सायबर बुलिंग हा भारतातला सर्वाधिक वाढता सायबर गुन्हा आहे आणि यात तरुण मुलं मुली सर्वाधिक अडकलेले दिसतात. सायबर बुलिंगचे विविध प्रकार असतात. जसं की लैंगिक छळ, ट्रोलिंग, सेक्सटॉर्शन, बदनामी, फेक प्रोफाइल, हॅकिंग, सेक्सटिंग, रिव्हेंज पॉर्न, सायबर स्टॉकिंग, मॉर्फिंग, ओळख चोरणे (आयडेंटिटी थेफ्ट) इत्यादी… या संदर्भात ‘सायबर बाप’ या संस्थेनं नुकताच त्यांचा अहवाल जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सायबर बाप’च्या ‘सायबर हॅरॅसमेंट रिपोर्ट २०२३’ नुसार सायबर बुलिंगचे १६ प्रकार गेल्या वर्षभरात दिसून आले. त्यात ४५ टक्के लैंगिक छळाचे गुन्हे होते. १८ राज्यांतल्या १८८ शहरांमधून या केसेस नोंदवल्या गेल्या होत्या. सर्वाधिक केसेस सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये नोंद झाल्या, बुलिंगच्या अनुभवाला सामोरं गेल्यानंतर मदत मागणाऱ्यांमध्ये वय वर्षे ३० च्या खालील तरुणाईचा सर्वाधिक सहभाग दिसून आला. सर्वाधिक सायबर बुलिंग इन्स्टाग्रामवर झालं आणि त्या पाठोपाठ व्हॉट्सअ‍ॅपवर असंही या अहवालात दिसून आलं आहे.

हेही वाचा – Health Special : मॅरेथॉन धावायचीय? तर आहाराचे ‘हे’ नियम पाळाच!

भारतात सायबर बुलिंग हा पहिल्या तीन सायबर गुन्ह्यांमधील एक आहे यात शंकाच नाही, इतकं सायबर बुलिंगचं प्रमाण प्रचंड आहे. अगदी शाळकरी मुलांपासून या गोष्टी सुरु होतात. अनेकदा चेष्टा आणि छळ यातला फरक मुलांच्या लक्षात येत नाही, तर काही वेळा मुलं जाणीवपूर्वक एका मुलाच्या विरोधात ‘गॅंग’ बनवून त्याला ऑनलाईन जगात त्रास देताना दिसतात. अनेकदा मुलांना आणि तरुणाईला ऑनलाईन जगात त्रास देणारे वयाने मोठे आणि निरनिराळे हेतू मनात बाळगलेलेही असू शकतात.

या सगळ्याचा मुलं आणि तरुणाईच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत असतो. याबाबतही या अहवालात महत्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. त्यानुसार सायबर बुली होणाऱ्या व्यक्ती नैराश्याकडे झुकतात. त्यापाठोपाठ आपल्याला कुणीतरी त्रास देतंय या भावनेतून दुःख होणं, राग येणं, असहाय्य वाटणं, अस्वस्थता येणं, लाज वाटण्यापासून आत्महत्या करावीशी वाटणं अशा अनेक भावनांमधून जाताना दिसतात. सायबर बुलिंगचा विविध स्तरीय मानसिक आणि भावनिक त्रास हा सहन करणाऱ्याला होतो. त्रास देणारी व्यक्ती माहितीची असेल तर हा त्रास अनेकदा ऑनलाईन जगातून ऑफलाईन जगापर्यंत पोहोचण्याचीही शक्यता असते.

सायबर बुलिंगचे मानसिक, सामाजिक, शारीरिक परिणाम तर होतातच पण काहीवेळा दीर्घकालीन त्रासही सहन करावा लागू शकतो.

एकदा ऑनलाईन, कायम ऑनलाईन

सायबर बुली करण्यासाठी जे शब्द, फोटो, व्हिडीओ वापरले जातात ते कायम सायबर स्पेसमध्ये तसेच असतात. अगदी त्रास देणाऱ्याला ब्लॉक केलं तरीही तो सगळा तपशील सायबर स्पेसमधून जात नाही, त्यामुळे सहन करण्याला त्याचा त्रास वारंवार होऊ शकतो. अनेकदा मुलं आणि तरुणाई एकमेकांना त्यांचे स्क्रीन शॉट्स पाठवते, जे त्यांच्या वर्तुळात फिरत राहतात आणि विषय संपतच नाही.

हेही वाचा – Diabetic Patient : मधुमेहाच्या रुग्णांनी मूग डाळ का खावी? या डाळीचा आहारात कसा समावेश करावा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

झोपेवर परिणाम

मनावरचा ताण वाढला की, त्याचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. झोपेवर, जेवणावर परिणाम होऊ शकतो. निराशा वाढली की आत्महत्येचे, स्वतःला इजा पोहोचवण्याचे विचार बळावतात. काहीवेळा आपणच काहीतरी चूक केलेली आहे म्हणून आपल्याला असं वागवलं जातंय हे मनात पक्कं बसतं आणि या सगळ्याचा शारीरिक परिणाम होतो.

एकलकोंडेपणा वाढतो

सायबर बुलिंगचा अजून एक परिणाम म्हणजे आयसोलेशन, म्हणजेच एकटेपणा. सहन करणारी मुलं आणि तरुणाई काहीवेळा होणारा त्रास कुणालाच सांगत नाहीत आणि आतल्या आत कुढत राहतात. कुणीही आपल्याला समजून घेणार नाही अशी त्यांची भावना असू शकते.

मी कोण आहे?

आपण नेमके कोण आहोत, आपल्याला असं का वागवलं जातंय, आपण काय चूक केलेली आहे का, आपण जगण्यासाठी लायक नाही आहोत, आपण वाईट आहोत म्हणूनच हे घडतंय असे प्रश्न पडू लागतात. आत्मविश्वासाचं खच्चीकरण होऊन स्वतःवर शंका घेणं सुरु होतं.

काय करायला हवं?

१) सायबर बुलिंग होत असेल तर पोलिसांची मदत घेतली पाहिजे.
२) मानसिक किंवा भावनिक त्रास होत असेल तर, समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे.
३) अनेकदा मुलं याविषयी कुणालाच काही बोलत नाहीत, पण त्यांचं वर्तन बदलतं. पालक आणि शिक्षकांनी बदलेल्या वर्तनाकडे लक्ष देऊन मूल अडचणीत आहे का, हे जाणून घेतलं पाहिजे.
४) शाळेत, कार्यालयात सायबर गुन्ह्यांची माहिती दिली पाहिजे. जसं बुली होणाऱ्याला मदत मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे अशा घटना घडू नयेत यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental health special how does cyber bullying cause mental problems hldc ssb