जवळपास 13 वर्षांनंतर नोकियाच्या एका क्लासिक फोनचं पुनरागमन होत आहे. Nokia 5310 Xpress Music हा एकेकाळचा लोकप्रिय फोन नव्या रुपात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीने हा फोन मार्च महिन्यातच लाँच केला होता. आता हा फोन भारतातही लाँच करण्याची तयारी कंपनीने केली आहे. ‘नोकिया मोबाइल्स इंडिया’च्या ट्विटर हँडलवरुन फोनच्या भारतातील लाँचिंगबाबत माहिती देण्यात आली आहे.

10 सेकंदाचा एक टीझर व्हिडिओ कंपनीने शेअर केला असून 15 जून रोजी हा फोन भारतीय मार्केटमध्ये लाँच केला जाईल असे स्पष्ट केले आहे. हा फोन व्हाइट/रेड आणि ब्लॅक/रेड अशा दोन कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. पहिल्यांदा, ‘Nokia 5310 एक्सप्रेस म्युझिक’ हा फोन कंपनीने 2007 मध्ये आणला होता. त्यावेळी म्युझिक लव्हर्समध्ये हा फोन चांगलाच लोकप्रिय ठरला होता. नोकियाचे फोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबलने लाँचिंगआधीच वेबसाइटवर या फोनसाठी नोंदणी सुरू केली आहे.

फीचर्स :- नव्या नोकिया 5310 फोनमध्ये म्युझिक प्लेयरसाठी कंपनीने जुन्या फोनप्रमाणेच नवीन फोनच्या साइडलाही बटण दिले आहे. 2.4 इंच QVGA स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये अल्फान्युमरिक की-पॅड आहे. फोनच्या मागील बाजूला फ्लॅशसह VGA कॅमेरा देण्यात आलाय. नवीन Nokia 5310 मध्ये 16MB इंटरनल स्टोरेज असून फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉटही आहे. याद्वारे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येईल. म्हणजे जवळपास 8,000 गाणी यामध्ये स्टोअर करता येतील. जुन्या फोनमध्ये 4GB स्टोरेजपर्यंतच क्षमता वाढवता येत होती. तसेच, नवीन फोनमध्ये MP3 प्लेयर आणि फ्रंट फेसिंग स्टीरिओ स्पीकर्स असून 3.5mm ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ 3.9 देण्यात आले आहे. याशिवाय FM रेडिओ रिसीव्हरही आहे. या फोनमध्ये 1,200 mAh क्षमतेची रिमूव्हेबल बॅटरी असून ही दमदार बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. सिंगल चार्जमध्ये 7.5 तासांचा टॉकटाइम, सिंगल सिम मोडमध्ये 22 दिवस आणि ड्युअल सिम मोडमध्ये 30 दिवस स्टॅडबाय टाइम बॅकअप मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

किंमत :- नवीन नोकिया 5310 फोनमध्ये KaiOS सॉफ्टवेअरऐवजी Nokia Series 30+ ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या आयकॉनिक फोनची किंमत ग्लोबल मार्केटमध्ये 39 युरो (जवळपास 3,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. पण, भारतात या फोनच्या किंमतीचा खुलासा लाँचिंगवेळीच केला जाणार आहे.