मदत घेणे या सगळ्याचा रुग्णाच्या आणि नातेवाईकाच्या जीवनाच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होतो.