World Alzheimer’s Day: दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक स्मृतीभ्रंश दिवस साजरा केला जातो. स्मृतीभ्रंश म्हणजेच अल्झायमर. या आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे हा या मागील उद्देश आहे. १९९४ मध्ये अल्झायमर डिसीज इंटरनॅशनलद्वारे (ADI) जर्मन मानसोपचारतज्ज्ञ (psychiatrist) आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. अलॉइस अल्झायमर (Dr. Alois Alzheimer) यांच्या जन्मदिवसाची तारीख हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आली आणि पहिल्यांदा जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला. डॉ. अलॉइस अल्झायमर यांना प्रिसेनाइल डिम्नेशिआचा (presenile dementia) पहिला रुग्ण आढळला. या आजारालाच नंतर अल्झायमर म्हणून ओळखले जाऊ लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत बीएएलके -मॅक्स सुपर स्पेशॅलिटि हॉस्पिटलचे, प्रिन्सिपल डायरेक्टर आणि न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख, डॉ. अतुल प्रसाद यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, ”स्मृतीभ्रंश हा विकसित होत जाणारा आणि बरा न होणारा न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो सुरुवातीला रुग्णाची स्मरणशक्ती, वैचारिक क्षमता आणि वागणुकीवर परिणाम करतो. हे स्मृतीभ्रंश होण्याचे मुख्य कारण आहे, ज्यामुळे अगदी रोजच्या आयुष्यातील नेहमीची कामं करण्यातसुद्धा अडथळा येऊ शकतो.

स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना विविध प्रकारच्या आव्हानांचा आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो; कारण या आजाराच्या विकसित होत जाणाऱ्या स्वरुपामुळे रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरजदेखील वाढते. भावनिक आणि मानसिक ताण येणे, स्वत:च्या शारीरिक गरजा पूर्ण न करू शकणे, झोप न मिळणे, एकटेपणा, आरोग्याच्या समस्या जाणवणे, दु:ख होणे आणि खूप काही गमावल्यासारखे वाटणे अशा काही सामान्य समस्या स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना जाणवू शकतात.

याशिवाय तज्ज्ञ सांगतात की, ”अशा रुग्णांची काळजी घेणाऱ्यांवर आर्थिक ताणही येऊ शकतो, कारण स्मृतीभ्रंशच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी लागणारा वैद्यकीय खर्च, घरात होणारे बदल आणि काळजी घेण्यासाठी व्यावसायिक सेवा घेतल्यास लक्षणीय खर्च येऊ शकतो.

“स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या अनेकांना याव्यतिरिक्त पालक, जोडीदार किंवा कर्मचारी यांसारख्या अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात, ज्यामुळे त्यांना खूप ताण येऊ शकतो आणि संघर्ष करावा लागू शकतो. त्यांच्यावर रुग्णाच्या वतीने महत्त्वाचे वैद्यकीय निर्णय आणि त्यांच्या आयुष्याचा शेवट कसा होईल, असे निर्णय घेण्याची जबाबदारीदेखील येऊ शकते; जे भावनिकदृष्ट्या अत्यंत अवघड असू शकते”, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

हेही वाचा – मधुमेही व्यक्तीने जेवणाच्या सुरुवातीला पालेभाज्या का खाव्यात? डॉक्टरांकडून जाणून घ्या उत्तर

जर तुम्हाला स्मृतीभ्रंश झालेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तीची काळजी घ्यायची असेल तर तुमच्या आरोग्याची काळजी घेणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. पोद्दार यांनी सांगितल्यानुसार, काही सोपे उपाय येथे सांगितले आहेत, जे तुम्हाला तुमचे मन आणि शरीराची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

आरोग्यदायी पदार्थ खा : तुमचे भावनिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला भाज्या, फळे, हेल्दी फॅट्स, फायबर्स आणि इतर पोषकतत्व मिळेल अशा पोषक आहाराची आवश्यकता आहे. तसेच दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पित राहा.

संवाद साधा
तुमच्यासारख्या स्मृतीभ्रंश झालेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांबरोबर संवाद साधा. अशा लोकांना भेटा आणि त्यांच्याशी बोला. तुमचे अनुभव आणि आव्हाने सांगा आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला एकटेपणाची भावना येणार नाही.

स्वत:ची काळजी घ्या
रोज स्वत:साठी थोडा वेळ बाजूला ठेवा आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी या वेळात करा. नियमितपणे विश्रांती घ्या. स्वत:साठी चांगला चहा बनवून त्याचा आस्वाद घ्या, एखाद्या मित्र-मैत्रिणीला कॉल करून गप्पा मारा आणि काही वेळ शांतपणे झोपा.

ध्यान करा : १० मिनिटं ध्यान केल्यामुळे तुमचा ताण कमी होईल. तणाव कमी करण्यासाठी दररोज ध्यान करण्याचा प्रयत्न करा.

श्वासोश्वासाचा सराव करा
काही वेळ श्वासोश्वासाचा सराव केल्याने तुमचा ताण कमी होऊ शकतो. तुम्हाला जेव्हाही खूप ताण आला आहे असे वाटत असेल, तर तेव्हा श्वसोश्वासाचा सराव करा. एकदा श्वास आत घ्या… काही वेळ श्वास पकडून ठेवा आणि हळूहळू श्वास बाहेर सोडा.

हेही वाचा – स्क्वॅट्समुळे तुमचे पाय कसे होतील मजबूत? कसे करावे स्क्वॅट्स? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

इतरांकडे मदत मागा
तुम्हाला जेव्हा काहीच सूचत नसेल तेव्हा इतंराची मदत मागण्यास संकोच करू नको. तुम्हाला खूप गुदमरल्यासारखे वाटत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.

शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा, मग भले ते चालणे असो की योगा असो. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी फायदा होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World alzheimers day tips for caregivers to take care of their wellbeing snk