मारुती सुझुकी या देशातील सर्वात मोठ्या कार कंपनीने आपल्या Baleno RS या कारच्या किंमतीत तब्बल एक लाख रूपयांची कपात केली आहे. शुक्रवारी कंपनीने Baleno RS कारच्या (एक्स-शोरूम) किंमतीत कपात करण्याची घोषणा केली. मारुतीच्या प्रीमियम आणि लग्जरी कारच्या ‘नेक्सा’ मालिकेत ‘बलेनो आरएस’ या कारचा समावेश होतो.

नेक्साच्या संकेतस्थळानुसार दिल्लीमध्ये Baleno RS ची एक्स-शोरुम किंमत 5 लाख 58 हजार 602 रुपये झाली आहे. शुक्रवारी बलेनोच्या किंमतीतील कपातीबाबत घोषणा करण्याच्या दोन दिवसांपूर्वीच मारुतीने आपल्या अनेक वाहनांच्या किंमतीत पाच हजार रुपयांची कपात करण्याबाबत घोषणा केली होती. मारुतीने, ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिझायर डिझेल, टूर एस डिझेल, व्हिटारा ब्रेजा आणि एस-क्रॉस या वाहनांच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती 25 सप्टेंबर रोजी दिली होती. सरकारने कंपनी करामध्ये कपात केल्याने वाहनांच्या किंमती कमी झाल्याचं सांगत ही कपात करण्यात आली होती.

दरम्यान, भारतीय बाजारातील अन्य कार उत्पादकांप्रमाणे मारुती सुझुकी कारच्या मागणीतही प्रचंड घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात या कंपनीची कारविक्री 34 टक्क्यांनी घसरली होती.