रिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वी आपला फिचरफोन जवळपास मोफत देऊन मोबाईल क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. या फोनसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती. त्यामुळे कंपनीला नोंदणी बंद करावी लागली होती. आता या मोबाईलला टक्कर देण्यासाठी आयडीयानेही आपला नवीन फिचर फोन लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने कार्बन या भारतीय कंपनीशी करार केला आहे. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ९९९ रुपयांचा हा फोन खरेदी केल्यावर ग्राहकांना १ हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे.

याशिवाय स्मार्टफोनच्या खरेदीवरही कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. ही किंमत २ हजार रुपये इतकी असेल. याअंतर्गत आयडियाकडून karbonn K310N, K24 Plus आणि K9 हे फीचरफोन विकत घेता येणार आहेत. कॅशबॅक ऑफर घेण्यासाठी ग्राहकांना पहिले १८ महिने २७०० रुपयांचे आयडियाचे रिचार्ज करावे लागणार आहे. पहिेले १८ महिने झाल्यावर ग्राहकांना ५०० रुपयांचा टॉकटाइम देण्यात येणार आहे.

Karbonn A41 Power आणि A9 indian वर १५०० रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. या दोन्ही फोनची किंमत २,९९९ आणि ३,९९९ रुपये आहे. १८ महिने पूर्ण झाल्यावर कॅशबॅकमधील ५०० रुपये मिळतील तर ३६ महिने पूर्ण झाल्यावर उर्वरित १००० रुपये मिळतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर आयडीयाचा विचार करणे नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरु शकते.