लग्न झालेल्यांमध्ये एकटे असणाऱ्यांपेक्षा हृदयविकार उद्भवण्याचे प्रमाण कमी असते असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनावरुन समोर आले आहे. तसेच लग्न झालेल्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी असते. यासाठी जवळपास २० लाख लोकांचा अभ्यास करण्यात आला. लग्न झालेल्या लोकांपेक्षा ज्यांचा घटस्फोट झाला आहे. विधवा किंवा विधूर आहेत आणि ज्यांनी लग्नच केलेले नाही अशांमध्ये ४२ टक्के जणांना हृदय व रक्तवाहीन्यांशी संबंधित तसेच १६ टक्के लोकांमध्ये कोरोनरी आर्टरीचे विकार असतात. हृदय नावाच्या जरनलमध्ये संशोधकांनी केलेल्या नोंदीनुसार, लग्न न झालेल्यांपैकी ४३ टक्के हे हृदयाशी निगडित आजारांमुळे मृत्यू पावतात तर लोक ५५ टक्के लोक हे स्ट्रोकमुळे मृत्यू पावतात.

इंग्लंडमधील किले विद्यापीठातील वरिष्ठ अभ्यासक डॉ. मामस यांनी लग्न हे हृदयाच्या आरोग्यासाठी कसे उपयुक्त असते याबाबत भाष्य केले आहे. लग्नामुळे आर्थिक स्थैर्य, सामाजिक पाठिंबा मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ हृदयविकाराचा झटका आलेले किंवा हृदयाशी निगडित अन्य काही त्रास असणारे लोक जोडीदाराच्या दबावामुळे औषधोपचार योग्य पद्धतीने करतात आणि पुरेशी काळजी घेतात. त्याशिवाय हृदयविकाराचा झटका येऊन गेला असल्यास त्यांच्यामध्ये पुर्नवसनाची प्रक्रियाही चांगल्या पद्धतीने होते. तसेच जोडीदार आसपास असल्याने या लोकांमध्ये हृदयविकार वेळेत समजण्यास मदत होते. याबरोबरच घटस्फोट झालेल्या महिला आणि पुरुषांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण हे लग्न झालेल्यांपेक्षा ३५ टक्क्यांनी जास्त असते.

विधवांमध्येही जोडप्याने राहत असलेल्यांपेक्षा स्ट्रोकचे प्रमाण १६ टक्क्यांनी जास्त असते. मात्र त्यांच्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण म्हणावे इतके जास्त नसते. लग्नामुळे आरोग्याचे फायदे महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतात असेही या अभ्यासात म्हटले आहे. एकटे असणारे लोक आपल्या आरोग्याची आणि हृदयविकार असल्यास त्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नाहीत. मात्र लग्न झालेले लोक ही काळजी घेताना दिसतात. लग्न झालेल्यांनी जोडीदारासोबत व्यायाम करणे अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य सुधारण्याबरोबर त्यांचे नातेही सुधारते असे डॉ. मामस यांचे म्हणणे आहे.