नियमितपणे योगाभ्यास केल्याने मेंदूची वयोपरत्वे हानी होण्यास प्रतिबंध होतो, असे मत एका अभ्यासात व्यक्त करण्यात आले आहे. डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिऑलॉजी अ‍ॅण्ड अलाइड सायन्सेस या संस्थेच्या संशोधकांनी हा निष्क र्ष काढला आहे.

योगामुळे वयोपरत्वे मेंदूची होणारी हानी तर रोखली जातेच, शिवाय हृदयविकारासही आळा बसतो असे त्यांचे म्हणणे आहे.

संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओच्या प्रयोगशाळेने केलेले हे संशोधन महत्त्वपूर्ण असून ते अमेरिकन एजिंग असोसिएशनच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

योगाचा अतिरक्तदाब, हृदयाचे ठोके व ताण यावर काय परिणाम होतो हे तपासण्यात आले. माणसाचा मेंदू वयाच्या वीस ते तीस वर्षांपर्यंत वाढतो, पण चाळिसाव्या वर्षांनंतर मेंदूचा विकास थांबतो. त्याचा ऱ्हास सुरू होतो. या अभ्यासात रामेश्वर पाल, सोमनाथ सिंह, अभिरूप चटर्जी व मंटू साहा यांचा समावेश होता.

त्यांनी यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या २० ते ५० वयोगटातील १२४ निरोगी व्यक्तींचा अभ्यास यात केला होता. त्यांचे तीन गटात वर्गीकरण करून काहींना रोज एक तास याप्रमाणे तीन महिने योग क रण्यास सांगण्यात आले.

योगापूर्वी रक्तदाब २०-२९ वयोगटांत १२२-६९ होता तो ११९-६८  झाला. ४० ते ५० वयोगटांत रक्तदाब योगाआधी १३४-८४ होता तो योगानंतर १२४-७९ झाला. योगापूर्वी २०-२९ वयोगटात कॉर्टिसोल या ताणकारक रसायनाचे प्रमाण ६८.५ टक्के होते, ते योगानंतर ४७.४ टक्के इतके झाले. ४०-५० वयोगटात योगापूर्वी ते ९५ टक्के होते ते योगानंतर ७२.७ टक्के झाले.

डोपॅमाइन, सेरोटोनिन यांचे प्रमाणही सुधारले त्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता आली.

ज्यांच्यात डोपॅमाइन कमी असते त्यांना नैराश्य, आळस येतो.