आपल्या झोपेवर वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होत असतो. या घटकांपैकी एका प्रमुख घटकाचा सर्वाधिक परिणाम होत असतो आणि तो म्हणजे तुमच्या बेडरूमची रचना कशी आहे. तुम्ही ज्या वातावरणात झोपता, तिथे निवांतपणा किंवा झोप येण्यास मदत करणारे घटक नसतील, तुम्ही रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर राहाण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपही अस्वस्थ लागते.

चांगल्या झोपेसाठी या काही टिप्स

आरामदायी गादी घ्या

१) जर तुम्हाला झोपेत अडथळा आणणाऱ्या घटकांचा सामना करायचा असेल, तर गादी हे प्रमुख शस्त्र आहे असे समजा आणि म्हणूनच तिची हुशारीने निवड केली गेली पाहिजे. आरामदायी गादीवर झोपल्याने तुमच्या ताणाची पातळी कमी होते, संभाव्य अलर्जीचा त्रास होत नाही आणि रात्री शांत झोप लागते. योग्य गादी तुम्हाला नैसर्गिक, गाढ झोप लागण्यास व सकाळी कोणत्याही वेदनेशिवाय उठण्यास मदत करते.

२) योग्य प्रकारचे बेडशीट वापरा.

खडबडीत बेडशीटवर झोपल्यास तुम्ही झोपून उठल्यावरही थकल्यासारखे दिसाल हे नक्की. नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या, त्वचेसाठी फार रूक्ष नसलेल्या बेडशीटवर झोपा. त्याचबरोबर आरामदायी, वापरण्यास सोपे पांघरूण वापरा. पांघरूण फार जड किंवा त्रासदायक नसेल याची काळजी घ्या. आरामात झोपण्यासाठी पुरेशा उशा असतील याची खात्री करा.

३) खोली सुगंधित ठेवा

सुगंधी मेणबत्त्या किंवा लॅव्हेंडर वॉटरचे चाहते असाल, तर त्याचा तुमच्या खोलीत वापर करा. सुगंधामुळे तुम्ही उल्हसित होतात आणि आराम करत असताना त्याचा तुमच्या सुप्ट मनावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी संध्याकाळ निवांतपणे व्यतीत करून झोपेसाठी मनाला तयार करा.

४) झोपण्यापूर्वी खोली थंड करा

खोलीचे तापमान कमी करणे अतिशय आवश्यक आहे, कारण कमी तापमान तुमच्या शरीराला आता झोपायची वेळ झाल्याचे सांगते. थंड खोली झोपण्यासाठी जास्त चांगले वातावरण निर्माण करते, कारण तिथे तुम्हाला ऊबदारपणे झोपून जावेसे वाटते. मात्र हे हवामान जास्त गार असूनही उपयोग नाही.

५) झोपण्यापूर्वी आंघोळ करा

झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शरीराचा थकवा निघून जातो आणि गादीवर पडल्यानंतर जास्त निवांत वाटते. त्याला थंड वातावरणाची जोड दिल्यास चांगल्या झोपेची शक्यता कितीतरी पटींनी वाढते.

६) पडदे बंद करा आणि रात्रीसाठीचे दिवेही

अंधार असताना तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे झोपता यात काही चुकीचे नाही. झोपेच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना तुमच्या पापण्यांची हालचाल होते. रस्त्यावरचे दिवे किंवा चंद्राच्या प्रकाशानेही तुम्हाला जाग येऊ शकते. त्याशिवाय खोलीतील मंद दिवे तसेच इतर प्रकाश बंद करा. यात प्रखर डिस्प्ले असलेल्या घड्याळाचाही समावेश होतो. आपला मेंदू अंधुकशा प्रकाशाचाही चुकीचा अर्थ लावून उठायची वेळ झाली असे समजू शकतो. या उलट अंधारामुळे तुमच्या मेंदूचे जैविक घड्याळ योग्य रीतीने काम करून तुम्हाला झोपायला सांगते.

७) घड्याळ आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्सकडे दुर्लक्ष करा

दिवसाच्या विशिष्ट वेळी उठण्यास पर्याय नसला, तरी तुमच्या शरीराला गजराच्या घड्याळाच्या मदतीशिवाय नैसर्गिकपणे उठू देणे हे पूर्ण व शांत झोप लागण्यास मदत करते. डिजिटल गोष्टींमुळे तुमच्या मेंदूवर ताण येतो आणि त्यामुळे तुम्हाला पूर्ण रात्रभर झोप लागत नाही.

८) रात्री दहा वाजता तुमच्या शरीराला आराम द्या

 शरीराचे नियमित घड्याळ आणि रोज एकाच वेळेस झोपणे हे पुरेशा झोपेसाठी महत्त्वाचे आहे. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे, की रोज रात्री दहा वाजता झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये कमी झोप लागणाऱ्यांचे प्रमाण ११ टक्क्यांइतके कमी असते.

(फोटो सौजन्य – Vegan Liftz)