भारतामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांसदर्भातील एका सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार भारतातील ८७ टक्के वर्किंग वुमन्सना आपल्या प्रोफेशनल आयुष्यात जास्तीत जास्त वरच्या पदावर जाण्याची इच्छा असल्याचे दिसून आले. ऑफिसमध्ये दिलेले कोणत्याही प्रकारचे काम करण्याची तयारी स्त्रियांनी दाखवली आहे. या सर्वेक्षणामधील आकडेवारी महिला पुरुषांपेक्षा कमी महत्त्वकांक्षी असतात या पारंपारिक समजुतीला छेद देणारी ठरली.

बोस्टन कंन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) या जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनीने हे सर्वेक्षण ‘फ्रॉम इंटेन्शन टू इम्पॅक्ट: ब्रिजिंग द डायव्हर्सिटी गॅप इन द वर्कप्लेस’ नावाने प्रकाशित केले आहे. या सर्वेक्षणात ६० टक्के महिलांनी सांगितले की त्यांच्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांना पाठिंबा दिला जातो. तर २९ टक्के महिलांनी या उपक्रमांमुळे आम्हाला फायदा होत असल्याचे मत नोंदवले.

या अहवालावरून कामाच्या ठिकाणी महिलांनाही वेगवेगळ्या कामांमध्ये संधी मिळवण्याबद्दल पुरुष जास्त आशावादी असल्याचे दिसून आले. बीसीजीच्या प्रियंका अग्रवाल यांनी यासंदर्भात बोलताना कामाच्या ठिकाणी लैंगिक विविधतेला वाढण्यासाठी (स्त्री की पुरुष या आधारावर कामाची वाटणी न करणे) पुरुष कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करुन घेणे गरजेचे आहे. लैंगिक विविधेला पाठिंबा देणे आणि त्याचा प्रसार करण्याशी पुरुषांचा थेट संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.