शीतपेयांमध्ये घातक रसायनांचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होत असल्याने मनुष्याच्या रोगप्रतिकार शक्तीत घट होत असल्याचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष ‘जागतिक आरोग्य संघटना’ आणि ‘हेल्थ इंडिया डॉट कॉम’ या संस्थांनी काढला आहे. त्यामुळे शीतपेयांच्या दुष्परिणामापासून सावध राहावे, असा सल्लाही या संस्थांनी दिला आहे. दुसरीकडे भारतातील स्वदेशी जागरण संस्था या बहुराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांच्या विरोधात जनजागृती करत असतानाही शीतपेयांची विक्री दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
शीतपेयांमध्ये फॉस्फरस अ‍ॅसिड, कॅफिन, काबरेनेट, शुगर यासारख्या शरीरावर परिणाम करणाऱ्या रासायनिक पदार्थाचा वापर करण्यात येतो. दिवसभरात आवश्यक असलेली दहा चमचे साखर मानवाच्या शरीरात असते. १० मिनिटात शीतेपयात असलेल्या ‘फॉस्फरस अ‍ॅसिड’ या अतिरिक्त साखरेचा परिणाम होऊ देत नाही. २० मिनिटात रक्तातील साखर वेगात वाढते. इन्शुलिनचा ताळमेळ बिघडतो. ही साखर पचवण्यासाठी यकृत (लिव्हर) आवश्यक ती साथ देत नाही. साखर चरबीमध्ये परिवर्तीत होत असल्याने शरीराचा लठ्ठपणा वाढतो. ४० मिनिटानंतर शीतपेयातील ‘कॅफिन’ शरीरात जमा होऊन त्याचा आपल्या डोळ्यावर प्रभाव पडतो. रक्तदाब वाढून हृदयाला अधिक शक्ती देण्यासाठी रक्तात बदल होतात. साधारणत: ४५ मिनिटानंतर आपल्या शरीरात ‘डोपामाईन’ नावाच्या रसायनाची निर्मिती होते. यामुळे अंमली पदार्थासारखी नशेची अनुभूती येते. एकीकडे मन, बुद्धीला आनंदाची जाणीव होते. हळूहळू आपण शीतपेयाच्या आहारी जातो. ६० मिनिटानंतर शीतपेयातील ‘फॉस्फरस अ‍ॅसिड’ आतडय़ावर परिणाम करतात. शरीरावर कॅफिनचा प्रभाव झाल्याने लघवीद्वारे थकवा येत असल्याचा निष्कर्ष वरील दोन्ही संस्थेंनी आपल्या अहवालात मांडला आहे.
भारतात साखर खरेदी करणाऱ्या सर्वात मोठय़ा ‘कोकाकोला’ व ‘पेप्सी’ या दोन कंपन्या आहेत. या कंपन्या दरवर्षी शीतपेयात मिसळण्यासाठी तब्बल चार लाख टन साखर खरेदी करतात. यापैकी कोकाकोला २.५ लाख तर पेप्सी १.५ लाख टन साखर खरेदी करते. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डायबिटीज अ‍ॅण्ड किडनी डिसीजचे संचालक डॉ. बिल हिसेल्स यांनी जगात दरवर्षी १ लाख ८० हजार नागरिकांचा मृत्यू केवळ शीतपेयाने होत असल्याचे म्हटले आहे. २०१० मध्ये एकटय़ा भारतात ९५ हजार नागरिकांचा बळी गेल्याचेही या संस्थेने म्हटले आहे. शीतपेयाच्या सततच्या सेवनाने मधुमेह, उच्च रक्तदाब, आतडय़ाचा कर्करोग, अपचन, अ‍ॅसिडिटी, लठ्ठपणा आणि एकाग्रता भंग होणे, आदी आजार होत असल्याचेही संशोधनांती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शीतपेयाच्या बाटलीवर तंबाखू उत्पादनाप्रमाणे ‘शीतपेय पिणे धोकादायक’ असल्याची सूचना लिहिने बंधनकारक करावे, अशी मागणी आयएमए, नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली आहे. याशिवाय ‘स्वदेशी’वालेही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शीतपेयांचा तीव्र विरोध करत आहेत. दुसरीकडे आम्ही आरोग्याशी संबंधित सर्व मापदंडाचे पालन करतो. जगातील सर्वश्रेष्ठ प्रयोगशाळेत या उत्पादनांचे परीक्षण केले जाते. आमचे उत्पादन आरोग्यवर्धक असल्याचा दावा कोकाकोला व पेप्सी या कंपन्यांकडून केला जातो.
वर्षांकाठी ११ हजार कोटींची विक्री
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, मद्रास या मोठय़ा शहरांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात शीतपेयाचे सेवन करणाऱ्यांपैकी ५८ टक्के लोक कोकाकोला, ३७ टक्के पेप्सी तर पाच टक्के लोक अन्य शीतपेय पितात. एका अहवालानुसार देशातील नागरिक वर्षांकाठी ११ हजार कोटींचे शीतपेय घशात रिचवित असल्याचे स्पष्ट झाले आहे.