रॉयल एनफिल्ड या प्रसिद्ध ब्रँडने आपल्या थंडरबर्ड रेंजमधील दोन नवीन बाईक बाजारात दाखल केल्या आहेत. थंडरबर्ड ३५० एक्स आणि थंडरबर्ड ५०० एक्स अशी या मॉडेल्सची नावे आहेत. या बाईक कस्टमाईज करण्यात आल्या असून जुन्या आणि नवीन मॉडेलचा संगम केल्याचे कंपनीने सांगितले आहे. नवी दिल्लीमध्ये या गाडीचे लाँचिग करताना रॉयल एनफिल्डचे अध्यक्ष रुद्रतेज सिंग म्हणाले, ही गाडी तरुणांना लक्षात घेऊन कस्टमाईज केली आहे. यातील ३५० एक्सची किंमत १ लाख ५६ हजार असून ५०० एक्सची किंमत १ लाख ९८ हजार आहे.

या बाईक्समध्ये अनेक लहानमोठे बदल केले असून चालकांना गाडी चालवणे सोपे व्हावे यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये हॅंडलबार लहान करण्यात आले असून ९ स्पोकचे ट्यूबलेस टायर्स, ब्लॅक फॉर्क कव्हर्स, सिंगल पीस सीट, ब्लॅक एक्सॉस्ट, वेगळे हेडलँप देण्यात आले आहेत. यामध्ये लाल, केशरी, पिवळा, निळा असे भडक कलर देण्यात आले आहेत. त्यामुळे तरुणांसाठी या बाईक्स आकर्षक ठरत आहेत. ३५० एक्समध्ये ३४६ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे जे एअर कूलिंगसाठी आहे. तर ५०० एक्समध्ये ४९९ सीसीचे इंजिन असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या नव्यानी लाँच करण्यात आलेल्या बाईक्समध्ये सस्पेंशन, ब्रेक्स आणि इंजिनही आधीसारखेच देण्यात आले आहे.